'सिंधुदुर्ग देशा’चा द्रष्टा छायाचित्रकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2021
Total Views |

pralhad bhatakar_1 &



‘देवभूमी’ अशी ओळख असलेल्या कोकणाचा साज तीनही ऋतूंमध्ये न्याराच दिसतो. आपल्या कॅमेर्‍यात कोकणचे हे निसर्गसौंदर्य कैद करणारा अवलिया छायाचित्रकार म्हणजे प्रल्हाद भाटकर... कोकणच्या विविध तालुका आणि खेडोपाड्यातील जवळपास दीड लाख छायाचित्रांचा संग्रह त्यांच्यापाशी आहे. तेव्हा, कोकणच्या सौंदर्यसृष्टीचे बारकावे टिपून जगासमोर मांडणार्‍या या सुप्रसिद्ध छायाचित्रकार प्रल्हाद भाटकर यांच्याविषयी...
 
 
 
कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर उभा राहतो, तो म्हणजे तिथल्या सौंदर्यसृष्टीचा अद्भुत नजराणा. हिरव्यागार गच्च वनराईने नटलेला. डोंगरदर्‍यांना एखाद्या सुवर्णहारासारख्या वाटाव्यात, अशा नितळ, निळ्याशार वाहणार्‍या नद्या. पावसात दाटून आलेले मेघ, पानांवरती ओघळणारे दवबिंदू, भूमीवर पसरलेली हिरवीगार चादर, गावांतील टपोर्‍या दाण्यांची भातशेती, त्यावर भिरभिरणारी पाखरे, पाखरांना हुसकावणारी-बागडणारी मुलं, पाखरांच्या थव्याचा किलबिलाट, कुठल्यातरी पायवाटेवर फुत्कारणारा सर्प, दूरवरून ऐकू येणारी कोल्हेकुई किंवा भल्या पहाटे मयुरनृत्यांचा थयथयाट... हा सर्व पसारा आपल्या कॅमेर्‍यातून टिपत एक समृद्ध कोकणभूमीला जगाच्या पटलावर मांडण्याचा विडा उचलणार्‍या प्रल्हाद भाटकर यांचा प्रवास आणि आपल्या गावाविषयी काहीतरी करण्याच्या तळमळीमुळे ते इथवर पोहोचू शकले आहेत.
 
 
 
भाटकर यांचा जन्म दि. १९ नोव्हेंबर, १९६४ रोजी ठाणे येथे झाला. एक चाकरमानी कुटुंब असल्याने कोकणात सणासुदीला जाणे व्हायचेच. गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले बांदा हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावीच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पाचवीनंतर ठाण्यातील ‘महाराष्ट्र विद्यालय’ या शाळेत उर्वरित माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. घाटकोपरच्या रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातून कला शाखेतून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बालपणातील बराचसा काळ त्यांनी कोकणात घालवला. त्यांच्या बालमनाने कोकणातील हे सौंदर्य टिपून ठेवले होते. काही वर्षांपूर्वी हा छंद म्हणून कोकणातील हे सौंदर्य मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. एका साध्या कॅमेर्‍यातून टिपले जाणारे हे फोटो विलक्षण होते. त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना उत्तम कॅमेर्‍यातून हे फोटो आणखी छान येतील, असा सल्ला दिला. भाटकर यांनासुद्धा ही गोष्ट पटली. त्यांनी लागलीच त्यावर अंमलबजावणीही केली. कोकणातील खेड्यापाड्यांना, डोंगररांगांना प्रत्येक ऋतूमध्ये वेगळा साज येतो. पावसाळ्यात नववधूप्रमाणे सजून बसणार्‍या, हिवाळ्यात उन्हाच्या कवडशांचा खेळ रंगवणार्‍या, तर उन्हाळ्यात कणखर बनणार्‍या कोकणचे वैविध्य टिपण्याचा निश्चय त्यांनी केला. आजमितीला त्यांच्याकडे कोकणच्या विविध तालुका आणि खेडोपाड्यातील जवळपास दीड लाख छायाचित्रांचा संग्रह आहे.
 
 
 
१९९० मध्ये ते एलआयसीमध्ये ‘क्लार्क’ म्हणून रुजू झाले. यानंतर मुंबईत स्थिरस्थावर होण्यास त्यांना मदत झाली. १९९६ मध्ये ते प्रज्ञा यांच्याशी विवाहबद्ध झाले. भाटकर यांची छायाचित्रणाची आवड आणि छंद यांबद्दल त्यांच्या पत्नीला ठाऊक होतेच. त्यामुळे त्यांच्यामागे खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या. छायाचित्रणासाठी मोहीम असो अथवा प्रदर्शनाची लगबग याची तयारी करून बापलेकीला त्या मोहिमेवर पाठवतात. २०१३-१४ मध्ये आपल्या सहकार्‍यांसाठी एलआयसीच्या चर्चगेट येथील मुख्यालयात त्यांनी पहिले ’सिंधुतीर्थ’ हे छायाचित्र प्रदर्शन भरवले. मित्रमंडळींना ही छायाचित्रे कोकणातलीच आहेत, यावर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर भाटकर यांनी संपूर्ण कोकण ढवळून काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भटकंती सुरू केली. ज्या-ज्या मौसमात कोकण टिपता येईल, त्यावेळी खास छायाचित्र टिपण्यासाठी त्यांनी कोकण दौरे सुरू केले. या सर्व कामांमध्ये त्यांची मुलगी सेरा भाटकर हिची मोलाची साथ मिळाली. अद्ययावत तंत्रज्ञान असो किंवा प्रवासात लागणारी अन्य सामग्री असो, जिथे वडिलांना अडथळे येतील, तिथे सेराने स्वतः पुढाकार घेत या कार्यात वडिलांना साथ दिली. बापलेकीचा हा उपक्रम आज कोकण आणि ठाणे शहरांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. 'सिंधुतीर्थ’ हे प्रदर्शन जिथे जिथे भरेल, तिथे कोकणाचे वैभव डोळ्यांत टिपण्यासाठी प्रेक्षक येतात.
 
 
 
कोकणातील प्रामुख्याने साजरे केले जाणारे दोन सण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगा. या दोन सणांची लगबग, गावागावातील सुबक कोरीव कामातील मंदिरे, विहिरी, नद्या, समुद्रकिनारे, माळराने, आंबा, काजूचा मोहर, तलावांतील पाण्यासाठी येणारे वन्यजीव, अहोरात्र शेतात राबणारे शेतकरी-कष्टकरी, कोकण रेल्वे, एसटी आदी गोष्टी टिपण्याचा प्रयत्न ते कायम करत असतात. ड्रोन कॅमेर्‍यातून त्यांनी टिपलेली सुंदर चित्रे अनेकांना भावतात. केवळ गोवा किंवा अन्य निसर्ग पर्यटन करणार्‍या प्रेक्षकांसाठी कायम सुखद धक्का बसला आहे. भाटकर यांनी टिपलेली असंख्य छायाचित्रे प्रत्येकवेळी प्रदर्शनात जागेअभावी मांडणे कमी पडू लागले. त्यामुळे कोकणचे हे वैभव त्यांनी पुस्तकबद्ध करण्याचा निर्णय घेतला. भाटकर यांनी त्यांच्या ’सिंधुदुर्ग देशा’ या पुस्तकातून कोकणातील हे वैभव जतन करण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध लेखक गंगाराम गव्हाणकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले, पुस्तकाची प्रस्तावनाही त्यांनीच लिहिली. कोकणातील ही चित्रसंपदा जगासमोर यावी, असा यामागचा त्यांचा हेतू होता.
 
 
 
मात्र, ज्या उद्देशाने त्यांनी हा पसारा उभा केला, तो मुख्य उद्देश कुठेतरी बाजूला पडला, अशी खंत भाटकर यांना कायम वाटत राहते. जगात जितक्या गोष्टी आहेत, त्यांचे प्रतिबिंब कोकणात निसर्गाच्या किमयेने उमटले आहे. कोकणची माणसं, तिथली जैवविविधता, संसाधने, संपदा ही तितकीशी जपली जात नाही. आपल्याकडील गोष्टींचा बडेजाव तसा कोकणवासीयांना करणे अजूनही जमलेले नाही. इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे पर्यटनाला चालना देण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व दिले जाते, त्यामानाने कोकणात ऐतिहासिक, नैसर्गिक, सामाजिक आणि कित्येक गोष्टींबद्दल जगाला ओरडून सांगण्यात आपण नेहमीच कमी पडत आलो, ही खंत त्यांना लागून राहते. लागूनचे असलेल्या छोट्याशा मात्र, महत्त्वाचे राज्य असलेल्या गोव्याने याचा उत्तमरित्या वापर करून घेतला. मात्र, राजकीय अनास्था म्हणू किंवा अपुरी इच्छाशक्ती, कोकणाला जगासमोर आणण्यासाठी कमी पडत आहे. कोकणातील प्रत्येकाने आपापल्या परीने पुढे येऊन हे वैभव जगासमोर आणण्याची गरज आहे, अशा मतांचे भाटकर आहेत. आज स्वतः एलआयसीसारख्या नामांकित कंपनीत प्रशासकीय अधिकारी असतानाही वेळात वेळ काढून कोकणचे हे वैभव जगासमोर आणण्यासाठी त्यांची तळमळ सुरूच असते. हे सर्व करत असताना कुठल्याही अर्थलाभाची किंवा तत्सम गोष्टींची अपेक्षा त्यांनी आजवर कुणाकडूनही केली नाही. मात्र, कोकणातही इतर राज्यांप्रमाणे पर्यटन व्हावे, त्यानिमित्त कोकणात गुंतवणूक यावी इतका निव्वळ कयास ठेवून कलेच्या माध्यमातून आपल्या जन्मभूमीची सेवा करणार्‍या भाटकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 
 
यशाचा मूलमंत्र
आव्हान कुठलेही असो, संकट कुठलेही असो, त्याच्याशी लढण्याची हिंमत ठेवा. सावकाश का होईना पाऊले पुढे टाका, एकटे असाल तरीही पुढेच जाण्याची तयारी ठेवा, एक दिवस जग तुमच्यासोबत असेल.
                                                                                                                                          - तेजस परब
@@AUTHORINFO_V1@@