कैकाडी समाजाच्या उत्थानासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2021   
Total Views |

Soma Pawar_1  H
 
 
 
 
समाजाचे उत्थान व्हावे, यासाठी कुप्रथांना मूठमाती देणे गरजेचे असते. त्याची सुरुवात स्वतःपासून करणारे ‘अखिल भारतीय कैकाडी महासंघा’चे मुंबई अध्यक्ष सोमा पवार यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
 
 
“काही लोक थोड्या आर्थिक मदतीसाठी धर्मांतर करतात. मदत काय, तर काही महिन्यांसाठी रेशन दिले गेले म्हणून किंवा तत्सम काहीतरी. आम्हाला जेव्हा हे समजते, तेव्हा आम्ही त्या व्यक्तीला समजावतो की, “बाबा, आपला पुरातन धर्म आहे, संस्कृती आहे. आपले पितर ज्या धर्मात आहेत, त्या धर्माला सोडून कसे चालेल? आपले रीतीरिवाज पाळणार कसे? आपल्या कुलदैवताला सोडणार?” असे म्हटल्यावर समाजाच्या स्नेहामुळे ती व्यक्ती धर्मांतर करण्यास सहसा राजी होत नाही. पण, असेही आहे की, कुणाचेही १०० टक्के मतपरिवर्तन आपण करू शकत नाही,” असे सोमा पवार सांगत होते. सोमा पवार पेशाने बांधकाम व्यावसायिक असून, ते ‘अखिल भारतीय कैकाडी महासंघा’चे मुंबईचे अध्यक्ष आहेत.
 
 
 
कैकाडी समाजाचे मुंबई अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना अनेक स्तरावर काम करावे लागते. समाजातील अंधश्रद्धा, ज्या थोड्याबहुत सगळ्याच समाजात असतात, त्यांना दूर करणे, त्यासाठी नियमित समाजाच्या कुटुंबीयांशी भेट देणे इत्यादी. झाडू तयार करणे हा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय. पण, या ना त्या कारणाने हा पारंपरिक व्यवसाय मागे पडत आहे. या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. समाजात मुलीबाळी शिकतात. पण, उच्चशिक्षणाची संधी क्वचितच त्यांना मिळते. समाजातील मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांच्या पालकांची जागृती करण्याचेही ते काम करतात.
 
 
इंग्रजांच्या काळात समाजाला ‘गुन्हेगारी जमात’ म्हणून घोषित केले होते. त्यामुळे आजही कैकाडी समाज राहत असलेल्या परिसरात कुठेही गुन्हा घडला की, तो गुन्हा कैकाडी समाजातील व्यक्तीनेच केला असावा, असा समज पसरवला जातो. क्वचित न केलेल्या गुन्ह्याची विनाकारण शिक्षाही मिळते. यामुळे कैकाडी समाजात आजही अस्वस्थता आहे. न्यूनगंड आहे. समाजाला आत्मविश्वास आणि खर्‍या अर्थाने स्थिरता यावी, यासाठी समाजजागर करणे, आपल्या पुरातन चांगल्या रूढी-परंपरा समाजाने जपाव्या, यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे, समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न करणे, यासाठी अनेकविध उपक्रम सोमा त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने राबवितात.
 
 
 
सोमा आज मुंबईतील सांताक्रुझ भागात राहतात. उच्चशिक्षित आणि पांढरपेशा समाजात त्यांची ऊठबस आहे. त्यांचा मुलगा ‘आर्किटेक्ट’ आणि मुलगी ‘एलएलबी’ करून ‘एलएलएम’ शिकत आहे. एका साजिर्‍या-गोजिर्‍या कुटुंबासारखे त्यांचे आखिव-रेखिव कुटुंब. सोमा याचे सगळे श्रेय त्यांच्या आई-वडिलांना देतात. कलिना-सांताक्रुझला कुंचिकुर्वे समाजाची वस्ती आहे. मूळचे फलटणचे असणारे पवार कुटुंब कामानिमित्त इथे स्थायिक झाले. सोमा यांचे वडील नरसान्ना हे ‘पोर्ट ट्रस्ट’मध्ये कामाला, तर आई समाजातील इतर महिलांप्रमाणे घरातच झाडू तयार करायची. या दाम्पत्याला एकूण ११ मुले. आर्थिक उत्पन्न नावालाच. त्यात घरात खाणारी तोंडं कितीतरी. पण, पवार पती-पत्नीने मुलांना कसेही करून दोन घास भरवलेच. पण, मुलांनी अभ्यास करावा, कुसंगत करू नये, त्यांना कोणतेही व्यसन लागू नये यासाठी नरसम्मा आणि त्यांची पत्नी प्रामुख्याने लक्ष द्यायचे. घरची गरिबीच. त्यामुळे मुलांना नवा कपडा म्हणजे शाळेचा ड्रेस. या अशा परिस्थितीत मुलांना सांभाळताना या दोघांनीही मुलांना उच्च प्रतिचे संस्कार दिले. कुटुंबातील सर्वांनी एकमेकांची काळजी करावी, गरजूला मदत करावी, कष्ट करावे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्य सोडू नये आणि कुणावरही अत्याचार करू नये, हे संस्कार सोमा यांना लहानपणापासूनच मिळत होते. वस्तीमध्ये सगळेच झाडू बनवत असत. प्रत्येकाच्या घरात भरपूर माणसं. पण, सगळं घर झाडू बनवत असल्यामुळे घरात दोन वेळचे जेवण मिळे. पण, तुटपुंज्या पगाराची नोकरी करणार्‍यांच्या घरात मात्र याबाबत अतिशय वाईट परिस्थिती. समाजाचे दुःख, कष्ट आणि प्रश्न त्यांनी जवळून पाहिलेले.
 
 
 
त्या नकळत्या वयातही त्यांना एका गोष्टीचे भारी दुःख वाटायचे. त्यांच्या मोठ्या बहिणींचे लग्न झालेले. माहेरी असतानाही त्यांचा सगळा वेळ घरकाम करण्यात झाडू बनवण्यात आणि लहान भावडांना सांभाळण्यात गेला. सासरी गेल्यावर तर त्यांना कधी स्वत:साठी जगताच आले नाही. राबराब राबणे बस हेच नशिबात. त्यांचे आयुष्य पाहून सोमा खूप निराश झाले. ते देवाला विनवत असत की, ‘देवा, समाजातल्या सगळ्या बहिणींना सुखी संसार मिळो.’ पुढे दहावी झाल्यानंतर तेही आईसोबत झाडू तयार करु लागले. समाजाच्या रीतीनुसार त्यांचा विवाह १७व्या वर्षीच झाला. पुढे त्यांना मुलगी झाली. तिला पाहताक्षणीच सोमा यांनी ठरवले की, ‘मी मुलीला माणूस म्हणून सगळे हक्क आणि अधिकार मिळवण्याची संधी देणार.’ पण, उच्चशिक्षण दिल्यावर मुलीला तिच्या तोलामोलाचा नवरदेव शोधणे आलेच. त्यातच मुलीला पुढे नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल, तर तिला तिच्या सासरचे नोकरी किवा व्यवसाय करू देतील का? पण, सोमा यांनी ठरवले की, काहीही असू दे मुलीला शिकवणारच! हितचिंतक आधी अडून अडून आणि नंतर उघड उघड सल्ला देऊ लागले. मुलीला इतके का शिकवतोस? पण, मुलीची इच्छा ‘एलएलएम’ करण्याची होती. तिला न्यायदानाच्या क्षेत्रात भवितव्य घडवायचे होते. त्यामुळे सोमा यांनी सर्व दबाव झुगारला आणि त्यांची मुलगी आता ‘एलएलएम’ करत आहे. समाजात जाताना समाजाचा मुंबई अध्यक्ष म्हणून ते सांगतात की, “मुलींचे पंख कापू नका. त्यासुद्धा आपल्या समाजाचे नाव उज्जवल करू शकतात.” सोमा म्हणतात, “समाजाच्या चांगल्या भविष्यासाठी समाजातील माताभगिनी शिकायला हव्यात. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी समाजाच्या भविष्यासाठी किती कष्ट सहन केले. त्यांच्या प्रेरणेनेच मी समाजासाठी काही तरी करू इच्छितो.”
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@