पुण्यात डॉक्टरांच्या परवानगीविना 'रेमडीसीव्हीर'ची विक्री

    11-Apr-2021
Total Views |

Remedesivir _1  


पुणे : कोरोनाचा फैलाव वेगाने होताना पुण्यातील आरोग्य यंत्रणांवर आता ताण येत आहे. पुण्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना रेमडीसीव्हीर इंजेक्शनची तातडीची गरज भासत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोठ्या रांगा मेडिकल बाहेर पाहायला मिळत आहे.
 
 
प्रशासनाकडून या इंजेक्शचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. या काळाबाजार प्रकरणात आता पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली. अटक आरोपींमध्ये एका नामांकित रुग्णालयाच्या परिचिकेचाही समावेश आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही कारवाई करण्यात आली आहे.
 
 
पिंपरी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर रेमडीसीव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजाराची पुण्यातील ही दुसरी कारवाई आहे.पृथ्वीराज संदीप मुळिक (वय २२, रा. दत्तनगर, आंबेगाव ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, त्याला इंजेक्शन पुरवणाऱ्या नर्सकडे चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली.
 
 
भारती विद्यापीठ परिसरात एक व्यक्ती रेमडीसीव्हीर इंजेक्शन अधिक किमतीत विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अधिक किमती इंजेक्शन देताना पृथ्वीराज मुळीक याला अटक केली. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकातील पोलीस कर्मचारी गणेश ढगे यांना शहरातील रेमडीसीव्हीरच्या काळाबाजाराची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली कात्रज परिसरात सापळा रचला.
 
 
रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पोलिसांची दहा विशेष पथके नेमण्यात आली आहेत. रेमडीसीव्हीर चढ्या दराने विक्री करणाऱ्याकडे एक बनावट ग्राहक पाठवण्यात आला. जास्त दराने औषध दिल्यानंतर पोलिसांनी मुळीकला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने मैत्रीण असलेल्या नर्सकडून रेमडीसीव्हीर इंजेक्शन घेतल्याची कबुली दिली.
 
 
पोलिसांनी हिंजवडीतील हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असलेल्या महिलेकडे चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. आरोपी रेमडीसीव्हीरचे इंजेक्शन सात हजार रूपयांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.