थांबा... मृतदेह रांगेत आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

covid _1  H x W
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचं भयानक वास्तव सध्या समोर येतंय. गेल्यावर्षी आलेल्या या कोरोनाच्या महाभयंकर साथीनंतर आता महाराष्ट्रावर दुसऱ्या लाटेचं संकट घोंघावतंय. रोज समोर येणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता महाराष्ट्रावरील हे संकट अधिकच दाट होताना दिसतंय. यासर्वांचा ताण आता राज्यतील विविध भागातील स्थानिक आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनावर पडू लागलाय. एकीकडे सर्वसामान्यांना सर्व ठप्प झाल्याने पोटाची खळगी भरण्याची चिंता सतावतेय तर दुसरीकडे पुन्हा एकदा स्मशानभूमीत मृतदेहांचा खच लागतोय. अहमदनगर शहरातील भयाण वास्तव सांगणारा महाएमटीबीचा हा रिपोर्ट....

अहमदनगरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोनामुळे आत्तापर्यंत १२७० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने काल दिलेल्या आकडेवारीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. त्यामुळे संख्येचा ताळमेळ बसत नाही. अहमदनगर जिल्हयात सध्या ११ हजार २३७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या शहरात अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसागणिक वाढ होतेच आहे. यामुळे अहमदनगरच्या अमरधाममध्ये समोर आलेलं हे हृदयद्रावक वास्तव संपूर्ण महाराष्ट्राचे मन हेलावणारे आहे. एकीकडे अमरधाम मध्ये सरणावर एकाचवेळी २२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलीय.तर दुसरीकडे विद्युत दाहिनीत दिवसभरात २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजे दिवसभरात तब्बल ४२ जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच समोर आलंय.इतकंच नाही तर शववाहिनीतून एकाचवेळी सहा मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढावलीय. महापालिकेकडे एकच शववाहिनी आहे.त्यात एकाचवेळी अनेक मृतदेह कोंबून नेले जातात. विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती आणि यंदाही तेच.

नगरचा नाही तर आज संपूर्ण राज्यातीलच परिस्थिती गंभीर आहे. गतवर्षी आलेल्या या संकटात महाराष्ट्रानं अनुभवलेला आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार पाहता मध्यंतरीच्या काळात राज्य शासनाकडून अधिक चांगल्या आरोग्य व्यवस्था उभारल्या जाव्यात अशीच इच्छा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने व्यक्त केली होती. मात्र मागील २ ते ३ दिवसात राज्यात उद्भवलेली परिस्थिती, राज्यात असलेली ऑक्सिजनची कमी, व्हेंटिलेटर बेड्सची कमी, रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध नाहीत ही जबाबदारी नेमकी कोणाची ? केवळ लॉकडाऊन करून परिस्थिती तात्पुरती नियंत्रणात आणण्यावर सरकार भर देते मात्र परिस्थिती नियंत्रणात येताच सरकारचे आरोग्य व्यवस्थेवरून दुर्लक्ष्य होते आहे का? गेल्यावर्षीही महाराष्ट्राने ही भीषणता अनुभवली तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सरकारने आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी केलेली दिरंगाईच याला करणीभूत ठरली आहे का? हा सवाल महाराष्ट्रातील जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या सभोवतालची परिस्थिती गंभीर होतेय, त्यामुळे आपणच काळजी घेऊया, घराबाहेर निघताना मास्क लावणे, बाहेरून आल्यावर हात धुणे आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत असल्यास तात्काळ उपचार घेणे.


@@AUTHORINFO_V1@@