
ठाणे : मुंबई-ठाण्यासह राज्यात लशींचा तुटवडा निर्माण झाला असुन लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. ठाण्यातही लसींसाठी नागरिक उन्हातान्हात ताटकळत राहुनही लशीविना हात हलवत परतावे लागत आहे.अशा स्थितीत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सिव्हील रुग्णालयात सहकुटुंब लस घेतल्याने सर्वसामान्य ठाणेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडुन नाना तऱ्हेच्या नियमांची अंमलबजावणी करीत तारेवरची कसरत सुरू आहे.तर,दुसरीकडे कोविड चाचण्या व लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे.लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना तिष्ठत राहावे लागले असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सहकुटुंब लसीकरण करून घेतले. जिल्हा (सिव्हील) रूग्णालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडील,पत्नी आणि सून अशा कुटुंबियांसोबत कोरोनाची लस घेतली.