आवाजाचा बादशाह किरण खोत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2021   
Total Views |

kiran khot_1  H


कमावलेलं आयुष्यभर,
क्षणात जळून खाक झालं,
रात्रभर डोळ्यांसमोर
सगळं बेचिराख झालं,
गेलं होतं नव्हतं ते आगीच्या गोळ्यात लपेटून
ड्रिम माझं मॉलमधलं
बघता बघता राख झालं...
या भावना आहेत आगीत जळालेल्या स्टुडिओच्या मालकाचं. एका मराठमोळ्या उद्योजकाचं. गेल्या आठवड्यात भांडुपच्या ड्रिम्स मॉलला आग लागली. त्यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या गाळ्याने पेट घेतला. सगळं जळून फक्त राख राहिली. मात्र त्यांनी जिद्द सोडलेली नाही. उलट दुसऱ्या शाखेत लवकरंच रेकॅार्डिंग स्टुडिओ सुरु करण्याचा निश्चय केला आहे. हा निश्चयी आणि जिद्दी उद्योजक म्हणजे आवाज इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संस्थापक किरण विलास खोत.

किरणचं कुटुंब म्हणजे टिपिकल मध्यमवर्गीय. त्याचे बाबा विलास खोत एमटीएनएल मध्ये नोकरीस होते तर आई महानगरपालिकेमध्ये शिक्षिका. या दाम्पत्यांना दोन मुलं. मोठा किरण तर धाकटा विकास. दोघांवर लहानपणापासून उत्तम संस्कार केले. किरणचं शालेय शिक्षण आई असलेल्या भांडुपच्या महानगरपालिकेच्या शाळेत झालं. त्यानंतर दहावीपर्यंत यशवंत चांदजी सावंत विद्यामंदिरात दहावीपर्यंत किरण शिकला. भांडुपच्याच नवजीवन कॅालेजमध्ये अकरावी-बारावी झाली. तर बी. कॉमचं पहिलं वर्षं भांडुपच्याच मेनन महाविद्यालयात गेलं. त्यानंतर मात्र पुढचं शिक्षण मुंबई विद्यापीठातून दूरस्थ शिक्षण पद्धतीने झालं. त्याला कारण पण तसंच होतं. किरणला संगीताची, वाद्यवृंदाची लहानपणापासून आवड. आपली आवड भागविण्यासाठी तो भांडुपच्या एका बॅन्जो पथकात कि बोर्ड वाजवायला जायचा.

या पथकातला वाद्य वाजवणारा किरणचा मित्र एका शाळेत संगीत वाद्य शिकवायला जायचा. काही कारणास्तव तो त्या शाळेत जाऊ शकणार नव्हता. किरणला त्याने त्याच्या ऐवजी जाण्याची विनंती केली. किरण त्या शाळेत गेला. श्री सरस्वती विद्यामंदीर या शाळेतील संचालिका शिक्षकांना व विद्यार्थ्यांना त्याचं संगीत शिकवणं आवडलं. त्यांनी त्याला संगीत शिकवण्याचा प्रस्ताव दिला. ३००रुपये मानधन सुद्धा ठरलं. वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्गात शिकणार्‍या किरणला ही संधी खूप मोठी वाटली. संगीत शिक्षकच व्हायचं असं स्वप्नच त्याने मग उराशी जपलं. यासाठी त्याने पुढील शिक्षण दूरस्थ पद्धतीने शिकण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने त्याने बी. कॉम पूर्ण केलं. त्यानंतर आयसीएफए या संस्थेतून एमबीए सुद्धा पूर्ण केलं.

किरणने मनुष्यबळ या विषयातून एमबीएची पदवी मिळविल्याने शाळेने किरणला कनिष्ठ लिपिकाची नोकरी दिली. मनुष्यबळ, प्रशासन आदी विभागात त्याने साडेसहा वर्षांचा अनुभव कमावला. दरम्यान वाद्यवृंदाचे कार्यक्रम आणि छोट्या-मोठ्या कार्यक्रमाचे निवेदन चालूच होते. एकदा भांडुप मध्ये काव्यसंमेलनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण करत होता. याच कार्यक्रमात आकाशवाणीचे लायब्ररीयन उपस्थित होते. त्यांना किरणचं सूत्रसंचालन आवडलं. त्यांनी किरणला आकाशवाणी मध्ये सूत्रसंचालक अर्थात ‘आरजे’ होण्याचा सल्ला दिला. किरणने आवाजावर संस्कार करणारा आकाशवाणीचा ‘वाणी’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. जेष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या सारख्या जेष्ठांचं किरणला मार्गदर्शन लाभलं. अशाप्रकारे किरण आता निवेदक म्हणून काम करु लागला. रात्री चर्चगेटच्या आकाशवाणीच्या गेस्ट हाऊस मध्ये झोपून पहाटे कार्यक्रमाचे निवेदनाचे काम करायचा. अशाप्रकारे आवाजाची आणि स्वरांची साधना त्याची चालू होती.

आई- वडिलांची इच्छा म्हणा किंवा त्या काळची पद्धत, एका चांगल्या कंपनीत कायमस्वरुपी नोकरी मिळाली की घोडं गंगेत न्हाल्याचं समाधान मिळण्याचा तो काळ. किरणला सुद्धा अशाच नोकरीची गरज होती म्हणून त्याने नोकरीसंदर्भातील एका संकेतस्थळावरुन लार्सन ऍण्ड टुब्रो या बहुराष्ट्रीय कंपनीत अर्ज केला. मुलाखतीच्या पहिल्या फेरीत किरणच्या उत्तराने प्रभावित झालेल्या मॅडमने त्याला दुसर्‍या फेरीत पाठवले. तेथील अधिकारी देखील प्रभावित झाले आणि त्यांनी किरणला कंत्राटी पद्धतीवर न घेता थेट सेवेत स्विकारलं. कदाचित अशा पद्धतीने नोकरीत सामावणारा तो त्या शाखेतील पहिलाच कर्मचारी असावा. या नोकरीत त्याने स्वत:चा ठसा उमटवला. कुणाचा वाढदिवस असला कि वेगळ्या पद्धतीने तो साजरा कर. वेळेप्रसंगी त्यासाठी तो स्वत:च्या खिशातील पैसे देखील खर्च करत असे. माणूस जोडण्याच्या त्याच्या स्वभावामुळे मनुष्यबळ विभागात किरण खोत नाव गाजू लागलं. त्यानंतर त्याची बदली मनुष्यबळाच्या दुसर्‍या विभागात झाली. तिथे थेट माणसांशी संबंध नव्हता. सगळेच संगणक. इथे कुठेतरी एककल्लीपणा येत असल्याची त्याला जाणीव झाली. माणसांत रमणार्‍या किरणला अशा एककल्ली गोष्टींची सवय नव्हती.

दरम्यान याच वेळी किरणला उम्मीद या एका सामाजिक संस्थेत मुख्य मनुष्यबळ विभाग अधिकारी पदाच्या नोकरीचा प्रस्ताव आला. पगार सुद्धा वाढला होता. किरणला मनुष्यबळ विभागाचा प्रमुख म्हणून काम करायचंच होतं. त्याने ती नोकरी स्विकारली. विशेष मुलांसाठी ही संस्था कार्यरत होती. तिथला संपूर्ण मनुष्यबळ विभाग किरणने प्रस्थापित केला. अडीच वर्षे नोकरी केल्यानंतर त्याने ती नोकरी सोडली. यावेळेस त्याचं स्वप्न होतं ते संपूर्ण काचेच्या इमारतीत कार्यालय असणार्‍या कंपनीत काम करण्याचं. त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. आयसीआयसीआय फाऊंडेशन या बहुराष्ट्रीय कंपनीत त्यास नोकरी मिळाली.

एकीकडे निवेदनाचे कार्यक्रम किरण करतच होता. अशाच एका उद्योजकांच्या कार्यक्रमात एक वक्ता आलेला. त्या वक्त्याचं वाक्य किरणच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेलं. तुमचा हातखंडा असेल अशाच क्षेत्रात काम करा. त्यामुळे तुम्हांला समाधान मिळेल आणि पैसा देखील. हे वाक्य किरणच्या मनात रुंजी घालू लागलं. त्याने रात्रभर विचार केला आणि नोकरी सोडून उद्योगक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने त्याचे कुटुंबिय व्यथित झाले. साहजिकच होतं ते कारण उद्योगात येणारा खोत कुटुंबातील तो पहिला होता. या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी तो एक धक्काच होता. मात्र किरणने कुटुंबाकडून एका वर्षाची हमी घेतली. आणि २०१७ साली आवाज इन्स्टिट्यूट फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आकारास आले. याचवेळी एक आयडिया किरणच्या डोक्यात आली.त्याने एका हितचिंतकाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक गाणं स्वत:च लिहून, त्याला संगीतबद्ध करुन त्याच्याच आवाजात रेकॉर्ड केलं. ही वेगळ्या स्वरुपाची भेट होती. त्यांनी ते व्हॉट्सऍप वर व्हायरल केल. अभिषेक विचारेंच्या प्रयत्नातून पुढे हे गाणं स्वप्निल बांदोडकरांच्या आवाजात मुद्रीत झालं. या गायकाने सुद्धा किरणचं तोंडभरुन कौतुक केलं. पुढे रिचमंड एन्टरटेनमेंट या कंपनीने किरणला सीईओ म्हणून नियुक्त केलं. किरणने या कंपनी साठी विविध गायकांना घेऊन अनेक गाणी ध्वनीमुद्रीत केली. अगदी सुरेश वाडकर,रविंद्र साठे पासून ते श्रेया घोषाल पर्यंत सर्व प्रथितयश गायकांसोबत त्याने काम केले.

सामान्य माणसाला गाणं गाता यावं याकरिता त्याने आवाज फाऊंडेशनची स्थापना केली. शास्त्रीय गायना सोबतच मनाला समाधान वाटेल असं गाणं गाण्याची इच्छा असणार्‍यांसाठी ही संस्था कार्य करते. भविष्यात दर वर्षी 1 हजार मुलांना गायक म्हणून घडविणे आणि निदान पाच देशांत आवाज संस्था प्रत्यक्षात पोहोचविणे किरण खोत यांचं स्वप्न आहे.याच स्वप्नपूर्तीसाठी किरण खोत यांनी ड्रिम्स मॉलमध्ये स्वमालकीचा एक गाळा विकत घेतला. तो देखील अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वी. सगळी स्वप्न आता आवाक्यात आली असं वाटत असताना या मॉलला आग लागली. होत्याचं नव्हतं झालं. मात्र याचवेळी कमावलेली माणसं मदतीला आली.पराग विदयालयात भाडे तत्वावर पराग बने यांनी यापु्वीच त्यांच्या भांडुप येथील शाळेचा तळमजल्यावर अतिरिक्त शाळेसाठी जागा दिली होती. आवाज तिथे दिमाखात सुरुच आहे. जिद्द हरेल तो किरण कसला. पुन्हा नव्याने आणि जोमाने उभं राहत कदाचित येत्या गुढीपाडव्याला नवा रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरु करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. त्यांची ही जिद्द कोणत्याही उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची जिद्द त्यांनीच लिहीलेल्या पुढील ओळीतून अधोरेखित होते.
पण शपथ आहे सरस्वतीची,
याहून दुप्पट करुन दाखवेन
हातापायानं, गळ्यानं काम करुन,
झालेलं नुकसान भरुन दाखवेन
पुन्हा कष्टाने कमावेन सगळं,
मी असा सोडणार नाही परमेश्वर सोबत असेलच
थोडा वाकलोय पण मोडणार नाही
थोडा वाकलोय पण मोडणार नाही.
हीच वेळ आहे किरण खोत या उद्योजकाच्या पाठिशी उभं राहण्याची. किरण खोत आपल्या जिद्दीला सलाम.

@@AUTHORINFO_V1@@