मग मिरची का झोंबली?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2021   
Total Views |

congress_1  H x



केरळ निवडणुकीच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बायबलमधील एका कथेचा संदर्भ देत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर निशाणा साधला. ज्याप्रमाणे जुडासने पैशांसाठी येशूशी दगाबाजी केली, त्याचप्रमाणे विजयन यांनी सोने तस्करी करून जनतेला फसवल्याची टीका यावेळी मोदींनी केली होती. मोदींच्या या टीकेची मिरची झोंबली ती काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांना. विजयन यांच्यावर मोदींनी केलेला हल्लाबोल रुचला नाही म्हणून नव्हे, तर मोदी बायबलचा संदर्भ देऊच कसा शकतात, म्हणून प्रियांका गोंधळात पडल्या. त्यांच्या मते, केवळ केरळमधील ख्रिश्चन मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदींनी ती कथा सांगितल्याचा आरोप त्यांनी केला.


खरंतर प्रियांका असो अथवा राहुल गांधी, यांच्या टीकेला फारसे गांभीर्याने घेण्याचे अजिबात कारण नाही. पण, त्यांच्यातर्फे मोदींची एक विशिष्ट जातीधर्माचे नेते अशी प्रतिमा रंगवून इतर धर्मीयांच्या मनात विष पेरण्याचे प्रयत्न सर्वस्वी निंदनीय आहेत. प्रियांका गांधींच्या बालीश टीकेतून त्यांचे अज्ञानच खरंतर झळकते. कारण, मोदी गेल्या तीन दशकांपासून राजकीय पटलावर सक्रिय आहेत आणि त्यांचे मित्र, विरोधक आणि जनताही हे चांगलेच ओळखून आहे की, मोदी जिथे जातात, ते तिथला पेहराव करून, भाषा बोलून त्या-त्या प्रदेशातील जनतेची मनं जिंकून घेतात. त्यामुळे केरळमध्ये त्यांनी बायबलमधील एखादी कथा सांगितली, तर त्यावरून आकाश-पाताळ एक करण्याचा आततायीपणा करून काय साध्य होणार? विशेष म्हणजे, मोदींवर त्यांनी बायबलमधील कथा सांगितली म्हणून तोंडसुख घेणार्‍या प्रियांका गांधींनी दिल्लीत आपण कशी ‘मदर टेरेसा मिशनरीज चॅरेटी’सोबत रुग्णसेवा केली, हे सांगत स्वत:चीच पाठ थोपटवून घेतली. मग प्रियांका गांधींना मदर टेरेसांच्या नावाखाली आपली अशी स्वस्तुती करण्याचा मोह का बरं आवरला नाही? एवढेच नाही तर उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर असताना गंगेत डुबकी कुणी मारली होती? आसाममध्ये चहाच्या मळ्यात मजुरांसोबत चहाची पाने खुडण्याचे फोटोसेशन कुणी केले होते? तेव्हा, आधीच आजोळकडून ख्रिश्चन असलेल्या प्रियांका गांधींनी नाहक सेक्युलरवादाचे ढोंग मुळी करूच नये. कारण, मोदी कोणा एका जातीधर्माचे नव्हे, तर एकतेच्या धागेने गुंफलेल्या भारताचे पंतप्रधान आहेत, हे स्मरणात ठेवावे.

असत्यवादी युवराज...

काँग्रेसचे माजी आणि भावी अध्यक्ष युवराज राहुल गांधी सध्या पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त सभा घेत फिरत असतात. या पाच राज्यांपैकी खरंतर एकाही राज्यात आपली सत्ता येण्याची सूतराम शक्यता नाही, याची जणू त्यांना खात्री पटल्यामुळेच बिथरल्याप्रमाणे राहुल गांधी हल्ली काहीबाही बरळताना दिसतात. नुकतेच आसामच्या एका प्रचारसभेत युवराज म्हणाले की, “मी, फक्त सत्य बोलतो. खोटे ऐकायचे असेल तर टीव्ही सुरू करा आणि आठवड्यातले सात दिवस २४ तास खोटे बोलणार्‍या मोदींचे भाषण ऐका.” आता राहुल यांच्या या बालीश विधानावरूनच त्यांची दिवसेंदिवस खालावत जाणारी राजकीय पातळी लक्षात यावी. मोदींचे खरेखोटे ठरवण्यासाठी या देशातील जनता सक्षम आहे आणि २०१४, २०१९मध्ये मतपेटीतून जनतेने आपला कौलही दिला. मग त्या न्यायाने मोदींच्या पारड्यात जनमताचा कौल देणारी जनताही राहुल गांधींना खोटारडी वाटते का, याचे त्यांनी उत्तर द्यावे. खरंतर खोटेपणाचे सगळे रेकॉर्ड खुद्द राहुल गांधींनीच वेळोवेळी मोडले. मग ते प्रकरण ‘राफेल’ विमानांच्या खरेदीचे असेल, ‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे, अथवा चीनने भारतीय जमीन बळकावल्याचा आरोप असेल, राहुल गांधी अगदी रेटून खोटे बोलले आणि नंतर तोंडघशीही पडले. परंतु, मुळातच ना स्वभावात आणि ना राजकीय कारकिर्दीत गांभीर्य असणार्‍या राहुल गांधींनी जनतेला मात्र वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन मूर्ख बनवण्याचेच उद्योग केले.

मशीनमध्ये एकीकडून बटाटा टाकला की दुसरीकडून सोने निघेल, हा असाच एक राहुल गांधी नावाच्या राजकीय संशोधकाचा जावईशोध! तेव्हा, राहुल गांधींनी उगाच मोदींवर आणि भाजपवर आगपाखड करण्यापेक्षा काँग्रेसची आजची अवस्था काय आणि भविष्यात काय होईल, याचाच केवळ आणि केवळ विचार करावा. ‘जी-२३’ काँग्रेस गटातील नेत्यांचेही जरा म्हणणे ऐकावे आणि पक्षात खर्‍या अर्थाने घराणेशाहीऐवजी लोकशाही कशी नांदेल, यासाठी पावले उचलण्याची तसदी घ्यावी. त्यासाठी वाटल्यास पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाची तारीख असलेल्या २ मेचा मुहूर्त काढावा. कारण, त्या दिवशी काँग्रेसमध्ये एकदिवसीय आत्मपरीक्षणाचे नुसते वारेच वाहतील. पक्ष जिथे आहे, तिथेच आणि तसाच राहील. कारण, जिथे नेतृत्वच असत्याचे तिथे पक्ष तरी कुठून सत्याची कास धरणार?

@@AUTHORINFO_V1@@