यमगरवाडीची स्वयंसिद्धा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2021   
Total Views |

III _1  H x W:




यमगरवाडी प्रकल्पामध्ये सहशिक्षिका म्हणून प्रणिता मिटकर कार्यरत आहेत. मळलेल्या वाटेवरून न जाता, त्यांनी प्रकल्पामधील मुलांसाठी नवनवीन उपक्रम राबविले. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
 
 
सुरुवातीला ‘पालावरची शाळा’ या अभिनव उपक्रमात प्रणाली मिटकर दोन वर्षे काम करायच्या. पालावरच्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे, मुलांच्या सोयीनुसार सुरू होणारी विना भिंतीची शाळा! पाटी, पुस्तक, फळा यांच्या आधाराशिवाय ही शाळा चालते. दगडगोटे, पाने, फुले ही शैक्षणिक सामग्री असते. त्या-त्या मुलांच्या बोलीभाषेनुसार अभ्यासक्रम असतो. पुढे त्या ‘एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत’ सहशिक्षिका म्हणून रुजू झाल्या.
 
 
या कामात भाषेची खूप अडचण यायची. कारण, विद्यार्थी भटक्या-विमुक्त समाजाचे. त्यांना केवळ बोलीभाषा अवगत. मग त्यांना प्रमाण मराठी भाषेत शिकवले तरी त्यांना समजण्यास कठीण जायचे. त्यामुळे त्यांच्या बोलीभाषेतील शब्दाला मराठी समानाअर्थी शब्द शोधून त्यानुसार त्या मुलांना शिकवू लागल्या. त्यामुळे मुलांना शिकवणे आणि मुलांना समजणेही सुलभ झाले. मुले आवडीने शिकू लागली. विद्यार्थ्यांची शाळेतली गळती कमी झाली.
 
 
मुलांनी केवळ शालेय अभ्यास करणे, हे प्रणाली यांना कधीच पटले नाही. त्यामुळे मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करणे, जसे प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वाचन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, सुंदर दप्तर स्पर्धा, विविध कलागुण सादर करणार्‍या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, अशा स्पर्धा त्या आयोजित करू लागल्या. मुलांना आपल्या समाजाचा आणि देशाचा खरा उज्ज्वल इतिहास माहिती असावा, यासाठी उपक्रम सुरू केला. बोलीभाषेव्यतिरिक्त मराठी, हिंदी, इंग्रजी चांगल्या प्रकारे अवगत व्हावी, यासाठी उपक्रम सुरू केले. त्यामुळे झाले काय, अभ्यासासोबतच मुलांनी विविध कलागुणांत, क्रीडा प्रकारात प्रावीण्य प्राप्त केले. त्यामुळे पुढे आयुष्यात मुलं सहज यश मिळवत गेली.
 
 
यासाठी त्यांना महाराष्ट्रभरातून अनेक पुरस्कार मिळाले. पण, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार हाच होता की, आपल्या यमगरवाडीतली मुलं शिकून-सवरून नावारूपाला येत आहेत. या सगळ्या कामात त्यांचे पती उमाकांत मिटकर यांचा प्रणिता यांना मोठा पाठिंबा लाभला. भटक्या-विमुक्त समाजातील मुलांनी शिकावे, यासाठी त्यांनी सारे आयुष्य अर्पण केले. त्यांचे जीवन पाहून प्रणाली यांना नेहमीच प्रेरणा मिळते.
 
 
प्रणाली जेव्हा तिसरीला होत्या, तेव्हा लातूरला भूकंप झाला. त्यांच्या नदी हत्तरगा इथेही बरेच नुकसान झाले. पण, जीवितहानी झाली नाही. शाळा कोलमडून गेल्या. जिथे घरदार पडलेली, तिथे मुलांसाठी शाळा कशी उरेल? त्यावेळी ज्यांच्या गावात रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आले. त्यांनी लातूरला वसतिगृह, शाळा तत्काळ उभी केली. ते गावकर्‍यांना विनंती करत होते की, मुलांचे शिक्षण पूर्ण करा. वर्ष वाया घालवू नका. मुलांना लातूरला शाळेत पाठवा. प्रणिता यांचे वडील राजेंद्र शेटकर हे शेतकरी, तर आई सविता गृहिणी. त्यांनी ठरवले की, प्रणिता यांना त्या शाळेत घालायचे. त्या शाळेत गेल्या आणि त्यांच्या आयुष्यात, विचारात आमूलाग्र बदल झाला.
 
 
तिथे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक यायचे. त्यांचे साधेपण आणि उच्च वैचारिकता, तसेच त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना दिलेला स्नेह, मुलांना कसलाच त्रास होऊ नये, यासाठी डोळ्यात तेल घालून केलेली सेवा, या सार्‍याचा प्रभाव प्रणाली यांच्यावर पडला. त्यामुळे त्यांना लहानपणीही वाटत असायचे की, ही रा. स्व. संघाची माणसं म्हणजे देवमाणसं आहेत, नाहीतर दुसर्‍यांच्या लेकरांकरिता कोण इतकं कष्ट घेईल? तर त्यांच्याकडे पाहूनच प्रणाली यांनी ठरवले की, आपणही अशीच समाजाची निःस्वार्थी सेवा करायची. नववीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढे त्या पुण्यात काकांकडे शिकायला आल्या. शिक्षण पूर्ण करून पुन्हा ‘बी.एड.’च्या शिक्षणासाठी लातूरला आल्या.
 
 
‘बी.एड.’ झाल्यानंतर त्यांच्या मनात प्रकर्षाने आले की, आपण जशा वसतिगृहात शिकलो, तशाच वसतिगृहात एक-दोन वर्षे तरी शिक्षणसेवा करावी. थोडक्यात, त्या लहान असताना संघ स्वयंसेवक जे निःस्वार्थी सेवाकार्य करायचे, ते सेवाकार्य प्रणिता यांनाही करायचे होते. त्याच काळात त्यांना कळले की, यमगरवाडीत वसतिगृह सुरू झाले आहे. त्यांनी आईवडिलांना या निर्णयाबाबत सांगितले आणि यमगरवाडीत शैक्षणिक कार्यात त्या रुजू झाल्या. बघता बघता वर्ष संपले आणि त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळाली. त्यावेळी प्रणिता यांच्या आईवडिलांना, नातेवाइकांना खूप आनंद झाला. पण, प्रणिता यांचा यमगरवाडीतून पाय काही निघत नव्हता. त्यातच त्यावेळी रा. स्व. संघाचे गिरीश कुबेर यमगरवाडीत एका बैठकीसाठी आले होते.
 
 
त्यांना प्रणिता यांनी सांगितले की, “जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लागत असून घरचे म्हणतात की, तू यमगरवाडीतून परत ये.” यावर कुबेर म्हणाले की, “तू, यमगरवाडीतही नोकरी करू शकतेस.” त्यांचा प्रस्ताव प्रणिता यांना मनापासून योग्य वाटला. त्यांनी आईवडिलांना सांगितले की, “मी, यमगरवाडीतच सेवाभावी नोकरी करेन,” तेव्हा प्रणिता यांचे आईवडील म्हणाले, “तुला योग्य वाटेल ते कर.” मात्र, त्यांचे काका खूप रागावले. “त्या भटक्या-विमुक्त मुलांमध्ये तू आयुष्य घालवणार? कोण, कुठची मुलं ती; तुला त्यांच्यासाठी तिथे जायचे आहे?” ते संतापून बोलत होते. पण, तोपर्यंत प्रणिता यांचा निर्णय पक्का झाला होता की, जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरा शिक्षक मिळेलही.
 
 
पण, यमगरवाडीतल्या माझ्या विद्यार्थ्यांसाठी तिथे गेलेच पाहिजे. त्यांनी बॅग भरली आणि त्या यमगरवाडीला आल्या. आले ते माहेर-सासर इथेच झाले. प्रणिता म्हणतात की, “पुढेही श्वासात श्वास असेपर्यंत मला या मुलांसाठी काम करायचे आहे. त्यांना खूप मोठे होताना पाहायचे आहे. ध्येय, त्याग वगैरे म्हणण्यापेक्षा या कामातच माझे आयुष्य आहे. रा. स्व. संघांच्या प्रचारकांसारखे निरपेक्ष, निःस्वार्थी सेवाकार्य मला करायचे आहे.” प्रणितांच्या ध्येयाला नमन आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@