नामांतराचा इतिहास जुनाच!

    08-Mar-2021
Total Views |

Namo _1  H x W:
 
 
क्रिकेट विश्वात नामांतराचा इतिहास हा काही नवीन नाही. याआधीही अनेक मैदानांचे नामांतर केल्याची उदाहरणे इतिहासात आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतरच नामांतर प्रक्रियेला विरोध करणे म्हणजे हा राजकीय द्वेष आहे, असे म्हटल्यास कदाचित ते चुकीचे ठरणार नाही. कारण, नवी दिल्ली येथील फिरोज शाह कोटला मैदानाचेदेखील याआधी नामांतर करण्यात आले होते. ‘दिल्ली क्रिकेट असोसिएशन’ने (डीसीए) फिरोज शाह कोटला मैदानाचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या नावे नामकरण केले होते. जेटली हे एकेकाळी ‘दिल्ली क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदीही होते. दिल्ली क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतल्यानंतर त्यांच्या निधनानंतर ‘दिल्ली क्रिकेट असोसिएशन’ने फिरोज शाह कोटला मैदानाचे अरुण जेटली यांच्या नावाने नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या नामांतरास काहीच विरोध झाला नाही. परंतु, पंतप्रधान मोदी यांचे नाव दिल्यानंतर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व स्तरावरून विरोध होण्यास सुरुवात होणे म्हणजे हे राजकीय द्वेषापोटी विरोध करण्यासारखेच आहे. कारण, क्रिकेट विश्वातून या प्रक्रियेवर काहीच आक्षेप घेण्यात आला नाही. क्रिकेट विश्वाशी संबंधित कोणत्याही आजी-माजी खेळाडूंकडून अथवा प्रशिक्षकांकडून याविरोधात कोणताही आक्षेप नोंदवण्यात आला नाही. या विरोधात टीका करण्यात आली ती केवळ आणि केवळ राजकीय वर्तुळातूनच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले राजकीय विरोधक मानणार्‍या नेत्यांनी माध्यमांसमोरच नाही, तर अधिवेशनाच्या सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत यावरून टीका करण्यास सुरुवात केली. हा निर्णय कसा चुकीचा आहे, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्या मैदानास पंतप्रधान मोदी यांचे नाव का देण्यात आले नाही, हे जाणून घेण्याचा कधीच त्यांनी प्रयत्न केला नसावा, म्हणूनच कारण नसतानाही उगाचच यावरून राजकारण तापविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील राजकीय टीकेमुळे हा मुद्दा काही माध्यमांनीही उचलून धरला. मात्र, त्यामागील पार्श्वभूमीही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे होते, असे समीक्षकांचे म्हणणे आहे.
 
 

नावात काय राव?

 
 
कोणत्याही बाबीमध्ये नावापेक्षा कर्तृत्वाचे पारडे हे नेहमीच जड असते. कर्तृत्व वाखाणण्याजोगे असल्याने संबंधितांच्या नावाचीही बरीच प्रशंसा होत असते. मात्र, बर्‍याचदा संबंधितांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केल्यास ‘नाम बडे दर्शन छोटे’ याचाही प्रत्यय अनेकदा येत असतो. त्यामुळे नावापेक्षा कर्तृत्वच श्रेष्ठ मानले जाते. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांदरम्यान नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेदरम्यान अहमदाबाद येथील मोटेरा मैदानास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतर भारतीय संघ या स्टेडियमवर आता एकही सामना पराभूत होणार नाही, अशी टोलेबाजी काही विरोधकांकडून करण्यात आली. केवळ प्रसारमाध्यमांसमोर ही टीका न करता विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहांतदेखील यावरून जोरदार टोलेबाजी करण्यात आली. क्रिकेटच्या वर्तुळात राजकीय टोलेबाजीचे फटाके फुटताच क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले. मैदानास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतर भारतीय संघाच्या विजयाचा आणि पराभवाचा संबंध कसा जोडला जाऊ शकतो, याविषयी मंथन सुरू झाले. भारतात जवळपास २९ क्रिकेट स्टेडियम आहेत. यांपैकी एकाही स्टेडियमला आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांचे नाव नव्हते. पंतप्रधान मोदी हे एकेकाळी गुजरातचे मुख्यमंत्री असल्याच्या काळापासून मोटेरा स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न त्यांनी केले होते. अनेक क्रिकेट संघटनांनी त्यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, केवळ गुजरात सरकारच्या निर्णयाने हा प्रश्न मार्गी लागणार नव्हता. यासाठी लागणार्‍या परवानग्या तत्कालीन केंद्र सरकार आणि क्रिकेट नियामक मंडळाशी संबंधित असल्याने विविध परवानग्या प्रलंबित असल्याने या मैदानाच्या नूतनीकरणाचे काम रखडले होते. परंतु, केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हा प्रश्न मार्गी लावला. या मैदानाच्या नूतनीकरणाचे काम मार्गी लावल्यानंतर या मैदानाला पंतप्रधान मोदींचे नाव देण्यात आले, तर याच ठिकाणी परिसरात उभारण्यात आलेल्या संपूर्ण क्रीडा संकुलाला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव देण्यात आले. मोदींनी केलेल्या कामांची दखल घेऊन त्यांचे नाव मैदानास देण्यात आले. मात्र, त्यांचे नाव दिल्याने आता भारतीय संघ या मैदानावर कधीच पराभूत होणार नाही, अशी टीका करून नामांतर प्रक्रियेला विरोध करणे हे चुकीचे आहे, असे मत अनेक क्रिकेट समीक्षकांचे आहे.



- रामचंद्र नाईक