सावध! ऐका पुढल्या हाका...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2021   
Total Views |

Burkha _1  H x

स्वित्झर्लंड... ‘युरोपचा स्वर्ग’ म्हणून आपली निसर्गसंपन्न ओळख जपणारा एक लोकशाहीप्रधान देश. फ्रान्स, स्वीडनप्रमाणे हा देश इस्लामिक कट्टरतावादाच्या कधीही केंद्रस्थानी नव्हता. तरीसुद्धा स्वित्झर्लंडच्या जनतेने एकमताने मोठा निर्णय घेतला. निर्णय सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाबबंदीचा! इथे एक गोष्ट प्रकर्षाने नमूद केली पाहिजे की, हा निर्णय स्वित्झर्लंड सरकारचा अथवा संसदेचा नसून हा स्वित्झर्लंडवासीयांनी ५१ टक्के मतदानासह दिलेला जनमताचा कौल आहे.
 
 
फ्रान्स, डेन्मार्क हे युरोपमधील असे देश, जिथे बुरखा-हिजाबवर पूर्णपणे किंवा अंशत: बंदी आहे. त्यामागचा उद्देश हाच की, बुरखा-हिजाबमुळे चेहरा पूर्णपणे झाकून सार्वजनिक ठिकाणी त्याचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होऊ नये. कारण, बरेचदा बुरखा-हिजाबला स्पर्श न करता, पोलिसांवर तपासणीची वेळ येते आणि याचा गैरफायदाही घेतला जातो. पण, तशी वेळ स्वित्झर्लंडमध्ये भविष्यात येऊ नये म्हणून स्वित्झर्लंडवासीयांनी बुरखाबंदीच्या निर्णयाला जनसमर्थन देत एक मोठा निर्णय घेतला. स्वित्झर्लंडमध्ये बुरखा-हिजाब सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्यावर बंदी असेल. परंतु, धार्मिक स्थळी अथवा उत्सवांत मात्र बुरख्याचा वापर करता येईल. साहजिकच या निर्णयावरून स्वित्झर्लंड आणि मुस्लीमजगतातील देशांनी ‘इस्लामोफोबिया’चा आक्रोश केला असून, हा निर्णय सर्वस्वी ‘इस्लामविरोधी’ असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. पण, यानिमित्ताने हाच प्रश्न उपस्थित होतो की, स्वित्झर्लंडवर बुरखाबंदीची वेळ का बरं आली?
 
 
स्वित्झर्लंडच्या एकूण ८.९ दशलक्ष लोकसंख्येपैकी केवळ पाच टक्के लोकसंख्या ही मुस्लीम. या मुस्लीम लोकसंख्येपैकी फक्त ३० टक्केच महिला बुरखा अथवा हिजाब परिधान करत असल्याचे आकडेवारी सांगते. स्वित्झर्लंडमधील ही मुस्लीम लोकसंख्या मूळ तुर्की, युगोस्लाव्हिया या देशातून स्वित्झर्लंडमध्ये कामानिमित्त स्थायिक झालेली. यामध्ये इतर देशांमधून निर्वासित म्हणून दाखल झालेल्यांचाही समावेश आहे. एक मोकळाढाकळा, लिबरल देश म्हणून नावारूपास आलेल्या स्वित्झर्लंडमध्ये मानवी हक्क आणि अधिकारांबाबत प्रचंड जागरूकताही दिसून येते. त्यामुळे बुरखा-हिजाब हे महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्यात एक अडचण ठरतात, असेही स्वित्झर्लंडवासीय मानतात. त्याचमुळे सरकारचा आणि काही पक्षांचा विरोध असतानासुद्धा स्वित्झर्लंडवासीयांनी मात्र बुरखाबंदीचे जोरदार समर्थन केले. हे सार्वमत घेताना कुठेही इस्लामचा साधा उल्लेख करण्यात आला नाही. देशभरात ‘कट्टरतावाद थांबवा’ अशा आशयाचे बुरखा परिधान केलेल्या ‘व्यक्तीचे’ पोस्टर्स लावण्यात आले. या पोस्टर्सवर एक नजर फिरवली असता, बुरख्यामागे दडलेला संशयास्पद चेहरा महिलेचा आहे की पुरुषाचा, असाच प्रश्न पाडावा. अर्थ स्पष्ट आहे - बुरखा परिधान करून कोणत्याही असामाजिक तत्त्वांकडून दहशतवादी कृत्यांना पायबंद बसावा म्हणून घेतलेला हा निर्णय.
 
 
आधी म्हटल्याप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये ‘जिहादी’ दहशतवादाचा प्रश्न फ्रान्स, स्वीडन इतका गंभीर नक्कीच नाही. पण, अशा कट्टरतावादी शक्तींना डोके वर काढण्यापूर्वीच ठेचण्यासाठी बुरखाबंदीचा जनतेनेच पुढाकार घेऊन निर्णय घेतल्याचे दिसते. त्यामुळे भविष्यातील ‘जिहादी संकट’ ओळखून, ‘सावध! ऐका पुढल्या हाका’ या उक्तीनुसार स्वित्झर्लंडवासीयांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. स्वित्झर्लंडमध्ये ‘स्थानिक विरुद्ध मुस्लीम समाज’ असा संघर्ष उफाळून आला नसला तरी इतर युरोपीय देशांतील परिस्थितीचा धसका घेत, कट्टरवाद्यांना धडा शिकवण्याचे वारे इथेही वाहू लागले आहेत, असेच या जनमतावरून म्हणता येईल. स्वित्झर्लंडचा पूर्वेतिहास पाहता, असाच एक जनमताचा प्रस्ताव २००९ सालीही जनतेने उचलून धरला होता. त्यानुसार स्वित्झर्लंडमध्ये कुठेही मिनार उभारण्यावर बंदी घालण्यात आली.
 
 
‘मिनार संस्कृती’शी स्वित्झर्लंडचा संबंध नसून ती या देशात फोफावण्याचे काहीच कारण नाही, असे सांगत हा निर्णय जनतेनेच घेतला आणि त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. कारण, स्वित्झर्लंडमध्ये ‘डायरेक्ट डेमोक्रसी’ अंतर्गत जनता विविध मुद्द्यांवर अशाप्रकारे मतदान करून सार्वमताने निर्णय घेते. मग तो निर्णय सरकारला पटो अथवा न पटो, त्याची अंमलबजावणी करण्याचे दायित्व हे सरकारचेच! तेव्हा, स्वित्झर्लंडने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे तेथील धार्मिक स्थिरता कायम राहते की बिघडते, हे पाहावे लागेल.




@@AUTHORINFO_V1@@