स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर निर्बंध

    08-Mar-2021
Total Views |

burkha ban_1  H
 
 
 
 
नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास बंदी करण्यात आली आहे. यामध्ये बुरखा किंवा कुठल्याही प्रकारचा मुखवटा घालण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे देशामध्ये हा निर्णय मतदानाद्वारे घेण्यात आला आहे. लोकांनी देशातील मुस्लिम महिलांच्या बुरखा घालण्यावर बंदी घालण्यासंदर्भात मंजूरी दिली आहे.
 
 
मतदानानंतर मंजूर झालेल्या या प्रस्तावामुळे आता हॉटेल्स, खेळाची मैदाने, सार्वजनिक वाहतुक तसेच रस्त्यावर चालताना देखील चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, याला काही अपवादांना मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये धार्मिक ठिकाणी जाताना अथवा कोरोनासारख्या आरोग्याच्या कारणांसाठी कोरोनाप्रतीबंधक मास्क घालण्याबाबत सूट राहिल. या प्रस्तावामध्ये थेट इस्लामचा उल्लेख केला गेला नव्हता. मात्र, यास व्यापक रुपाने बुरखा प्रतिबंधाच्या दृष्टीनेच पाहिले जात आहे.
 
 
स्विस ब्रॉडकास्टर कॉर्पोरेशनने सांगितले की, "५० टक्क्यांहून अधिक लोकांनी बुरखा बंदीच्या बाजूने मतदान केके आहे. जवळपास ५१.२१ टक्के मतदान हे बुरखा अथवा मुखवट्याला बेकायदेशीर घोषित करण्याच्या बाजूनने होते. याआधी जनमताच्या सर्वेक्षणांमध्येदेखील याचे संकेत देण्यात आले होते, की बुरख्यावर बंदी आणण्याबाबतचा कायदा बनवला जाणार आहे."
 
 
यावर्षीच्या सुरवातीला ल्यूसर्न युनिव्हर्सिटीने एका सर्वेक्षणामध्ये असा दावा केला होता की, "स्वित्झर्लंडमधील एकही महिला बुरखा परिधान करत नाही. तर, ३० टक्के महिला अशा आहेत, ज्या सार्वजनिक ठिकाणी मुखवटा घालून चेहरा झाकतात. हा प्रस्ताव स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या विरोधातील निर्णय म्हणून पाहिले जात आहे."