विरोधी पक्षनेते फडणवीसांची अर्थसंकल्पातील त्रुटींवरून मविआ सरकारवर टीका
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. पण या अर्थसंकल्पाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. "हा अर्थसंकल्प राज्याचा आहे की एका विशिष्ट भागाचा?" असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मविआ सरकारने विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण टिपणी केली. मुख्य म्हणजे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर झालेल्या विषमतेबाबत त्यांनी सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पात २ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व बोंड अळी, गारपीटीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. ३ लाखांपर्यंत कर्ज घेतल्यास ० टक्के व्याज ही योजना फसवी व केवळ नावापुरती आहे, असेही ते म्हणाले.
मविआ सरकार फक्त आणि फक्त केंद्र सरकारला नाव ठेवायचे काम करत आहे, असं म्हणत फडणविसांनी अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या मुंबईच्या योजनांवरूनदेखील टोले लगावले. "वांद्रे ट्रान्स लिंक, मिठी नदी अशा कामांसाठी जर आत्ताच्या अर्थसंकल्पात निधी देण्यात आला, तर मग मुंबई महानगर पालिकेत यांची तरतूद झाली नाही का?" असा थेट सवाल फडणविसांनी केला. राज्यातल्या तरुणांची व कामगारांची या अर्थसंकल्पात निराशा झाली असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले. त्याचप्रमाणे एकही नवीन योजना आदिवासी आणि सामाजिक भागात सुरू केली नसल्यानेही खेद व्यक्त केला.