समाजशील गृहिणी ते उज्ज्वल उद्योगिनी : शुभांगी पतंगे-बुचडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2021   
Total Views |

mahila din _1  


शुभांगी पतंगे-बुचडे या उद्योजिका आहेत. चार कंपन्यांच्या त्या संचालिका आहेत. त्यांनी पतीच्या साथीने व्यवसायात अतुलनीय यश मिळवले. माहेर-सासरच्यांना अभिमानास्पद वाटेल, अशी स्वत:ची प्रतिमा आणि कार्य उभे केले. उद्योजिका असूनही त्यांनी समाजसेवेचा वारसा जपला आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...

माझ्या वडिलांनी मला नेहमीच एक गोष्ट सांगितली की, “जे काही करशील ते आत्मविश्वासाने कर. ‘आत्मनिर्भर’ राहा.” वडिलांचे ते शब्दच माझ्या आयुष्याचे खरे सूत्र आहे. आई तर आमची खूप हौशी. कोणत्याही प्रसंगात तिच्या चेहर्‍यावरचे हास्य कधीही विलुप्त झालेले नाही. वडील मात्र वरवर स्वभावाने कडक वाटत असले, तरी आमच्यावर चांगले संस्कार व्हावेत, पुढील आयुष्यात आम्ही ‘आत्मनिर्भर’ राहावे, यासाठी त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळे शिस्तीसोबतच समाजशील स्वभाव हा मला वारसा हक्कानेच मिळाला. आज मी चार कंपन्यांची संचालिका आहे. माझे जेव्हा लग्न झाले, तेव्हा ‘उज्ज्वल इंडस्ट्रीज’ ही आमची एक छोटीशी कंपनी होती. चार-पाच मशीन्स आणि तितकेच कर्मचारी. माझे सासरे खूपच सचोटीने व्यवसाय करत. खूप मेहनत करायचे. त्यांचे बाळकडू माझ्या पतींना मिळाले. मी त्यांच्यासोबत कंपनीमध्ये लक्ष देऊ लागले. त्या काळात माझ्या सासूबाईंची साथ मोलाची होती. तसे पाहायला गेले तर मी वाणिज्य शाखेतून पदवीधर आणि आमची कंपनी ही इंजिनिअरिंगशी संबंधित. त्या मशीन्स, त्यांचे भाग आणि त्यांचे कार्य हे माझ्यासाठी नवीन होते. पण माझे पती विनायक यांनी मला सगळी माहिती दिली. मी कंपनीतील मशीन्सचा अभ्यास करू लागले. पण, ती घटना मला सांगायलाच हवी. त्यावेळी मशीनसंदर्भातील २०० किलोचा एक भाग मागवायचा होता. पण, ऑर्डर करताना माझ्याकडून ती चुकून ‘२०० टन’ लिहिली गेली. काही दिवसांनी ऑर्डर केलेले सामान आमच्या कंपनीच्या दारात उतरवले गेले. २०० टन माल उतरवला गेला. माझे पती चकीत झाले. ‘२०० किलो’ मागवलेला माल ‘२०० टन’ कसा आला? ‘२०० टन’ मालाचे पैसे भरणे भाग होते. शिवाय जर उत्पादनाची ऑर्डर मिळाली नाही, तर हा माल वाया जाणार? विनायक वैतागले. ते म्हणाले, “असं कसं तू करू शकतेस? इतकी मोठी चूक?” इतक्यात, माझे सासरे म्हणाले, “बेटा, काही होत नाही. तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस” आणि पतीला म्हणाले, “तिला काही बोलू नकोस. ती तुला कंपनीत साथ देते, वेळ देते. हळूहळू शिकेल ती.” त्यावेळी वातावरण निवळले. सगळ्यांनी त्या दिवशी मला खूप सांभाळून घेतले. त्या दिवसापासून मी पहिल्यापेक्षा जास्त मन लावून आणि आत्मविश्वासाने काम करू लागले. गृहिणी जितकी स्वयंपाकघराला ओळखते, तितकीच मी कंपनींच्या मशीन्सना आणि इतर व्यवहारांना ओळखू लागले.


patange_1  H x


आमच्या कंपनीचा पसारा वाढला.. आता पाच मशीन्सच्या २०० मशीन्स झाल्या आणि कामगारही वाढले. ‘उज्ज्वल इंडस्ट्रीज’ सोबतच आम्ही इतरही कंपन्या सुरू केल्या. ‘उज्ज्वल इंडस्ट्रीज’सोबतच ‘स्माफॉर्म इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लिमिटेड’, ‘उज्ज्वला मेटल वर्क्स’, ‘बीबीटी बिझनेस’ या कंपन्याही सुरू केल्या. आमच्या कंपनीमध्ये आता विविध खाती तयार झाली आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र सुविधाही आहेत. पण, मी आणखीन एक भाग तयार केला तो म्हणजे, ‘ह्युमन रिसोर्सेस.’ कारण, मला नेहमी वाटते की, कंपनीत काम करणारे कामगार हीच आपली शक्ती आहे. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच आमच्या कंपनीशी त्यांचे स्नेहमय संबंध प्रस्थापित व्हावेत. मी पुढाकार घेऊन एक केले; ते म्हणजे, कंपनीत कामाला असलेल्या कर्मचार्‍यांना कामाबाबात कोणतीही समस्या असली, तर ती तत्काळ मिटवायची. त्याला पुढचे प्रशिक्षण घेण्याची संधी द्यायची. घरातल्या माणसांसारखे त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हायचे. कंपनी त्यांचीच आहे, असे वातावरण निर्माण करायचे. हे सगळे केल्यामुळे झाले काय की, आमच्याकडे दहा वर्षांपूर्वी कामावर रूजू झालेले कर्मचारी आजही आहेत. पूर्वीपेक्षा त्यांचा स्तर सगळ्यात बाबतीमधील चांगला झाला आहे.


माझे वडील अतिशय समाजशील. ‘यमगरवाडी प्रकल्पा’ची रूपरेषा, निर्मिती मी जवळून पाहिली आहे. मला नेहमी वाटते की, मी अशा सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा. पण, वेळेअभावी आणि जबाबदार्‍यांअभावी शक्य होत नाही. दुधाची तहान ताकावर भागवावी, तसे मग मी काय करते की, खरोखरच सेवाभावी कार्य करणार्‍या संस्थांना मला जमेल तशी मदत करते. माझी ‘बकेट लिस्ट’ बनवली तर माझी पहिली इच्छा हीच आहे की, मी चांगल्या सेवा उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना मी कशी काय, यात समरस झाले हा विचार करताना मला वाटते की, माझ्या वडिलांचे संस्कारच कामी आले. दहावी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी आम्हा बहिणींना सांगितले, “आता यापुढचे शिक्षण तुम्ही स्वत: करायचे.” अर्थात, आम्ही केले नसते तरी वडिलांनी आमचे शिक्षण पूर्ण केले असतेच, पण त्यांनी जबाबदारी स्वीकारण्याची आणि ती पार पाडण्याची सवय लावली. त्या सवयीमुळेच ज्या क्षेत्रातले ओ का ठो कळत नव्हते, त्या क्षेत्रात मी स्थिरावले.


- शुभांगी पतंगे-बुचडे
@@AUTHORINFO_V1@@