राजकारण नव्हे, समाजकारण! : वैशाली पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2021   
Total Views |

mahila din _1  


वैशाली पाटील या मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १२२ पवईच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका. जागतिक महिला दिनानिमित्त एक सामान्य गृहिणी ते कार्यक्षम नगरसेविका हा आपला प्रवास त्यांनी त्यांच्याच शब्दांत उलगडला आहे.


मुंबईतील विक्रोळी-पवई जिथे मी भाजपची नगरसेविका आहे, तो वॉर्ड म्हणजे, गर्भश्रीमंताबरोबरच दारिद्य्ररेषेखाली जीवनमान जगणार्‍या नागरिकांचाही वॉर्ड. त्यामुळे वॉर्डमध्ये काम करताना मला नेहमीच समन्वय ठेवावा लागतो. या कामात माझे पती श्रीकांत पाटील आणि दीर सचिन पाटील आणि कुटुंबीयांची मला मोलाची साथ लाभली आहे. श्रीवर्धन हे माझे माहेर. तसे पाहिले तर माझ्या माहेरचे वातावरणही पूर्वीपासूनच राजकीय. माझी आई शेकापतर्फे दोन वर्षे नगरसेवक, तर भाऊही नगरसेवक. त्यामुळे आईचे समाजकारण मी अगदी जवळून पाहिले, अनुभवले. जनतेची सेवा करावी, जनतेच्या समस्या सेाडवाव्यात, यासाठी आपल्याला संधी मिळाली, त्या परीक्षेत आपण पास व्हायलाच हवे, समाज आपलाच आहे, त्या समाजातील एका गटाला जरी त्रास झाला, तरी तो त्रास आपल्यालाही पुढे मागे होणारच, ही आईची शिकवण. त्यामुळे समाजाशी बांधिलकी ही लहानपणापासूनच होती. तसेच आईने कधीही तिच्या पदाचा गर्व केला नाही. तसेच ‘नगरसेविकेची मुलं’ म्हणून कुणी आम्हाला विशेष वागणूक दिली, तरी माझी आई त्यांना तसे न करण्याची सूचना द्यायची. त्यामुळे आयुष्यात कुटुंबाला, समाजाला धरून साधे जीवन जगावे, हा धडा आईच्या वर्तनातून मिळाला. त्यामुळेच लहानपणी मला कधीही वाटले नाही की, मी नगरसेविका किंवा तत्सम काही व्हावे. उलट मला वाटायचे मी खूप शिकावे, चांगली नोकरी करावी. त्याप्रमाणेच मी शिकले आणि नोकरीलाही लागले.



माझे पती श्रीकांत हे पवई-विक्रोळी येथे भारतीय जनता पक्षाचे आणि परिसरातील गणेशोत्सव मंडळाचेही पदाधिकारी. त्यामुळे परिसरात आमचा चांगला संपर्क आहे. आमच्याकडे परिसरातील अनेक लोक समस्या घेऊन येत. त्यामुळे परिसरातील समस्या मला चांगल्याच ठाऊक होत्या. माझ्या परीने मी त्या समस्या सोडवण्यासाठी मदतही करायचे. पण, ते केवळ एक समाजशील व्यक्ती म्हणून. पुढे २०१७ साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. मी जिथे राहते, तो वॉर्ड ओबीसी महिलांसाठी राखीव झाला. तो दिवस मला अजूनही आठवतो. मी नुकतीच कामावरून घरी आले होते आणि माझे पती श्रीकांत यांचा फोन आला. ते म्हणाले, “तुला, आपल्या वॉर्डमधून नगरसेवक पदाची उमेदवारी मिळत आहे.” मी त्यावेळी म्हणाले, “नाही नाही, मला नको तिकीट.” त्यावेळी मला सगळ्यांनी खूप समजावले. माझ्या भावानेही फोन केला. तो म्हणाला, “वैशू, चांगल्या पक्षातर्फे आपल्याला तिकीट मिळते आहे. मग तू का बरं नकार देतेस? तुझे सासरचेही तुला समर्थन देत आहेत, ही किती चांगली गोष्ट आहे. नगरसेवक म्हणजे केवळ राजकारण नाही. आपल्या आईने देखील नगरसेवक म्हणून जे समाजकार्य केले, तोच वारसा तुला पुढे चालवायचा आहे. तू शिकलेली आहेस. नोकरीनिमित्त चारचौघांत वावरतेस. तू आत्मनिर्भर आहेस. तू समजा जिंकलीस, तर तुझ्या परिसराचे प्रश्न तू नक्कीच सोडवशील.”



भावाचे म्हणणे ऐकून माझ्या डोळ्यासमोर परिसरातील अनेक समस्या उभ्या राहिल्या. ज्या समस्या नगरसेवक अगदी सहज सोडवू शकत होते. पण, त्या समस्या सेाडविण्याचा प्रयत्नच मुळात कुणी केला नाही. समस्या घेऊन येणार्‍या आयाबाया मला अस्वस्थ करून गेल्या. मग मी ठरवले, बघू प्रयत्न करू. जिंकलो तर समाजासाठीच, काम करतो ते अजून जोमाने आणि पूर्ण ताकदीने करू. मी नगरसेवक म्हणून निवडूनही आले. माझ्या आईने शिकवलेला धडा मी कायम स्मरणात आणि आचरणात ठेवला. नगरसेवक म्हणून कोणताही बडेजाव न करता, समाजात काम करायला मी सुरूवात केली. सामान्य गृहिणी कशी असते, तसेच माझे राहणीमान. ते मी आजही कायम ठेवले. माझ्या वॉर्डातील समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असते. शौचालय सुविधा, नाले तुंबणे, रस्ते नीट नसणे, या तर मूलभूत समस्या, या तर सोडवण्याचा शर्थीचा प्रयत्न करतेच. पण, जी मुले बेघर आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना आसरा द्यावा, त्यांना शिक्षण मिळावे, हे माझे लक्ष आहे. कारण, मुलांना शिक्षण मिळाले नाही, समाजाचा स्नेह मिळाला नाही, तर तो भविष्यात कसा वागेल? अर्थातच, त्याच्यासाठी प्रगतीच्या वाटा बंदच असतील.
आजची मुले हेच उद्याचे नागरिक आहेत. त्यांना चांगले आणि सहज शिक्षण मिळायला हवे. माझ्या वॉर्डात काही शाळा आहेत. त्या शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांचे पालक हे चतुर्थ श्रेणीत किंवा हातावरचे पोट असणारे. त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, कपडे आणि इतर गरजेच्या वस्तूंचे वितरण करणे हा माझा गेले कित्येक वर्षे उपक्रम आहे. तसेच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांनी मध्येच शिक्षण सोडू नये, यासाठीही सातत्याने उपक्रम राबविते. या सगळ्यामध्ये माझ्या पतीचे सहकार्य मोलाचे आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारीही खूपच साथ देतात. समाजात एकता नांदावी, जातीपाती-भेदभावावरून कोणतेही वादंग उसळू नये, यावरही माझे लक्ष असते. परिसरात मला सगळे ‘वहिनी’, ‘ताई’ म्हणूनच ओळखतात, त्यांच्या घरची लेक, सून म्हणूनच मला मान देतात. साधीभोळी कष्टाळू माणसं, पण माझ्यासाठी प्रत्येक वेळी उभी राहतात. माझा वॉर्ड क्र. १२२ हेच माझे घर! कोरोना काळात माझ्याच वॉर्डमध्ये ‘कोरोना सेंटर’ उभारले गेले. तिथून लोकांच्या खूप तक्रारी येत होत्या. शौचालय तुंबून पूर्ण खोलीत आणि खोलीच्या बाहेर घाण पसरलेली. कोरोना रुग्णांचे नातेवाईक त्या सेंटरमध्ये राहायचे. तिथून अनेक तक्रारी आल्या. एक कोरोनाचा काळ. भले भले घरात बसलेले. पण, मला आमच्या खासदारांचा मनोज कोटक यांचा फोन आला. म्हणाले, “ताई, त्या ‘कोरोना सेंटर’मध्ये काय तक्रारी आहेत, त्या पाहा आणि त्यावर उपाययोजना करा आणि आणखीन काही मदत लागली तर मला तत्काळ कळवा.” त्यांचे म्हणणे ऐकून मला खरंच आनंद झाला. कारण, खासदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता. कोरोना काळात राजकारण आणि समाजकारण करणार्‍या कुणीही समाजासाठी काम करायला घराबाहेर पडलेच पाहिजे, असेच त्यांचे जणू म्हणणे होते. मी, लगेच त्या ‘कोरोना सेंटर’मध्ये गेले. तिथली समस्या सोडवली. हा प्रसंग माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. कारण, समाजाच्या कामासाठी आपण नगरसेवकपद पत्करलंय, तर तसे काम केलेच पाहिजे, असे माझे मत होते. तसे मी वागले. ‘महिला दिना’च्या निमित्ताने मी इतकेच सांगेन की, ‘फुल भी हैं, चिंगारी भी, हम भारत की नारही हैं।’


- वैशाली पाटील
@@AUTHORINFO_V1@@