श्रमिकांची ‘तृप्ती’ :तृप्ती ठाकूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2021   
Total Views |

mahila din _1  


श्रम के बीजों से उगती हैं जीवन की मुस्कान
श्रम की सबसे सुंदर रचना हैं देखो इनसान
श्रम ही हैं निर्माता और श्रम ही संहार रे...
अशा या श्रमाचे आणि श्रमिकांचेही मानवी मूल्य जपणार्‍या कर्तृत्ववान उद्योजिका म्हणजे तृप्ती ठाकूर. ‘श्रमिक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.’ या ‘आयएसओ’ मानांकित कंपनीच्या त्या संचालिका असून हॉस्पिटल मॅनेजमेंट, हाऊसकीपिंग आणि सॅनिटायझेशन क्षेत्रात त्यांच्या कंपनीची गेल्या १२ वर्षांपासून यशस्वी घोडदौड सुरु आहे. तेव्हा, सर्वार्थाने श्रमिकांची ‘तृप्ती’ करणार्‍या उद्योजिकेने जागतिक महिला दिनानिमित्त खास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी कथन केलेला त्यांचा उद्यमशील प्रवास...



माझा जन्म पालघर जिल्ह्यातील पंचाळी या छोट्याशा गावातला. शालेय शिक्षणही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच पूर्ण केलं. पुढे वडिलांना मुंबईत म्हाडाचे क्वाटर्स मिळाल्यामुळे मुंबईतच सहकुटुंब स्थायिक झालो. पुढे मुंबईच्या विलेपार्ल्यातील डहाणूकर महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. पण, तोपर्यंत आयुष्यात नेमकं काय करायचयं, याची कोणतीही दिशा ठरली नव्हती. त्यातच लग्नाची घटिकाही समीप आली आणि नोकरीही सुरू होतीच. खरंतर वयाच्या अगदी ३३व्या वर्षापर्यंत अनेक ठिकाणी मी नोकरीचा अनुभव घेतला. यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयांचाच समावेश होता. या रुग्णालयांत कार्यरत मावशी, हाऊसकिपिंग, वॉर्डबॉय या कर्मचारीवृंदाच्या व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी ही माझ्यावर होती. या क्षेत्रात काम करताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे, या क्षेत्रात कार्यरत कर्मचार्‍यांना अजूनही त्यांच्या कामानुरुप पगार दिला जात नाही. पगारच काय, तर इतर सोयीसुविधांपासूनदेखील हे कर्मचारी वंचित राहतात. डॉक्टर-परिचारिकांपेक्षा रुग्णांच्या अधिक जवळ असतात ते हेच मावशी आणि वॉर्डबॉय. पण, तरीही त्यांच्या श्रमाला सुयोग्य मोल मिळत नाही. म्हणूनच या क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी आपणही पुढाकार घेऊन काही तरी करावं, असं मनात होतं. पण, नेमकं काय करायचं, याची दिशा मात्र स्पष्ट नव्हती.

कौटुंबिक स्तरावर सांगायचं झालं, तर मला दोन मुलं. दुसर्‍या मुलाच्या पालनपोषणासाठी मी जरा कामातून विश्रांती घेतली. हातची नोकरीही सोडली. त्यानंतर बर्‍याच ठिकाणी नोकरीही केली. पण, त्यानंतर आता काही तरी वेगळं करुया, असं मनात आलं. पण, नेमकं काय करायचं, हे मात्र तेव्हा सुचत नव्हतं. मधल्या काळात मी ‘सिम्बॉयसीस’मधून ‘हॉस्पिटल हेल्थ केअर अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ या विषयाचे आणि ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट’मधून ‘एचआर’चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ‘पथिक इन्स्टिट्यूट’मधून मी ‘बिझनेस स्टडी’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. हे सगळं शिक्षण घेतानाही मनात पुरेशी स्पष्टता नव्हतीच. पण, मनात ध्यास असला की, परमेश्वर कुठूनही रस्ता हा दाखवतोच! माझ्याही बाबतीत तसंच काहीसं झालं. एक दिवस डॉ. दीपक नामजोशींचा फोन आला. त्यांनी मला पुन्हा ‘क्रिटीकेअर हॉस्पिटल’मध्ये रुजू होण्याबाबत विचारणा केली आणि मीही लगेच मला होकार दिला आणि त्याचवर्षी २००९ मध्ये ‘श्रमिक एंटरप्रायझेस’ नावाची कंपनी सुरू झाली. आमच्या कंपनीला पहिलं कंत्राटही ‘क्रिटीकेअर हॉस्पिटल’नेच दिलं. ‘श्रमिक’साठी तिथे कार्यरत १०-१५ लोकं होते. तिथे मग ‘कन्स्लटन्सी’ आणि ‘कॉन्ट्रॅक्टर’ अशा दोन्ही भूमिकांमधून आमचे काम सुरू होते. परंतु, दुर्दैवाने पाच-सहा महिन्यांतच काळजावर दगड ठेवून आम्हाला कंपनी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. मला कळून चुकलं की, व्यवसाय करणं वाटतं तितकं नक्कीच सोपं नाही. तुम्हाला जरी त्या क्षेत्राचं पुरेसं ज्ञान असलं, तरी कायदेशीर बाबींचीही परिपूर्ण माहिती ही गाठीशी हवीच. ती नसल्याशिवाय तुम्ही पुढे सक्षमपणे व्यवसाय करूच शकत नाही. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांतच मी कंपनी बंद केली. पण, अजिबात खचून न जाता, जिद्दीने, मेहनतीने, नव्या दमाने मी सगळा खोलवर अभ्यास पुन्हा केला. कारण, आमच्या क्षेत्रात कामगार कायदे, त्यासंबंधीचे धोरण, नियम यांचे सांगोपांग ज्ञान अत्यावश्यकच. त्यानंतर नव्या जोमाने पुन्हा एकदा २०१० मध्ये ‘श्रमिक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.’ ही कंपनी आम्ही सुरू केली. सध्या कंपनीचे कामकाज दोन सेवांच्या अनुषंगाने चालते. त्यातील पहिले म्हणजे ‘हाऊसकीपिंग.’ यामध्ये दूतावास, शाळा, सेलिब्रिटींची घरं, बंगले, कार्यालये, महाविद्यालये यांचा समावेश होतो, तर दुसर्‍या सेवेअंतर्गत आम्ही घरं, बंगले, सोसायट्या व्यवस्थित स्वच्छ, निर्जुंतक करून देतो. ज्यामध्ये ‘मॅकेनाईज्ड क्लिनिंग’ ही आमची ‘युएसपी’ आहे. ‘पेस्ट कंट्रोल’ आणि ‘सॅनिटायझेशन’ या ‘व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिसेस’ही कंपनी पुरवते. अशा या कंपनीचा आजतागायत उद्योजकीय प्रवास सुरळीतपणे सुरू आहे.

mahila din _1  
आजघडीला या कंपनीत एकूण २५० कर्मचारी कार्यरत आहेत. ‘विश्वासाहर्ता’ आणि ‘दर्जा’ या दोन गोष्टींवर आम्ही विशेषत्वाने भर देतो. तसेच आमच्या कंपनीत कार्यरत प्रत्येक कर्मचार्‍याला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देण्यासाठीही आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. ‘कोविड’ आणि ‘लॉकडाऊन’च्या काळात कंपनीच्या कर्मचार्‍यांना धीर देण्याचे, प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही केले. शिवाय विविध रुग्णालयांनीही या कर्मचार्‍यांची राहण्यापासून ते अगदी जेवणाचीही सोय केली. अशा गंभीर संकटात कर्मचार्‍यांचा आम्ही विमाही काढला. पण, शेवटी ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे व्रत आम्ही कटाक्षाने जोपासले. पण, आजवरच्या १२ वर्षांच्या उद्योजकीय प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा सर्वार्थाने ध्यास हवा. कंपनीच्या ‘व्हिजन’मध्ये सामाजिक सहभागही तितकाच महत्त्वाचा. याच उद्दिष्टाने आम्ही ‘श्रमिक सक्षम फाऊंडेशन’ची तीन वर्षांपूर्वी स्थापनाही केली. त्याअंतर्गत विविध सामाजिक उपक्रमही आम्ही हाती घेतले. यामध्ये वनवासी मुलांच्या शाळा दत्तक घेण्यापासून ते त्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

अशा या माझ्या एकूणच उद्योजकीय अनुभवावरुन महिला उद्योजिकांना माझं खासकरून सांगणं आहे की, प्रत्येक महिला ही कुठल्या ना कुठल्या संघर्षातून जात असते. मग ती महिला उद्योजिका असो अथवा गृहिणी. त्यामुळे महिलांनी कुठलाही प्रसंग येऊ दे, संघर्ष उद्भवू दे, तरी अजिबात घाबरून जाऊ नका. तुमच्या सगळ्यांमध्ये संघर्ष करण्याची शक्ती आहे. म्हणूनच आज आमच्या कंपनीत जवळपास ७० टक्के कर्मचारी वर्ग हा महिलांचा आहे. तसेच मावशी म्हणून रुग्णालयात काम करणार्‍या आमच्या महिला कर्मचार्‍यांना आर्थिक नियोजन, गुंतवणुकीचे मार्गदर्शनही आम्ही करतो. तेव्हा, महिलांना माझे हेच सांगणे आहे की, आता अजिबात मागे वळून पाहू नका. स्वत:वर तसेच, परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि जे काही तुम्हाला आयुष्यात करायचं आहे, ती तुमची सगळी स्वप्नं नक्कीच पूर्ण होतील. मी स्वत: त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि आज फक्त प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणा यावरच या कंपनीची वाटचाल सुरु आहे. म्हणतात ना की, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचे वेड हे रक्तात असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ ही विकत घेता येत नाही.

तृप्ती ठाकूर
 
@@AUTHORINFO_V1@@