सेवाकार्याचा अथांग ‘समुद्र’ : कीर्ती समुद्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2021   
Total Views |

कीर्ती समुद्र_1 &nbs


कीर्ती समुद्र यांच्या नावाप्रमाणेच त्यांचे समाजकार्य आणि समाजविचार अथांग आहेत. त्यांचा पनवेलमध्ये मधुमेहावर उपचार करणारा दवाखाना आहे. सध्या या दवाखान्यात २५हजार रुग्ण मधुमेहावर उपचार घेत आहेत. त्याशिवाय कीर्ती या ‘भारत विकास परिषदे’च्या कार्यकर्त्या आहेत. परिषदेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या सेवाकार्याची व्याप्ती वाढवली आहे, जागतिक महिना दिनानिमित्त आपल्या सेवाकार्याचे त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत...


जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही आज बोन्डारपाड्याला आहोत. या पाड्यातल्या कोणत्याही घरात कोणतीही वस्तू हवी असली, तर चार किलोमीटर चालत जाऊन ती वस्तू आणावी लागते. या पाड्याच्या आजूबाजूला एकही दुकान नाही. त्यामुळे आम्ही (आता आम्ही म्हणजे कोण तर ‘भारत विकास परिषदे’चे कार्यकर्ते-पदाधिकारी) या पाड्यात किराणा मालाचे आणि अत्यावश्यक वस्तूंचे दुकान सुरू केले आहे. या दुकानाचे उद्घाटन ८ मार्च रोजी होणार आहे. हे दुकान कोण चालवणार, तर पाड्यातल्या बचतगटाच्या महिला. हे बचतगटसुद्धा ‘भारत विकास परिषदे’ने सुरू केले. मी, ‘भारत विकास परिषदे’ची कार्यकर्ता, तर माझे पती गिरीश समुद्र हे परिषदेचे पनवेल शाखेचे अध्यक्ष. ‘भारत विकास परिषदे’ने बोन्डारपाडा दत्तकच घेतला आहे. कार्यकर्ता म्हणून मी या पाड्याच्या विकासातल्या प्रत्येक उपक्रमात सहभागी असते. पाड्यातल्या बांधवांचे जीवन सुधारावे म्हणून इथे ‘भारत विकास परिषदे’ने अनेक उपक्रम सुरू केले. विविध विषयांवर जनजागृती, अनेक समस्यांवर मार्गदर्शन आणि उपाययोजनाही केल्या. यातले प्रमुख काम म्हणजे, या पाड्यातील पाणीटंचाईवर केलेली मात. पाण्याच्या शोधात महिलावर्ग तासन्तास चालत असे. यावर उपाययोजना म्हणून ‘भारत विकास परिषदे’ने येथे पाण्याची व्यवस्था केली. इथल्या महिला ‘आत्मनिर्भर’ व्हाव्यात म्हणून त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले गेले. या वर्षीच्या संक्रांतीला पाड्यातील महिलांना आम्ही तिळगूळ आणि चिवडा बनवायला शिकवले. या प्रत्येक उपक्रमात सहभागी होताना मला खूपच आनंद होतो. याच पाड्यात नव्हे, तर आजूबाजूच्या सर्वच पाड्यांत आरोग्याच्या समस्या प्रकर्षाने जाणवतात. एक डॉक्टर म्हणून जेव्हा मी त्या समस्यांकडे पाहते, तेव्हा जाणवते की, या सार्‍या समस्या लोकजागृती आणि थोड्याफार उपाययोजनेने दूर होतील. भोळ्या आणि खरोखर गरीब लोकांच्या आरोग्याच्या समस्यांना कसे दूर करावे, हा विचार माझ्या मनात येतो. त्यासाठी मी माझ्यापरीने कार्यरत आहे.


पनवेलला माझा मधुमेहावर उपचार करणारा दवाखाना आहे. मी केवळ मधुमेह रुग्णांना तपासते. त्यांच्यावर उपचार करते. सध्या माझ्याकडे २५ हजार रुग्ण मधुमेहावर उपचार घेत आहेत. मधुमेहावर उपचार करणारा दवाखाना का? असा अनेकांना प्रश्नही पडत असेल. तर त्याचेही एक कारण आहे. मी वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वर्ष ‘हिंदुजा हॉस्पिटल’ आणि एक वर्ष ‘रहेजा हॉस्पिटल’मध्ये काम केले. दोन्ही हॉस्पिटलमध्ये मी मधुमेहावर उपचार असणार्‍या रुग्णालयात आरोग्यसेवा बजावत होते. त्यानंतर माझा विवाह पनवेलच्या गिरीश समुद्र यांच्यासोबत झाला. ते इंजिनिअर आणि अत्यंत समाजशील. आता मला पनवलेला राहायला जावे लागले. त्यामुळे ‘रहेजा हॉस्पिटल’ची नोकरी सोडावी लागली. त्यावेळी रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर आजगावकर म्हणाले की, “तू, पनवेलला राहायला गेलीस. तिथे तुझ्या आरोग्यसेवेची आणि ज्ञानाची गरज आहे. त्या परिसराच्या आजूबाजूला अनेक खेडेपाडे आहेत, तिथे मधुमेहावर अजिबात जागृती नाही. तू, तिथे मधुमेहाबद्दल जागृती कर आणि लोकांचे उपचार कर.” त्यामुळे मी ठरवले की, मधुमेहावर आपण काम करायचे.

असो. पनवेलला आल्यावर मी, ‘तेरणा कॉलेज’मध्ये प्राध्यापिका म्हणून काम करू लागले. पुढे मला आई होण्याची चाहूल लागली. बाळासाठी मी पूर्णवेळ नोकरी न करता अर्धवेळ नोकरी करण्याचे ठरवले. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, आता आपण मधुमेह आजार असणार्‍या रुग्णांसाठी काम करावे. मग मी घराशेजारीच दवाखाना सुरू केला. केवळ दोन तास तिथे असायची. वाटायचे की, इथे कदाचित जास्त मधुमेहाचे रुग्ण नसतील. पण, काही दिवसांतच रुग्णांची संख्या वाढली. संसर्गजन्य नसला तरी झपाट्याने लोकांना हादरवून सोडणारा हा आजार. कित्येकांचे जगणे नकोसे केले होते. या आजारावर माझा अभ्यास होता, अनुभव होता. त्यामुळे पनवेलबाहेरचेही लोक उपचारासाठी येऊ लागले. मला दिवस कमी पडू लागला. एका क्षणी वाटले की, मधुमेह झाल्यावर उपचार करणे गरजेचे आहे. पण, त्याहीपेक्षा गरजेचे आहे मधुमेह होऊच नये किंवा झालाच तर तो कसा नियंत्रित करावा, यासाठी काम करायला हवे. त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे होते. मग मी ठिकठिकाणी या आजाराबद्दल शिबीर घेऊ लागले, व्याख्यान देऊ लागले. लोकांना या आजाराची गंभीरता आणि तो नियंत्रित करण्याचे मार्गदर्शन करू लागले. ‘मधुमेह जनजागृती’ या विषयावर परिषदा घेऊ लागले. यात परिषदेत नामांकित डॉक्टर मार्गदर्शन करतात. ही परिषद सर्वांसाठी विनामूल्य असते. उपस्थितांसाठी विनामूल्य मधुमेह तपासणी आणि उपचार मार्गदर्शन केले जाते. आज, 21 वर्षांनंतरही ही परिषद दरवर्षी १४ नोव्हेंबरला घेते. यामुळे मधुमेहाबद्दल व्यापक स्वरूपात जनजागृती होते. हो, गेल्यावर्षी कोरोनामुळे ही परिषद ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली होती.


 
आज समाजासाठी आरोग्यसेवा करताना मला खूप समाधान वाटते. आरोग्यसेवेच्या या प्रदीर्घ प्रवासात मला माझे पती गिरीश यांची साथ महत्त्वाची होती. प्रत्येक वेळी ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मी, व्याख्यानाला गेले, परिषदेला गेले, तर त्यांनी त्यासाठी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. तसेच माझे आईवडीलही समाजशीलच. मी दहावीला बोर्डात अकरावी आणि बारावीला जीवशास्त्रामध्ये राज्यात प्रथम आले. त्यावेळी आईने सांगितले, “तू, डॉक्टर हो आणि समाजाची सेवा कर.” माझे वडील मधुकर देशपांडे यांच्यावर रा. स्व. संघाचे संस्कार. त्यांचे तर म्हणणे की, “आपण समाजाचे देणे लागतो. देशाचे आणि समाजाचे ऋण फेडले पाहिजे.” लहानपणी मीही समितीमध्ये जायचे.त्या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की, मला बालपणापासून वाटू लागले की, आपण समाजासाठी काही तरी करायला हवे. आपल्यात ज्या विशेषता असतील, त्याद्वारे समाजाचे दुःख दूर करायचे. कारण आपण समाजाचे, देशाचे देणे लागतो.माझे वडीलही अभियंता होते, तर आई अनुराधा गृहिणी होती. पण, दोघांचेही विचार समाजशीलच! घरी तशी सुबत्ताच होती. पण, त्याचा कधी कुणीही बाऊ केला नाही. उलट कुणीही घरी आले की, त्याच्याशी आपुलकीचे वर्तन असे. माणसाने माणसासारखे जगावे, आपण सगळे एकच आहोत, भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख महत्त्वाचे, असे आमच्या घरातले विचार. कळत-नकळत ते विचार माझ्या अंतरंगात उमलत होते. त्यातच विवाहानंतर पतीही मिळाला तो अभियंता आणि समाजशीलच! आम्हा दोघांचेही विचार साधारण समानच. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या समाजकार्यात सहभागी होतोच. सहभागी होता नाही आले, तरी एकमेकांसोबत असतोच असतो.आज ‘भारत विकास परिषदे’चे काम करताना आमचे सहकारीही अत्यंत सेवाभावी वृत्तीचे आहेत. आमच्या सर्वांचे ध्येय आहे समाज सुखी व्हावा, त्यामुळे समाजासाठी काम करताना कधीही एकटे वाटत नाही. माझ्या आईवडिलांचे संस्कार, माझ्या पतीची साथ आणि माझे ध्येय मला समाजकार्यासाठी प्रेरित करते.


कीर्ती समुद्र
@@AUTHORINFO_V1@@