शिक्षिका ते महापौर : समाजसेवेचे पर्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2021   
Total Views |

mahila din_1  H


मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे या सध्या काशिमीरा भागात वास्तव्यास आहेत. त्या उच्चशिक्षित असून शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. चार वेळा नगरसेविका पद भूषविल्यानंतर त्या मीरा-भाईंदरच्या महापौरपदी सध्या विराजमान आहेत. एक महिला म्हणून त्यांचे कर्तृत्व आणि विचार महत्त्वाचे असून समाजातील प्रत्येक स्त्रीसाठी नक्कीच मार्गदर्शक आहेत. तेव्हा, जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांनी व्यक्त केलेले त्यांचे मनोगत...



मीरा-भाईंदरची महापौर म्हणून सध्या माझ्यासमोर येथील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी अनेक उपक्रम दृष्टिपथात आहेत. सध्या त्यापैकीच एका उपक्रमासाठी मी प्रयत्नशील आहे. तो उपक्रम म्हणजे, महिला भवनाची निर्मिती आणि त्यामध्ये प्रत्यक्ष महिलांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविणे. महिला भवन निर्माण व्हावे, असे मला अगदी मनापासून वाटते. कारण, कोरोना काळात सगळ्या जगाची वाताहत झाली. त्यावेळी हातावरती पोट असलेल्या सगळ्यांनाच भयंकर त्रास झाला. खासगी नोकरी करणार्‍यांच्या नोकरीवरही टाच आली. त्यावेळी मला जाणवले की, पुरुषांच्या नोकर्‍या गेल्या. त्याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला तो त्यांच्या घरातील महिलांवर. कारण, पतीला नोकरी असो वा नसो, घरात पैसा असो वा नसो, त्या गृहिणीला तर दोन वेळचे अन्न मुलाबाळांना द्यायचेच होते. घरची चूल पेटली नाही, तर त्याचा सगळा भार तिच्यावरच यायचा. पतीसह मुलाबाळांच्या मुखात अन्नाचा घास देऊ शकत नाही म्हणून तिला सगळ्यात मोठे संकट होते, तरीसुद्धा कोरोना काळात महिलांनी सगळ्या संकटांना तोंड देऊन घराला जगवले. पण, पतीची छोटी-मोठी का होईना नोकरी गेली, तर दुर्दैव ओढवणार्‍या संसारात पत्नीलाही काही अर्थार्जन करण्याची संधी दिली, तर कुठच्याही संकटात ते घर सुरळीत चालेल, असे मला वाटले. म्हणूनच मी माझ्या सहकार्‍यांसमवेत ठरवले की, महिला भवन निर्माण करायचे. महिला भवन म्हणजे काय, तर जिथे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रत्येक महिलेला संधी आणि लाभ मिळेल. तिथे महिलांना विविध कलाप्रशिक्षणं मिळतील. त्यांना वाटले, तर रोजगाराचीही सुविधा मिळवून देण्यात येईल. सध्या ‘महिला भवना’साठी इमारत आहे, पण त्याची व्यवस्थित उभारणी करायची आहे. या भवनाचे उद्घाटन आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे ठरवले आहे.


कारण, देवेंद्र फडणवीस यांची सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची, अभ्यासू लोककल्याणकारी वृत्ती मला नेहमीच प्रेरणा देते. मी या क्षेत्रात गेली चार टर्म नगरसेविका म्हणून समाजकार्य करते आहे. आता महापौर पदाची जबाबदारी आहे, पण समाजासाठी नि:स्वार्थीपणे आणि तडफदारपणे कसे काम करावे, याची स्फूर्ती मला देवेंद्र फडणवीसांकडूनच मिळाली.तसेच माझे वडील हे लष्करामध्ये. त्यामुळे शिस्त संस्कार आणि देशप्रेम यांचे मला बाळकडूच मिळाले. माझे आई-वडील नेहमी सामंजस्याने वागायचे. सगळ्या मुलांना त्यांनी समान प्रेम आणि संस्कार दिले. कुटुंबातल्या सगळ्यांनी एकोप्याने राहावे, मिळून-मिसळून काम करावे, अशी त्यांची शिकवण. त्यामुळे माझे आईवडील माझ्यासाठी कायमच आदर्श आहेत. माझे पती प्रताप शिंदे यांच्याकडूनही मला खूप सहकार्य मिळाले. राजकारण आणि समाजकारण करताना ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. 1997 साली मी पहिल्यांदा नगरसेवक झाले. माझे बाळ तीन वर्षांचे होते. त्यावेळी पतींनी दिलेली साथ मी कधीच विसरू शकणार नाही. तेही व्यावसायिक आहेत, पण मला नेहमीच त्यांनी सहकार्य केले आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकली नसते. महापौरपदाची जबाबदारी घेताना माझ्या डोळ्यांसमोर एकच ध्येय आहे ते म्हणजे, मीरा-भाईंदरचा विकास. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे की, ‘सबका साथ सबका विकास.’ त्यानुसार माझ्या सर्व सहकार्‍यांना सोबत घेऊन मीरा-भाईंदरचा विकास करायचा आहे.


सध्या चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे. त्या दृष्टीने यंदाचा पालिकेचा अर्थसकंल्प हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण, या अर्थसंकल्पात ‘निर्भया’अंतर्गत आम्ही तरतूद केली आहे. काय होते की, मुलींवर अत्याचार, बलात्कार होतो, पण तिचे उपचार किंवा पुढची लढाई लढून तिला न्याय मिळवून देण्यास तिच्या घरातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असतीलच असे नाही. मग त्या मुलीचे जे हाल होतात, ते शब्दांत व्यक्त करता येत नाही. जर दुर्दैवाने शहरात अशी घटना घडली, तर त्या मुलीला वेळेत सगळीच मदत पोहोचावी म्हणून ही तरतूद. मी पेशाने शिक्षिका असली तरी गृहिणींचे दु:खही माझ्या मनाला चटका लावते. आमच्या इथे उंच भागावर एक वस्ती आहे. छोटी टेकडीच म्हणा ना हवं तर! तो भाग अतिउंच ! तिथे बोअरवेल किंवा विहिरीतून पाणीपुरवठा करणेही शक्य नव्हते. त्यामुळे एक हंडा पाण्यासाठी महिला पूर्ण टेकडी चढत-उतरत. पूर्ण पाणी भरण्यासाठी त्यांना सात-आठ वेळा चढ-उतार करावा लागे. कष्टकरी महिला, त्यांची ऊर्जा वेळ वाया जात असे. त्यांचे कष्ट मला पाहवत नव्हते. त्या टेकडीवर घरोघरी नळजोडणी देण्याचा मी निश्चय केला. त्यासाठी सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. रीतसर कार्यवाही करून पंपाने त्या टेकडीवरच्या प्रत्येक घरात नळाने पाणी येऊ लागले. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस. कारण, त्या आयाबायांचे जीवघेणे कष्ट संपले होते.

असाच एक दुसरा हृदयद्रावक प्रसंग. एकट्या वृद्ध महिलांना जगणे मुश्किल असते. भीक मागणे हाच पर्याय. मी परिसरातील अशा महिलांची यादी तयार केली. त्यातल्या २२ मातांना ‘संजय गांधी निराधार योजने’द्वारे ‘पेन्शन’ मिळवून दिली, हासुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस. कारण, एक महिला म्हणून त्या मातांचे दु:ख थोडेतरी मी कमी केले होते. चार वेळा नगरसेवक आणि आता महापौर असताना मी एकच गोष्ट शिकले की, आपण नि:स्वार्थी भावनेने कार्य केले, तर त्या कार्याला यश येते. तसेच, सगळा समाज आपल्यासोबत येतो. महिला आणि त्यातही अनुसूचित जातीमध्ये जन्म घेतलेली महिला म्हणून मला एकच म्हणावेसे वाटते की, आपला देश, आपला समाज खरंच खूप चांगला आहे. कर्तृत्ववान व्यक्तींना तो नेहमी संधी आणि साथ देतो.


- ज्योत्स्ना हसनाळे
@@AUTHORINFO_V1@@