वैद्यकीय सेवेतून समाजसेवेचे व्रत... : डॉ. प्रिया चाफेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2021   
Total Views |


priya chafekar_1 &nb


‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’ हे वचन केवळ विचारांपुरते मर्यादित न ठेवता, तळागाळात जाऊन ते व्रत प्रत्यक्षात अंगीकारणार्‍या वसईतील सुप्रसिद्ध ‘चाफेकर हॉस्पिटल’च्या डॉक्टर आणि व्यवस्थापिका डॉ. प्रिया चाफेकर. डॉ. प्रिया आणि डॉ. प्रशांत चाफेकर हे दाम्पत्य गेल्या ४० वर्षांपासून अविरतपणे गोरगरीब-गरजूंनाही रुग्णसेवा देत आहे. तेव्हा, जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. प्रिया चाफेकर यांनी एकूणच वैद्यकीय सेवेचे आणि महिला आरोग्याविषयीच्या विचारांचे केलेले हे अनुभवकथन...


माझा जन्म १९६५ साली नाशिक जिल्ह्यातला. माझे वडील ‘सिव्हिल इंजिनिअर’ असल्यामुळे कायमच संसार पाठीवर घेऊन फिरलो. पुढे आठवीपासून ते बारावीपर्यंतचे माझे शिक्षण कोल्हापूरलाच झाले. त्यानंतर वैद्यकीय अभ्यासाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि सोलापूरमधील व्ही. एम. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. पण, मनात काही तरी वेगळं करायचं, अशी इच्छा होती. त्यात ‘आयआयटी’चं विशेष आकर्षण. म्हणून ‘बायोमेट’ म्हणून जी ‘आयआयटी’ची परीक्षा असते, जी ‘एमबीबीएस’ झाल्यानंतर देता येते, ती परीक्षा मी दिली. त्यानंतर ‘आयआयटी’ मुंबईला वर्षभर कामही केलं. पण, त्या दरम्यान, मला लक्षात आलं की, या कामात माणसांशी तसा संपर्क कमी आहे आणि मशीन्सशी जास्त आणि याच क्षेत्रात पुढे काही करिअर करायचं असेल, तर मग अमेरिकेत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ही साधारण १९९०ची गोष्ट. ‘डॉक्टर होऊन खेडोपाडी जाऊन काम करा,’ ही वडिलांनी लहानपणी दिलेली शिकवण मनावर अगदी ठळकपणे कोरली गेली होती. त्यामुळे आपला देश सोडून अमेरिकेत जाणं तेव्हाही पटलं नव्हतं. शेवटी ते सोडून मग मी रुटीन मेडिकल प्रॅक्टिसमध्ये रुजू झाले. पुढे लग्नही झालं. माझे पती डॉ. प्रशांत चाफेकर हेही पेशाने डॉक्टरच. लग्नानंतर मग आमच्या स्वत:च्याच चाफेकर रुग्णालयाचे व्यवस्थापन, रुग्ण तपासणी असे सगळीकडे मी लक्ष देत होते. शिवाय, माझं स्वतंत्र क्लीनकही सुरू केलं होतं. कुटुंबाचा या काळात मला पूर्ण पाठिंबा लाभला. मुलंही अगदी समजूतदार होती. आईवडिलांना त्यांच्या कामात त्रास दिलेला अजिबात आवडत नाही, याची दोन्ही मुलांना रीतसर कल्पना होतीच. आज माझी मुलगी लहान मुलांची डॉक्टर आहे, तर मुलगा ‘सोशल मीडिया’ क्षेत्रात कार्यरत आहे.

पण, आधी म्हटल्याप्रमाणे केवळ सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा न देता गरजू, गोरगरिबांच्या मदतीसाठीही आम्ही सदैव तत्पर होतो. त्याच अंतर्गत आम्ही काही डॉक्टरांनी मिळून ‘फ्री क्लीनिक्स’ सुरू केली. नावात ‘फ्री’ म्हणजे मोफत असले तरी आम्ही फक्त पाच रुपये फी आकारायचो. कारण, फुकट काही सुरू केलं की, लोकांना त्याची किंमत राहत नाही, असा आमचा अनुभव. असे आठवड्यातून दोन वेळा आम्ही विविध वस्त्यांना भेटी द्यायचो. वसई पूर्वेकडील डोंगरीपाडा ही कचरावेचकांची अशीच एक वस्ती. बरेचदा आम्ही डॉक्टर्स प्रॅक्टिस न करता, आमचा वेळ या कामासाठीही आवर्जून देत होतो. पण, या वस्त्यांमध्ये नुसती औषधं न देता, येथील लोकांमध्ये स्वच्छता, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं, आरोग्य शिक्षण देणं, यावर आमचा कटाक्षाने भर होता. महिलांचे आरोग्य, गरोदर महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी आम्ही या वस्त्यांवर जाऊन मार्गदर्शन करायचो आणि त्यांना शिकवण्यापेक्षा आम्ही गप्पाच मारायचो, जेणेकरून त्यांना तो विषय सोप्या भाषेत चटकन समजेल. अशाच एका वस्तीवरचा अनुभव मन सुन्न करणारा होता. वस्तीतील एक गरोदर महिला पहिल्यांदाच आमच्याकडे आली. तिचे संपूर्ण शरीर पिवळे पडले होते. गरोदरपणाचे नऊ महिने जवळ जवळ पूर्ण होत आले होते. प्रसूती तोंडावर होती. तेव्हा, तिची एकूणच परिस्थिती बघून तिचा जीव कितपत वाचेल, याचीच साशंकता आम्हाला होती. पण, काहीही करून तिला आपण मोठ्या रुग्णालयात जायला सांगू, तिला रक्ताची गरज लागणारच आहे, हे समजून चुकले होते. शेवटी प्रसूतीदरम्यान खूप रक्तस्राव होऊन त्या महिलेचं निधन झालं. त्यामुळे डॉक्टर म्हणून आम्ही त्यांना औषधोपचार सांगायला, पटवून द्यायला कमी पडलो, याचीच खंत आजही जाणवते.केवळ वसईतच नाही, तर काही वर्षांपूर्वी आम्ही डॉक्टरांच्या चमूने ईशान्य भारतातील मणिपूरला भेट देण्याचा निर्णय घेतला. तिथली एकूणच परिस्थिती ही अत्यंत साधी आणि काहीशी विचित्रही होती. आम्ही तिथे तळागाळातील एका गावात गेलो होतो. त्यामागे ‘तुमच्यासाठी आम्ही आहोत’ हे त्यांना दाखवून देणं हीच मनस्वी भावना होती. त्या मणिपूरच्या ग्रामस्थांनाही चांगलं वाटलं की, थेट मुंबईहून आपल्यासाठी खास डॉक्टर या छोट्याशा गावात आले. नंतर तिथला एक मुलगा येथील रुग्णालयामध्ये चार वर्षं कार्यरत होता. ‘सिस्टर’ म्हणूनही आमच्याकडच्या रुग्णालयांत या मणिपूरच्या मुली नंतर रुजू झाल्या.

मी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या वसई शाखेची गेली सहा-सात वर्षे अध्यक्ष आहे. त्यात कोरोना काळात आम्ही सर्व डॉक्टरांनी एकत्र मिळून काम केले. या महामारीच्या काळात सामान्य लोकच नव्हे, तर प्रशासन आणि डॉक्टरही तितकेच गोंधळलेले होते. तरीही आपण या कामात सक्रियपणे सहभागी झाले पाहिजे, अशी माझी व माझ्या पतींचीही भूमिका होती. आम्ही दोघंही ‘कोविड सेंटर’वर काम करत होतो. त्याचबरोबर पोलिसांचीही आम्ही चौक्याचौक्यांमध्ये तपासणी करायला जायचो. तपासताना ते पोलीस आम्हाला म्हणायचे “कृपया आमचे फोटो काढा.” त्यामुळे सुरुवातीला आम्हाला प्रश्नच पडायचा की, यांना तपासणीपेक्षा फोटो काढणे महत्त्वाचे का वाटते? असा प्रश्न पोलिसांना विचारताच, ते काळजीच्या सुरात म्हणाले, “आम्हाला आमच्या कुटुंबाला ते फोटो पाठवायचे आहेत. कारण, डॉक्टर आम्हाला तपासत आहेत, हे बघितल्यावर त्यांना आमची काळजी वाटणार नाही.” त्यामुळे आमच्या एवढ्याशा कामाने त्या पोलिसांच्या कुटुंबीयांना एवढं छान वाटणार आहे, याचं आम्हालाच फार अप्रूप वाटलं.
खरंतर या काळात कोरोना रुग्णांना नाइलाजाने दिली जाणारी अस्पृश्यासारखी वागणूक बघून आम्हाला फार वाईट वाटलं. पण, वसईमधील ‘कोविड’ रुग्णालयांमधील स्थिती तुलनेने बरी होती. मृत्युदरही कमी होता. सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळत होते.महिला सक्षमीकरणाविषयी मी आवर्जून नमूद करू इच्छिते की, केवळ आरोग्यच नाही, तर आर्थिक व्यवहारही महिलांना समजायला हवे. ‘भाग्यश्री महिला पतपेढी’मध्येही आम्ही हेच महिलांना समजावून सांगतो. मी, माझ्याकडे येणार्‍या प्रत्येक महिलेला आज अगदी कळकळीने सांगते की, जसं तुम्ही नवर्‍याचं ताट आधी वाढता, तसंच स्वत:चंही ताट वाढायची सवय करा. स्वत: व्यवस्थित आणि चांगलं जेवून घ्या. आहारात भाजी, डाळ यांचे प्रमाण जास्त ठेवा. सीझनप्रमाणे भाज्या खरेदी करा. कारण, घरातली महिलाच जर सशक्त नसेल, तर ती घराकडे अजिबात लक्ष देऊ शकत नाही. कारण, तिच्यावरच मुलं-बाळ, नवरा असं सगळं कुटुंब अवलंबून असतं. त्यामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकरीत्याही महिलांना सक्षम करणं गरजेचं आहे. तसेच बरेचदा हातात पैसे नसल्याने महिलांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होते. परिणामी, त्या निर्णय घेऊ शकत नाहीत. याकडेही लक्ष द्यायला हवे. त्यामुळे आई जर मानसिकरीत्या स्थिर नसेल, तर ती मुलांना कशी घडवणार? बायकांना त्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणं गरजेचे आहे.

आमच्या भविष्यातील उपक्रमांविषयी सांगायचे तर आगामी काळात सहकारी रुग्णालय उभारणीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आणखी एका उपक्रमावरदेखील आमचे काम सुरू आहे. बर्‍याशा घरांमध्ये फक्त म्हातारी नाही, तर आजारी माणसंही असतात. आपण जाणतोच की, घरात एक माणूस आजारी असला की, अख्खं घर आजारी होतं. तर अशा आजारी व्यक्तींना घरासारखीच एक दुसरी छान जागा वास्तव्यास मिळाली, तर त्यांना तिथे ठेवणार्‍या कुटुंबीयांना, नातेवाइकांनाही त्याची खंत वाटता कामा नये. हा अजिबात आजारी सदस्याची जबाबदारी टाळण्याचा मुद्दा नसून, त्या आजारी व्यक्तीची व्यवस्थित सोय होईल, त्यांना आराम करता येईल, खाणे-पिणे नीट मिळेल, घरासारखं एकूणच वातावरण असेल, या धर्तीवर आगामी काळात एक संस्था उभी करण्याचा आमचा मानस आहे. बरेचदा शहरांमध्ये घरं लहान असतात. त्यात अनेकांना नाइलाजाने आईवडिलांची सेवा करणं शक्य होतं नाही. सामाजिकदृष्ट्या याकडे आईवडिलांना टाकून दिलं, या दृष्टिकोनातून पाहिलं जाईल, पण ‘मी माझ्या आईवडिलांची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी घेतोय,’ असं लोकांना अभिमानाने सांगता यावं, अशी संस्था आम्हाला उभी करायची आहे.
डॉ. प्रिया चाफेकर
@@AUTHORINFO_V1@@