एक महिला आणि तीही बांधकाम व्यवसायात येऊ पाहत आहे, ही संकल्पनाच बर्याच जणांना धक्का देणारी होती. स्त्रीमुळे घराला घरपण येतं. त्यामुळे घर कसे असावे, हे एका स्त्रीशिवाय आणखी कोणाला चांगले समजणार? त्यामुळेच बांधकाम व्यवसायात आपले स्थान निर्माण केलेल्या ज्योती श्रीपाद दाते या ग्राहकांची नेमकी गरज ओळखून घर कसे असावे, याची आखणी करतात. त्यातूनच प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर मिळणे सोपे झाले. स्वप्नातील घर प्रत्यक्षात पाहिल्यावर अनेकांच्या गालावर खुललेली कळी पाहूनच ज्योती समाधानी होतात. तेव्हा, जागतिक महिला दिनानिमित्त या उद्योजिकेने कथन केलेला त्यांचा प्रवास त्यांच्याच शब्दांत...
माझा जन्म डोंबिवलीचा, पण माझे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा. गावी घर आणि शेतीही. बालपण सगळे डोंबिवलीत गेले असले, तरी गावी आजही आवर्जून जाते. मला शेतीची खूप आवड. त्यामुळे गावी गेल्यावर मी शेतात आजही रमते. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले गाव आणि गावातील गर्द हिरवी झाडे मन मोहून टाकतात. माझे शालेय शिक्षण डोंबिवलीतील मराठी माध्यमाच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रामनगर येथे झाले. त्यानंतर कन्या शाळेत प्रवेश घेतला. दोन वर्षे आरकेटी महाविद्यालय, उल्हासनगरयेथे पुढील शिक्षण घेतले. पुढे मुंबई विद्यापीठातून बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. एक साधी सरळ नोकरी करायची, एवढेच शिक्षण घेताना ध्येय डोळ्यांसमोर होते. पण, नोकरी कधी केलीच नाही, तेवढ्यातच लग्नाचे सुत जुळले. १९९६ मध्ये माझा विवाह झाला. आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना दिल्यावर ते नेहमी वाढते. कधीकधी आपल्यापेक्षा लहान व्यक्तीदेखील आपल्याला काहीतरी शिकवून जातात. मुळातच शिकविण्याची आवड असल्याने शिकवणी वर्ग सुरू केले. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना नोकरी मिळवण्याचे ध्येय कुठेतरी मागे पडले. शिक्षण घेताना नोकरी करायचे, हे मनाशी ठरविले होते. पण, लग्नानंतर मात्र कधीही नोकरीकडे वळलेच नाही.
नोकरी करण्याचे स्वप्न बाळगले असले, तरी स्वत:चे शिकवणी वर्ग सुरू करून व्यवसाय क्षेत्रातच मी पाय रोवला. जणू काही उद्योग क्षेत्र मला खुणावत होते. हे क्लास व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवित होते. क्लास व्यावसायिक पद्धतीने सुरू केले असले, तरी सामाजिक बांधिलकीही मी या काळात जपली. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रामध्ये आठवड्याच्या शेवटी एक दिवस जाऊन त्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचे धडे दिले. २००७ मध्ये कल्याणच्या सुप्रसिद्ध ‘खिडकी वडा’ यांची फ्रेंचाईझी घेतली होती. ठाणे, कल्याण आणि बदलापूरमधील प्रत्येकी एक आणि डोंबिवलीत दोन फ्रेंचाईझी माझ्याकडे होती. कामाचा आवाका जास्त असल्याने ते सर्व एकटीने करण्यासारखे नव्हते, हे माझ्या लक्षात आले. पण, या कामात कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली. माझ्या भावाच्या मदतीने हा व्यवसाय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत होता.२००५साली माझे पती श्रीपाद दाते यांनीही नोकरी सोडून बांधकाम व्यवसायात पदार्पण करायचे ठरविले. मध्यमवर्गीय कुटुंबात नोकरी म्हणजे खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग समजला जातो. नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याने सुरुवातीला कुटुंबीयांनी वेड्यातही काढले, पण आम्ही एकमेकांच्या पाठीशी कायमच समर्थपणे उभे राहिलो. माझीही नोकरी नसल्याने खात्रीशीर असे कोणतेही उत्पन्न मिळण्याचा मार्ग नव्हता. सुरुवातीला हा व्यवसाय भागीदारीत सुरू झाला होता. भागीदारासोबत व्यवसाय करताना अनेक अडचणी येऊ लागल्या. असे किती दिवस सुरू राहणार, असा विचार आमच्या मनात आला. त्यावर श्रीपाद यांनी “मी एकटा काही करू शकत नाही,” असे सांगितले. हे बोलणे माझ्या आयुष्याचा ‘टर्निंग पाईंट’ ठरले.
मग २०१० पासून मीसुद्धा या व्यवसायात लक्ष देण्याचा निर्णय घेतला. वैयक्तीकरीत्या पहिला प्रकल्प ठाण्यातील पाचपाखाडी येथील ‘कीर्तिकर सोसायटी’चा हाती घेतला. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ‘फेज वन’ हा सात मजली आहे. आता दुसर्या टप्प्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प २१ मजली आहे. या प्रकल्पातूनच बांधकाम व्यवसायातील माझ्या करिअरची मुहूर्तमेढ रोवली गेली. माझ्यासाठी हे क्षेत्र कोर्या पाटीप्रमाणे होते. सुरुवातीच्या काळात अनेक गोष्टी मीही शिकत होते. मला हळूहळू हे क्षेत्र आवडू लागले. ‘आर्किटेक्ट’ला भेटणे, महापालिकेत जाणे, वकिलांना भेटणे ही सगळी कामे मी नेमाने करत होते. ७/१२चा उतारा मिळवण्यासाठी दहा खेपा घालाव्या लागतात, हेही लक्षात आले. पण, आता त्या कामासाठी सरकारी कार्यालयाचा उंबरठा झिजवावा लागत नाही. बांधकाम व्यवसाय हे क्षेत्र महिलांसाठीदेखील तितकेच योग्य आहे, असे मी म्हणेन. पण, तरीही या क्षेत्रात महिलांची संख्या फार कमी आहे. ज्या महिला आहेत,त्या केवळ नामधारी आहेत. त्या महिलांना संधी मिळत नाही. या दरम्यान मला बर्याच वास्तुविशारद महिला भेटत होत्या, पण त्यापैकी कुणीही बांधकाम व्यावसायिक नव्हत्या. माझ्या सुदैवाने मला चांगली संधी मिळाली. लोकांना एक महिला बांधकाम व्यवसायात उतरते, ही संकल्पनाच मुळी रुजायला अनेक वर्षे गेली. सुरुवातीला सोसायटी विकसित करण्यासाठी प्रस्ताव येत होते, तेव्हा एक महिला बांधकाम व्यावसायिक म्हणून सर्वांना आश्चर्य वाटायचे. पण, एक महिला म्हणून ग्राहकांनी त्यांचे पहिले घर सोडणे आणि दुसरे घर मिळविणे यात त्यांना ‘कनेक्ट’ करणे मला सोपे गेले. कारण, घरात नेमक्या काय अडचणी आहेत, हे पुरुषांना साधारण माहीत नसते. सुरुवातीच्या काळात प्रत्येक कामाच्या ठिकाणी मी स्वत: जात असे. त्या ठिकाणी गेल्याशिवाय तेथील आव्हाने काय आहेत, हे लक्षात येत नाही. प्रत्येक नवीन सरकारबरोबर नियमही बदलतात. त्यांचा योग्य तो ताळमेळ घालून आर्थिक गणित बसवावे लागते. ग्राहकांचाही तोटा होऊ नये याचाही ताळमेळ घालता आला पाहिजे. या गोष्टी या क्षेत्रात आल्यावर समजले. पूर्वी फक्त काठावर उभी राहून सगळ्या गोष्टी पाहत होते, पण प्रत्यक्षात काम करायला लागल्यावर या क्षेत्रातील खाचखळगे समजायला लागले. बँकिंग, आर्थिक व्यवहार करणे, कायदेशीर गोष्टी पाहणे, ‘रेरा’ रजिस्टर करणे ही कामे सध्या मी पूर्ण आत्मविश्वासाने करते. सुरुवातीच्या काळात ‘साईट’वर जाण्याचाही अनुभव माझ्या गाठीशी आहे. आता आमची पुढची पिढी हा भार सांभाळत असल्यानेे मला फारसे ‘साईट’वर जावे लागत नाही. आमच्याच कुटुंबातील काही सदस्य या व्यवसायात कार्यरत आहेत. पण, सध्या पूर्वीपेक्षा दहा पटीने कागदपत्रांचे काम वाढले आहे, हेही सांगावेसे वाटते.
बांधकाम क्षेत्रातील आर्थिक गणिते खूप मोठी असतात. त्यात आमच्याकडे कोणीही ‘गॉडफादर’ नव्हता. कुणीही एकरकमी पैसे आणून देणारे नव्हते. त्यामुळे आर्थिक गणिते स्वत:ची स्वत:च जुळवावी लागणार होती. डोंबिवली पश्चिमेमध्ये बांधकाम प्रकल्पाचे काम आम्ही २००९ साली हाती घेतले होते. ते काम आता जवळजवळ पूर्ण होत आले आहे. त्यात आमचे भांडवल गुंतून राहिले आणि बँकेचे हप्ते भरताना अक्षरश: नाकीनऊ आले. आम्ही लोकांची घरे बांधत होतो, पण सुरुवातीच्या काळात आर्थिक गणिताचा ताळमेळ बसवण्यासाठी आम्हाला आमचे राहते घरदेखील विकावे लागले. आम्ही भाड्याच्या घरात येऊन राहू लागलो. तब्बल पाच वर्षे भाड्याने राहत होतो. या खडतर प्रवासात मुलीनेही चांगली साथ दिली. कधीही कोणत्या गोष्टीसाठी तिने हट्ट धरला नाही. ती आता ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहे. त्यामुळे कार्यालयात ती फारशी येत नसली, तरी सगळ्या गोष्टी तिला माहीत आहेत. भली-बुरी माणसे या प्रवासात भेटलीच. पण, याच क्षेत्राने मला माणसांची पारख करायला शिकवले. सरकारी कामकाज कसे चालते, हेसुद्धा नीट समजले.अनेक गोष्टी शिकता आल्या. आज जुन्या इमारतींना विकसित करण्याचे काम आम्ही करतो. पण, कोणतेही काम करताना कायदेशीर मार्गाचाच अवलंब करायचा याकडे आमचा नेहमी कटाक्ष असतो. त्यात कमीत कमी काळ नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत तेथील रहिवाशांना बाहेर राहावे लागेल, असा आमचा प्रयत्न असतो. कायद्याला धरून राहिले की संघर्ष होतो, पण आपण चोख काम केले आहे, हे आपल्याला माहीत असते. ते कामच आयुष्यात समाधान देऊन जाते. आम्ही खडतर प्रवासातून मार्ग काढून सगळे पुन्हा मिळवले आहे. आता कुटुंबीयांनाही आमचा अभिमान वाटतो.
सासर्यांची इच्छा होती की, आपल्या मुलांनी बांधकाम व्यवसायात यावे. त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करायचे, हे मनाशी पक्के केले होते. त्यानुसार त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण केले, पण साकार झालेले स्वप्न पाहायला ते या जगात नव्हते.
सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना ‘इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट’ या दोन्ही संस्था माझ्या आवडीच्या होत्या. व्यवसायातील ताणतणाव विसरून सामाजिक कार्यासाठी मी या संस्थांमध्ये सक्रिय झाले. ‘टीमवर्क’मुळे अनेक कामे करता आली. कधी कधी एखादे काम एकट्याने करण्यापेक्षा ‘टीम’ने केले की, ते अधिक चांगले होते. या संस्थांनीही मला खूप काही शिकवले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात वेगवेगळ्या कामानिमित्ताने जाता आले. विविध उपक्रमांमध्ये माझा सहभाग असायचा. आपण समाजाचेही काही देणे लागतो, ही भावनापूर्ती या संस्थांच्या माध्यमातूनच झाली.आज असे कोणतेही क्षेत्र फक्त महिला किंवा फक्त पुरुषांसाठी ‘स्पेसिफिक’ बनलेले नाही. यामध्ये खरं तर आपण कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. तेव्हा, जे क्षेत्र आपण निवडले आहे, त्याच क्षेत्रात प्रचंड मेहनत करून, सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम केले, तर यश तुमचेच आहे!
- ज्योती श्रीपाद दाते
शब्दांकन : जान्हवी मोर्ये