‘महिला दिना’चा अर्थसंकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2021   
Total Views |

women _1  H x W



८ मार्च महिला दिन. आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. जसे काही महिला दिनी अर्थसंकल्प जाहीर होणार म्हणजे वाटते की, महिलांसाठी विशेष सुविधा वगैरे देणार आहेत की काय? पण, मग पटकन लक्षात येते, अरे आपण अजून २०१९ पूर्वीच्या काळात राहून विचार करतो की काय? कारण ते भाजपचे ‘सबका साथ, सबका विकास’चे सरकार जाऊन आता सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि हिरन मनसुख यांनी ज्या राज्यात तथाकथित आत्महत्या केल्या, त्या सत्तेच्या राज्यात आपण आहोत. त्यामुळे आपण आशा तरी कुणाकडून करतोय? ज्या राज्यात कोरोना काळात जनता त्राहीमाम करत होती, ज्या राज्यात सत्ताधाऱ्यांविषयी तोंडातून ‘ब्र’ काढला तर घर बुलडोझरने पाडण्याचे, डोळे फोडण्याचे आणि बंगल्यात नेऊन मरेस्तोवर मारण्याचे परिणाम भोगावे लागतात, त्या राज्यात महिलांसाठी काय नवे असणार ? आता कागदोपत्री सारे आलबेल दाखवावे लागते, लोकांना खूश करायला काहीतरी आकडेवारी तोंडावर फेकावी लागते म्हणून काहीतरी थातूर-मातूर उपक्रम योजनाही कदाचित या अर्थसंकल्पात असतील. पण, मोठा गाजावाजा करत जाहीर झालेल्या ‘शक्ती’ कायद्याचे या समाजातील नराधमांनी कसे तीन-तेरा वाजवले, हे सगळ्यांना माहिती आहे. यावर काही लोक म्हणतात, छे छे काहीही काय म्हणता? ‘शक्ती’ कायदा चांगलाच आहे. पण, तो काही मंत्र्याबिंत्र्यांसाठी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी नाही, बरं का? त्यांनी कितीही लग्न करू दे, कितीही मुलांना जन्म देऊ दे, एक-दोन आणि तिसरीनेही बलात्काराचा बोभाटा करू दे. पण, नाही; त्यांच्यासाठी ‘शक्ती’ कायदा नाही. पूजा चव्हाण दोन महिन्यांची गरोदर असताना तिचा गर्भपात झाला, तिच्या मृत्यूला कारणीभूत असण्याचा सबळ पुरावा म्हणून संजय राठोडांनी राजीनामा दिला. पण, छे! पूजा कोण होती? कुण्या मंत्र्याची मुलगी थोडी होती? तिच्यासारख्या कोट्यावधी जन्मतात आणि हजारो मरतात. तिच्याबरोबर काय झाले, याचा तपास करणेही ‘शक्ती’ कायद्यात अभिप्रेत नाही का? जळगावला शासकीय वसतिगृहामध्ये निष्पाप मुलीबाळींना जबरदस्तीने विवस्त्र नाचवले गेले. गृहमंत्री म्हणतात, तक्रार करणारी वेडी आहे. विवस्त्र नाचवलेल्या त्या लेकीबाळींच्या इज्जतीचा आणि भावनांचा क्रूर तमाशा झाला. त्या तमाशासाठी ‘शक्ती’ कायदा नाही? असो. तर उद्याच्या अर्थसंकल्पात काहीही तरतुदी असल्या तरी त्यांचा उपयोग केवळ आणि केवळ फोटोफ्रेमसाठी आणि न्याय मागणाऱ्या जनतेच्या तोंडावर मारण्यासाठीच असेल.
 
 
परमेश्वराचे न्यायालय आणि ‘त्या’

लोकमान्य टिळकांनी इग्रजांच्या जुलमी राजवटीला कंटाळून अग्रलेख लिहिला होता की, ‘या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ आज ‘महिला दिना’च्या निमित्ताने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण पाहिले की वाटते, बाप रे! आपण त्या नायजेरिया, सीरिया किंवा मध्यपूर्वेच्या कट्टरपंथी देशात तर राहत नाही ना? जळगावच्या वसतिगृहातील घटना मनातून काही केल्या जात नाही. बेघर आणि दुर्दैवाने गांजलेल्या त्या महिला. जगणे म्हणजे एक शिक्षाच. या महिलांना म्हणे विवस्त्र नाचवले गेले. तिथे पोलीस आणि बाहेरचे काही नराधम पुरुषही होते. हा घटनाक्रम डोळ्यासमोर येताच, न पाहिलेल्या महिलांचा आक्रोश, रडणे, आकांत मनाला अस्वस्थ करतो. इथे त्या आल्या असतील, कारण बाहेरच्या जगाने त्यांच्या स्त्रित्वाला, त्यांच्या जगण्याला असंख्य दुःख दिले असेल. पण, इथेही त्याच्यापेक्षा भयंकर प्रसंगाला त्यांना तोंड द्यावे लागले. आता गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात की, तक्रार करणारी महिला वेडी आहे. आम्ही याची निष्पक्ष तपासणी करण्यासाठी समिती बनवली, त्यात चार महिला पोलीस अधिकारी होत्या. वा रे वा! छान समिती. ज्या खात्यातल्या लोकांवर आरोप आहे, त्याच खात्यातल्या महिलांना चौकशीला पाठवले. पोलीस समाजाचा रक्षक आहे, मान्य पण तळागाळात पोलीस आणि सामान्य जन यांचे काय संबंध आहेत ते तपासणे गरजेचे आहे. असो. हा विषय वेगळा आहे आणि अत्यंत गंभीर आहे. आता ज्या तक्रारदार महिलेला वेडे ठरवले ती महिला स्वतःहून म्हणेल, “मी वेडी आहे आणि वेडाच्या भरात बिचाऱ्या पोलिसांचे आणि त्या सज्जन पुरुषांचे नाव घेतले.” ती जे म्हणते ते खरे आहे हे शपथेवर सांगण्यासाठी अनेक साक्षीदारही तयार होतील. त्या महिलेला वेड्याच्या इस्पितळातही टाकले जाईल. पुढे कदाचित तिचीही पूजा चव्हाणच होईल का? आताही लिहिताना वाईट वाटते की, कुणाला वाचवले जात आहे? ती वेडी होती तर सरकारी वसतिगृहात वेड्या महिलेला का ठेवले होते? तिची रवानगी वेड्यांच्या दवाखान्यात का केली गेली नाही? जर ही घटना सत्य नसेल तर ठीकच. पण, जर खरंच त्या वसतिगृहात मुलीबाळींना विवस्त्र नाचवले गेले असेल आणि गृहखात्याची-सरकारची बदनामी नको म्हणून ती केस दाबली गेली, तर लोकमान्य टिळकांच्याच शब्दात म्हणावेसे वाटते की, “इथल्या न्यायालयावरही एक न्यायालय आहे, ते परमेश्वराचे न्यायालय आहे.” लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या ‘त्या’ न्यायालयात या घटनेची सुनावणी नक्कीच होईल, मग सत्ताधारी असोत का आणखी कुणी!

 

9594969638

@@AUTHORINFO_V1@@