पण, आता अमेरिकेने काश्मीर आणि भारत-पाकिस्तान संबंधांबाबत ज्या प्रकारच्या भूमिकेचे संकेत दिले आहेत, ते त्यांचे संतुलनाचे धोरण प्रतिबिंबित करत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अमेरिका ना भारताला त्रास देणार आहे, ना पाकिस्तानबद्दल कठोर भूमिका घेणार आहे. पाकिस्तान सीमेवरून घुसखोरीच्या घटना आणि सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याच्या घटनांविषयी अमेरिकेने चिंता व्यक्त केली असून ते थांबवावे, असे म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेकडे पाकिस्तानला देण्यात आलेला संदेश म्हणूनही पाहिले जाऊ शकते. जरी भूतकाळात अशी वक्तव्ये अमेरिकन नेते-खासदार आणि राज्य विभागांकडून येत असली, तरी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे हे विधान महत्त्वाचे आहे, कारण गेल्या महिन्याच्या २५ तारखेला भारत आणि पाकिस्तानच्या महासंचालकांची बैठक झाली आणि युद्धबंदी तोडू नये, यावर एकमत झाले. अमेरिकन प्रयत्नांचा परिणाम म्हणूनदेखील या बैठकीकडे पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे. अमेरिकेने शांतता प्रक्रिया पूर्ववत करण्याच्या आशा पुन्हा एकदा निर्माण केल्या जाऊ शकतात, या दिशेने आता वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, पाकिस्तान सीमेवरून युद्धबंदीचे उल्लंघन आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबतचे सत्य कोणापासूनही लपलेले नाही, ते कसे थांबेल हा प्रश्न आहे. भारत दीर्घकाळापासून सीमेपलीकडील दहशतवादाच्या स्रोतांना बळी पडत आला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने आपल्या देशातून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणू नये काय? परंतु, अमेरिका पाकिस्तानवर असा दबाव आणेल काय? याबाबत मात्र संदेह आहे.
निश्चितच आशियाई प्रदेशात भारत आणि पाकिस्तान या दोहोंचे महत्त्व असल्याचे बायडन प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पाकिस्तानबरोबर त्याचे अनेक हितसंबंध आहेत. अमेरिकेला माहीत आहे की, पाकिस्तानच्या मदतीशिवाय ते अफगाणिस्तान सोडू शकत नाही व तिथेच राहूदेखील शकत नाही. दुसरीकडे, आर्थिक आणि सामरिक कारणांमुळेच भारताचे स्थानदेखील महत्त्वाचे आहे. अमेरिकेसाठी भारताचे हे महत्त्व निश्चितच कमी नाही. चीनला वेढा घालण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसह बनविण्यात आलेल्या ‘क्वाड समूहा’चा भारतदेखील एक सदस्य आहे. प्रशांत महासागराच्या क्षेत्राच्या देशांमधील धोरणात्मक दृष्टिकोनातून भारताची स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे यात शंका नाही. अमेरिकन शस्त्रास्त्रांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे आणि या दोघांमध्ये कोट्यवधी डॉलर्सचे संरक्षण करार आहेत. जागतिक राजकारणातही भारताचे महत्त्व वाढले आहे. परंतु, अमेरिकेसाठी त्यांना स्वतःचे हित जोपासणे कायम महत्त्वाचे वाटले आहे. अशा परिस्थितीत तो देश असे काही करणार नाही, ज्यामुळे त्यांचे हित प्रभावित होईल. सत्य हे आहे की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याबाबत जगातील कोणत्याही राष्ट्राने कोणतेही धोरण स्वीकारले असले तरी त्याबद्दल आपल्या मनात शंका असण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, जगाचे नेतृत्व करणार्या महासत्तेने आत्मपरीक्षण करून आपण आपले हित जोपासताना कोणाला साथ देत आहोत याचा विचार करणे नक्कीच आवश्यक आहे. भारताबाबत भूमिका घेताना अमेरिकेने सर्वश्रुत असलेल्या पाकपुरस्कृत दहशतवादाबद्दल कठोर भूमिका घेण्याची नक्कीच आवश्यकता आहे.