बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी सामना रंगणार

    06-Mar-2021
Total Views |

sav_1  H x W: 0

बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी सामना रंगणार


 

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांच्या कार्यशैलीवर कठोर टिका करून भाजपवासी झालेल्या सुवेंदू अधिकारी यांना भाजपने नंदीग्राम येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आता बॅनर्जी विरुद्ध अधिकारी असा सामना रंगणार आहे.
 

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वीच पार पडली होती. त्यामध्ये प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली होती. पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी पत्रकारपरिषदेत शनिवारी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठीच्या ६० पैकी ५७ उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये सर्वांत लक्षवेधी नाव सुवेंदू अधिकारी यांचेच आहे.

 

एकेकाळी सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल सोडताना त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर कठोर टिका केली होती. बॅनर्जी या पक्षामध्ये घराणेशाही लादत असून राज्यात अराजकता पसरली असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर अधिकारी त्यांनी स्वत:हून ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली होती. त्यानंतर आता भाजपनेही अधिकारी यांनना उमेदवारी देऊन ममता बॅनर्जी यांच्यापुढील अडचणी वाढविल्या आहेत.

 

bjpk_1  H x W:  
 

दिनेश त्रिवेदी अखेर भाजपवासी

 

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दुरावस्था झाल्याचे सांगून राज्यसभेतच सदस्यत्वाचा राजीनामा देणारे तृणमूचे माजी खासदार दिनेश त्रिवेदीही अखेर भाजपवासी झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.