ग्रेटा थनबर्गमुळे चुकून लीक झालेले ‘टूलकिट’ व दिशा रवी प्रकरणानंतर आपल्या देशात या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राची चर्चा चांगलीच रंगली आहे. ‘टूलकिट’ प्रकरण सामोरे आल्यानंतर त्यावरील अनेक अहवाल, अनेक व्हिडिओ समोर आले. परंतु, खरंतर या देशात हे षड्यंत्र गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
या देशाला तोडण्यासाठी या देशात ‘सिव्हिल वॉर’ घडविण्याकरिता अनेक शक्ती देशांतर्गत कार्यरत आहेत. परंतु, अद्याप आपल्याला त्यांना हवं तेवढं अजूनही ‘एक्सपोज’ करता आलेले नाही. अतिशय टोकाची विचारधारा असलेले डाव्या विचारसरणीचे लोक विशेषत: चित्रपट निर्माते, पत्रकार, प्राध्यापक, इतिहासकार देशातील युवा पिढीच्या डोक्यात पद्धतशीरपणे विष पेरीत आहेत. त्यांना असहिष्णू बनवत आहेत व हे काम वर्षानुवर्षे सुरूच आहे. मुळात लोकशाही असलेल्या देशात विद्यार्थ्यांना सर्व विचारधारेचे ज्ञान असावे आणि त्यांनी त्यांची आपली विचारधारा ठरवावी, ही खरी लोकशाहीची ओळख आहे. परंतु, देशात त्याउलट चित्र आहे आणि ते फार भीतिदायक आहे.
आज ‘ऑनलाईन स्क्रिनिंग प्लॅटफॉर्म’च्या माध्यमातून ‘लैला’, ‘तांडव’, ‘ए सुटेबल बॉय’सारखे प्रपोगंडा सीरिज सुरू आहेत. त्यामुळे एक लक्षात येते की, ‘नेटफ्लिक्स’सारखे एक ‘ऑनलाईन स्क्रिनिंग प्लॅटफॉर्म’ हे संपूर्णपणे ‘बायस्ट’ आहे. हे नुसते डाव्या विचारसरणीचे नसून अतिरेकी, कडवट अशा डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या अधीन आहे. लोकशाहीप्रधान देशात प्रत्येक व्यक्तीला आपल्या पुस्तकाद्वारे, माध्यमांद्वारे आपापले विचार मांडता येतात. परंतु, ‘नेटफ्लिक्स’सारख्या प्लॅटफॉर्मवर ‘सेन्सॉर’ नसल्यामुळे याचा फायदा हे अतिरेकी डावे विचारसरणीचे लोक घेताना दिसत आहेत. लोकशाहीत प्रत्येक विचारधारेच्या लोकांना आपापला चित्रपट बनवता आला पाहिजे. परंतु, बॉलीवूडच्या विश्वात इतर विचारधारेच्या लोकांना तिथे अजिबात जागा नाही.
विवेक अग्निहोत्रीसारख्या अत्यंत हुशार दिग्दर्शकाला चांगले सिनेमे बनवूनसुद्धा बॉलीवूडने स्वीकारले नाही. जे बॉलीवूडवाले लोकशाही म्हणजे काय? अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय? याचे धडे शिकवत असतात, तेच मुळात असहिष्णू आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा ‘उरी’, ‘परमाणु’, ‘मिशन मंगल’ सारखे सिनेमे येतात, तेव्हा त्या सिनेमांना प्रपोगंडा फिल्म व उग्र राष्ट्रवाद म्हणून अपमानित करण्यात येतं. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ सारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आलेल्या चित्रपटाला भाजप सरकारची ‘प्रपोगंडा फिल्म’ म्हणून हिणवलं जातं. मुळातच ‘स्वच्छ शौचालय’ हा मानवाधिकार आहे. देशाला उघड्यावरील शौचापासून मुक्त करणे हे देशहिताचे कार्य आहे. पण, या उग्र डाव्या विचारांच्या बॉलीवूडकरांना ही फिल्म खुपते. त्यात त्यांना ‘फेमिनिझम’ व मानवाधिकार कसा दिसत नाही? ते ‘मनिकर्णिका’ सारख्या चित्रपटाला कमी रेटिंग देतात. त्यातच हे स्वतःला ‘चित्रपट समीक्षक’ म्हणवणारे उघडे पडतात. यामुळे देशातील ‘ऑनलाईन क्रिएटिव्ह इंडस्ट्री’मध्ये लोकशाही नाही, हे स्पष्ट होते.
‘एफटीआयआय’ सारख्या संस्थांमध्येही या लोकांनी एकाच विचारधारेचे विद्यार्थी घडविण्याचा ठेका उचलला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला लेखक, अभिनेता, दिग्दर्शक व्हायचे आहे, त्यांनी डावीच विचारधारा स्वीकारली पाहिजे, ही त्यांची धारणा. चित्रपट हे आपल्या देशात खूप मोठे प्रभावशाली माध्यम आहे, हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नसून ते तुमच्या विचारसरणीवर प्रभाव पाडते. ते तुमचा राजकीय कल ठरवते व वर्षानुवर्षे हे माध्यम अतिशय पद्धतशीरपणे एकाच विचारधारेच्या व पक्षाच्या सेवेसाठी वापरले जात असेल, तर तो लोकशाही प्रक्रियेचा व अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा खूनच आहे.
आज बहुतांश महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांमध्ये विशेष करून मुंबई व पुण्यासारख्या शहरात काही प्राध्यापक, विशेषतः पत्रकारिता, इतिहास व राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उग्र डावे विचार त्यांच्या नकळत त्यांना शिकवत आहेत. या मंडळींचे कामच असतं की, १८ ते २० वयोगटातील तरुणांना एकाच विचारधारेची ओळख करून देणे, त्यांना भडकाविणे की, ज्यामुळे या मुलांना दुसरा दृष्टिकोन, इतर विचारधारा मान्य होत नाहीत. ते संपूर्णपणे असहिष्णू होतात. इथेही एक पायाभूत प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, या देशात एखाद्या विद्यार्थ्याला आपली विचारधारा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही? महाविद्यालयांच्या जोडीला यूपीएससी-एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी सेंटरही यात सहभागी झाली आहेत. तिथे मुलं ती परीक्षा उत्तीर्ण होतील की नाही, याची शाश्वती नाही. परंतु, उग्र डावे विचार घेऊन नक्कीच बाहेर पडतील, अशी रचना मात्र त्या ठिकाणी करण्यात आली आहे.
या उग्र डाव्या विचारांमुळे इतिहास व भूगोल चुकीचा शिकवला जात असल्यामुळे हे विद्यार्थी काश्मीर, ईशान्य भारत हा भारताचा भागच नाही, असे मानतात. अशी अनेक विधाने आपण ‘जेएनयु’च्या विद्यार्थ्यांकडून ऐकली आहेत. देशाच्या मूळ संस्कृतीवर आघात करणं, देशाच्या जवानांचा अपमान करणं; परंतु दहशतवादी व नक्षलवाद्यांबद्दल ममत्व ठेवणे. असे एका साच्यातून काढल्यासारखी ही सगळी मुलं बरळतात. पण, यात दोष त्यांचा नसून यात संपूर्ण दोष हा शिक्षण व्यवस्थेचा, पद्धतीचा आहे. त्यांचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांना भ्रमित करणं हा आहे. या मुलांना भारतविरोधी ‘डॉक्युमेंटरी फिल्म्स’ दाखवल्या जातात, भारतविरोधी ‘अल झजिरा’सारखी माध्यमे विश्वासार्ह म्हणून तीच पाहा, असे सांगितले जाते. मग आपोआपच ही मुलं चीन व पाकिस्तानची बोली बोलायला लागतात. या अशा असंख्य देशविघातक शक्तींमुळे ‘जेएनयु’सारख्या विद्यापीठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचा अपमान केला जातो. पण, अफजल गुरूसारख्या अतिरेक्याचे गुणगान गायले जातात.
हे उग्र डावे विचारसरणीचे कार्यकर्ते शेतकरी, विद्यार्थी, महिला, गोरगरीब अशांना ढाल बनवतात व आपले छुपे राजकारण यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालू ठेवतात. ‘सीएए’च्या विरोधात आंदोलन उभे करून त्या विरोधात खोटा अपप्रचार केला गेला. भारतीय मुस्लीम बांधवांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली आणि त्याचा परिणाम म्हणजे, दिल्लीत दंगल करण्यात आली. त्यात स्वरा भास्करसारखे कलाकार तर आघाडीवर होते. तेव्हा काही माध्यमांनी त्यांना या विधेयकांबद्दल विचारले, तेव्हा स्वरा भास्करने मूळ विधेयकच वाचले नव्हते, हे लक्षात आले व, तिचा फोलपणा माध्यमांसमोर उघडा पडला. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांच्या मनातही कृषी कायद्यांविषयी भीती निर्माण केली जात आहे आणि लोकांनी हातात शस्त्र घेण्यासाठी ही संपूर्ण टोळी कार्यरत झाली आहे. देशाच्या प्रजासत्ताक दिनादिवशी जे नाट्य घडलं, ते संपूर्ण जगाने पाहिले. त्यांचा मूळ हेतू हा शेतकर्यांना न्याय देण्याचा नसून, समाजात फूट निर्माण करणे, समाजात अराजकता माजवणे हाच होता, हे या ‘टूलकिट’मुळे पुन्हा पुढे आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय भारतविरोधी शक्ती व खलिस्तानवाद्यांबरोबर यांचे लागेबांधे उघड झाले असून, या लॉबीचे देशविरोधी कार्य समोर आले. परंतु, आपल्या देशातसुद्धा अशा शक्ती अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत व त्यांचेही भारतीय ‘टूलकिट’ नक्कीच आहे.
- पायल कबरे
(लेखिका भाजयुमो, महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक-विद्यार्थी विभाग आहेत.)