‘पासिंग’साठी भुर्दंड; रिक्षाचालक बेजार
ठाणे: राज्य शासनाने रिक्षा भाड्यांमध्ये वाढ केली आहे. या भाडेवाढीनंतर रिक्षांच्या मीटरमध्ये (मीटर कॅलिब्रेशन) सुधारणा करावी लागणार आहे. ही सुधारणा करून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) ज्या एजन्सी नियुक्त केल्या आहेत. त्या एजन्सींकडून रिक्षाचालकांची लूटमार सुरू आहे.
ठाणे ‘आरटीओ’च्या अंतर्गत ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, शहापूरचा भाग येतो. या भागात जवळपास ७६ हजार ३७ रिक्षा रस्त्यांवर धावत आहेत. मात्र, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील रिक्षांची संख्या जास्त असून, ही संख्या ७० हजारांच्या आसपास आहेत. रिक्षाची नवीन भाडेवाढ १ मार्चपासून लागू झाली आहे. मात्र, रिक्षांचे ‘मीटर कॅलिब्रेशन’ होईपर्यंत ‘टेरिफ कार्ड’नुसार रिक्षाचालकाला भाडे आकारता येणार असले तरी रिक्षाचालकांनी ‘मीटर पासिंग’ची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यानुसार, ‘पासिंग’साठी शासनाने ७०० रुपयांची दरनिश्चिती केली आहे. मात्र, ठाण्यातील सुपर, स्टॅईड, सनसुई व दिघे या मीटर एजन्सीकडून एक हजार रुपयांची वसुली केली जात आहे. वाढत्या महागाईत एकीकडे भाडेवाढीचा दिलासा मिळाला असला, तरी ‘मीटर पासिंग’च्या नावे रिक्षाचालकांची लूटमार सुरू आहे.
दरम्यान, रिक्षाच्या भाडेवाढीनंतर पुढील तीन महिन्यांमध्ये ७६ हजार रिक्षांचे ‘मीटर पासिंग’ करण्याचे आव्हान ठाणे ‘आरटीओ’पुढे आहे. हा कालावधी पाहता दिवसाला सरासरी सुमारे ८४४ रिक्षांचे ‘मीटर पासिंग’ करावे लागणार आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्तांसोबत ‘आरटीओ’ अधिकार्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्यानुसार, शनिवार आणि रविवारीदेखील ‘मीटर पासिंग’ करण्यात येणार असल्याचे ‘आरटीओ’ अधिकार्यांनी सांगितले.