ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ आणि पूजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2021   
Total Views |

Australia_1  H


ऑस्ट्रेलियाची घटना. ३० वर्षांपूर्वी एका १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. दडपण, भीती आणि दुःखाने तिने कसेबसे जीवन जगले. मात्र, त्याबाबत तिने तिच्या दैनंदिन रोजनिशीमध्ये लिहिले होते. तो बलात्कार ती विसरली नव्हती. त्या बलात्काराचे मानसिक दुष्परिणाम तिच्यावर झाले होते. अगदी वयाची चाळिशी पार केली, तरी ती विसरू शकली नाही. मात्र, तीन विचारवंत महिलांनी तिच्यावरच्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे ठरवले. बलात्कार होऊन चार दशके उलटली होती. मात्र, त्यांनी सर्व घटनांची पुराव्यासकट माहिती देणारे ३१ पानांचे पत्र पंतप्रधानांना दिले. कारण, गुन्हेगार आता देशाच्या राजसत्तेमध्ये होता. तो सत्ताधारी पक्षाचा कॅबिनेट मंत्री होता. पंतप्रधानांचे म्हणणे होते की, “केवळ प्रसारमाध्यमे म्हणतात म्हणून मी माझ्या कॅबिनेट मंत्र्याला अजिबात पायउतार करणार नाही. तो गुन्हेगार आहे की नाही, हे शोधायला मी पोलीस नाही.” दुसरीकडे त्या मंत्र्याने, “आपण काही केलेच नाही, आपल्याला फसवले जात आहे,” असे त्या सांगितले. या मंत्र्याचा आधार घेऊन मग पंतप्रधान सगळ्यांना म्हणाले की, “तो म्हणतो, त्याने काही गुन्हा केला नाही. तो खोटं बोलत नाही, त्यामुळे त्याने गुन्हा केलाच नसेल.” तर त्यांच्या या विधानानंतर त्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांचे म्हणणे होते की, ३० वर्षांपूर्वी घडलेल्या कथित बलात्काराचे कोणतेही समाधानकारक पुरावे नाहीत, त्यामुळे ही केस बंद करायला हवी.
 
 
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी माफी मागितली होती. कारण, हिगीन्स नावाच्या एका तरुणीवर पार्लमेंट हाऊसमध्येच बलात्कार झाला होता. त्यात त्यांच्याच सरकारचे मंत्रिमहोदय सहभागी होते. माफी मागून न्याय देता येतो का? असो. हे सगळे वाचून काही आठवले का? पूजा चव्हाणची आणि त्यानंतर घडत असलेल्या नाट्याची आठवण आलीच असेल. नेता म्हटले की, त्याला सगळे गुन्हे माफ हे काही आपल्या इथेच नाही. (आपल्या इथे म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या इथे) तर पार सातासमुद्रापलीकडेही आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घडणाऱ्या या प्रकरणामुळे सध्या तिथे वातावरण ढवळून गेले आहे. पण, तिथल्या प्रशासनाला याचे काही सोयरसुतक नाही. आपला कॅबिनेट मंत्री कसा चांगला आहे? त्याने कसा गुन्हा केला नाही? हे सांगण्यात ते व्यस्त आहेत. ऑस्ट्रेलिया हा देश तसा पाश्चात्त्य घडणीचा. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे इथेही पार कौतुक. पण, या प्रकरणामुळे इथली मानवी मूल्ये राजकीय गदारोळात विलुप्त झालेली दिसतात. इथल्या महिला राजकीय नेत्याही अगदी चिडिचूप आहेत. कारण, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानच कॅबिनेट मंत्र्याची पाठराखण करत आहेत. या मंत्र्याच्या गुन्ह्याचे पत्र पंतप्रधानांना दिले गेले होते. त्यामुळे पंतप्रधानांना माहिती आहे की तो कोण आहे? पण, त्यांनी त्याचे नावही उघड केले नाही. तिथल्या सामाजिक संघटना उघड-उघड गुन्हेगाराचे नाव घेतात. पण, प्रशासनाकडून पुष्टी नाही म्हणून त्यांनाही माघार घ्यावी लागत आहे.
 
 
ही घटना पाहिली की वाटते, जग गोल आहे. कुठे आपला महाराष्ट्र आणि कुठे ऑस्ट्रेलिया? पण, एकाच कालावधीत तिथे थोड्याफार अंतराचे समान गुन्हे घडले. गुन्हेगार सत्ताधारी म्हणून पुरावे दाबले जाण्याची शक्यता. त्यातच प्रमुखांनी गुन्हेगारांची केलेली पाठराखण. आता म्हणे ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांचे म्हणणे आहे की, आता जिच्याबद्दल तक्रार झाली ती तर हयात नाही. घटना ३० वर्षांपूर्वीची आहे, आता त्या घटनेचे काय करायचे? असेही त्यांचे म्हणणे आहे. तिथल्या काही प्रतिष्ठित लोकांनी तर असेही म्हटले आहे की, ३० वर्षे ती काय करत होती? यांना कोण सांगणार की ३० वर्षे ती क्षणक्षण मरत होती. जगभरातल्या मुलीबाळी आपले शरीर फुलासारखे जपतात. भावी आयुष्याची स्वप्नही बघतात. पण, अचानक आणि अतिशय निर्घृणपणे तिच्यावर जेव्हा बलात्कार होतो, तेव्हा ती शरीरानेच नव्हे, तर मनानेही जखमी होते. एकूण परिस्थिती पाहता वाटते की, खरंच जागतिक परिघात न्याय आता केवळ धनदांडग्यांच्या हातातले खेळणे झाले आहे का? सत्ताधारी ठरवतील तो न्याय आणि तेच सत्य असे झाले आहे का? ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ आहे. स्त्रियांच्या शक्तीबद्दल कर्तृत्वाबद्दल गोडवे गायले जातील. पण, जागतिक स्तरावर तिच्यासोबत घडणाऱ्या अन्यायाला किती टक्के न्याय मिळतो, याचाही मागोवा घ्यायला हवा.
@@AUTHORINFO_V1@@