बंगालमध्येही योगींचा झंझावात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2021   
Total Views |

Bangal_1  H x W
 
 
 
उत्तर प्रदेशात भाजप सरकार येण्यापूर्वी राज्याची जशी स्थिती होती, काहीशी तशीच स्थिती सध्या बंगालची झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था जवळपास नष्ट होणे, प्रचंड भ्रष्टाचार, विशिष्ट समुदायाचे लांगुलचालन, बहुसंख्य हिंदू समुदायाचा मानभंग करणे, असे प्रकार राज्यात घडत आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे हिंदुत्व, सुशासन आणि विकास कसा साध्य करता येतो, याचे उदाहरण बंगाली जनतेस दाखविण्यासाठी योगी बंगालमध्ये सक्रिय झाले आहेत.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ओळख २०१६ पर्यंत भाजपचे खासदार अशी होती. मात्र, उत्तर प्रदेशात सत्ता आल्यानंतर भाजपने योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदी नेमून अनेकांना धक्का दिला होता. कारण, मठाचे प्रमुख असलेल्या योगींची प्रतिमा विशिष्ट प्रसारमाध्यमांच्या मदतीने अतिशय नकारात्मक आणि मूलतत्त्ववादी अशी तयार करण्यात आली होती, त्यात साहजिकच काँग्रेस, समाजवादी पक्ष आघाडीवर होते. मात्र, मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर उत्तर प्रदेशचा कायापालट करण्यास त्यांनी सुरुवात केली. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा तिन्ही स्तरांवर व्यापक सुधारणांना राज्यात प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे, धार्मिक व्यक्ती म्हणजे अंधश्रद्धाळू, असा समज पसरविणाऱ्यांनाही योगी आदित्यनाथ यांनी चोख उत्तर नोएडामध्ये जाऊन तेथे मोठ्या प्रकल्पांचा शुभारंभ करून दिले आहे. कारण, नोएडात जाणे म्हणजे, हमखास पराभवाची हमी अशी अंधश्रद्धा पाळणारे कथित पुरोगामी मुख्यमंत्री उत्तर प्रदेशने यापूर्वी पाहिले आहेत. एकीकडे विकासाची भाषा बोलणारे योगी आदित्यनाथ हिंदुत्वाची भाषाही तेवढ्याच प्रभावीपणे बोलतात. हिंदुत्व आणि विकास यांची सांगड घालणे जमले की काय होते, याचा अनुभव देशाने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाद्वारे घेतला आहे. कदाचित, त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा नकारात्मक रंगविण्यात काही प्रसारमाध्यमे, राजकीय पक्ष आजही धन्यता मानत आहेत. असो.
 
 
योगी आदित्यनाथ देशभरात हिंदुत्वाचा प्रमुख चेहरा बनले आहेत. त्यामुळे साहजिकच प्रत्येक राज्यामध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे. त्याची प्रचिती पश्चिम बंगालमध्ये सध्या येत आहे, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये योगी आदित्यनाथ यांचा समावेश करण्यात आला आहे. बंगालमध्ये प्रथम 34 वर्षांची डाव्या पक्षांची राजवट आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजवटीमध्ये राज्यातील हिंदू समुदायाविरोधात वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आले. त्यामुळे तेथील हिंदू एका प्रखर नेतृत्वाची वाट पाहतच होते. योगींच्या रूपात त्यांना ते नेतृत्व आता मिळाले आहे. योगी आदित्यनाथ यांनी २ मार्च रोजी बंगालमधील मालदा येथे एका प्रचारसभेस संबोधित केले. योगींना ऐकण्यासाठी सभेत प्रचंड गर्दी झाली होती. सभेमध्ये योगींनी बंगाल ही राष्ट्रवादाची जननी असल्याची जाणीव करून दिली. ‘गर्व से कहों हम हिंदू हैं’ अशी घोषणा देणारे स्वामी विवेकानंद, भारतीय राष्ट्रवादाची जाणीव देशाला ‘वंदे मातरम्’द्वारे करून देणारे बंकीमचंद्र चॅटर्जी, राष्ट्रवादाची भावना अधिक मजबूत करणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पवित्र भूमीमध्ये आज हिंदू समुदायाचे दमन केले जात असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. दुर्दैव म्हणजे, त्यामध्ये सत्ताप्रायोजित हिंसाचार वाढत असल्याविषयी त्यांनी कठोर शब्दात प्रहार केला.
 
 
“ ‘जय श्रीराम’ अशी घोषणा दिल्यास लाठीमार करणे, पोलीस कारवाई करणे, बंगाली संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या दुर्गापूजेवर निर्बंध लादणे, असे प्रकार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत घडत आहेत. विशिष्ट ‘शांतीप्रिय’ समुदायातील मते मिळविण्यासाठी सत्ताधारी पक्ष असे प्रकार करीत आहेत. त्यावर ‘जय श्रीराम’ अशी घोषणा दिल्यास लाठ्या चालविणारे सरकार उत्तर प्रदेशातही होते. मात्र, त्या सरकारची काय गत झाली हे देशाने पाहिले आहे. त्यामुळे बंगालमधील रामद्रोह्यांनी ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवावी,” असा इशाराही योगी यांनी दिला. “त्याचप्रमाणे भाजप कार्यकर्ते, भाजप समर्थक, त्यांचे कुटुंबीय यांच्यावर तृणमूल काँग्रेसतर्फे होणारे अत्याचार, खुनी हल्ले, हत्या हे वेळीच न थांबल्यास आता जनताच योग्य तो हिशेब करेल,” असे ते म्हणाले. राज्यात वाढलेल्या गुन्ह्यांच्या प्रश्नावरही त्यांनी ममता सरकारला धारेवर धरले. गुन्हेगारांशी कसे वागावे, याचा एक वस्तुपाठ उत्तर प्रदेश सरकारने योगींच्या नेतृत्वाखाली घालून दिला आहे. त्याचा संदर्भ देत योगींनी, “बंगालमध्ये २ मे नंतर अराजकता पसरविणारे गुन्हेगार आपल्या प्राणांची भीक मागत फिरतील,” असे महत्त्वाचे वक्तव्य मालद्यातल्या सभेमध्ये केले.
 
उत्तर प्रदेशात भाजप सरकार येण्यापूर्वी राज्याची जशी स्थिती होती, काहीशी तशीच स्थिती सध्या बंगालची झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था जवळपास नष्ट होणे, प्रचंड भ्रष्टाचार, विशिष्ट समुदायाचे लांगुलचालन, बहुसंख्य हिंदू समुदायाचा मानभंग करणे, असे प्रकार राज्यात घडत आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे हिंदुत्व, सुशासन आणि विकास कसा साध्य करता येतो, याचे उदाहरण बंगाली जनतेस दाखविण्यासाठी योगी बंगालमध्ये सक्रिय झाले आहेत. एकेकाळी संपूर्ण देशाचे नेतृत्व करणाऱ्या बंगालची सध्या प्रचंड पीछेहाट झाली आहे. त्यामुळे बंगालला पुन्हा तेच स्थान प्राप्त करून देण्यासाठी भाजप सज्ज आहे. उत्तर प्रदेश प्रमाणेच बंगालमध्येही ‘विकासाचे हिंदुत्ववादी मॉडेल’ साकारण्यासाठी योगी आदित्यनाथ बंगालमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. यामुळे देशव्यापी हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची प्रतिमादेखील अधिकाधिक मजबूत होत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@