मुंबईत हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद; पारा इतक्या अंशावर

    04-Mar-2021
Total Views |
temperature _1  



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
शहराच्या कमाल तापमानात वाढ होण्याचे सत्र गुरुवारी देखील सुरू राहिले. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) सांताक्रूझमधील स्वयंचलित हवामान केंद्राने गुरुवारी शहरातील कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले. हे तापमान यंदाच्या हंगामातील सर्वोच्च आणि सर्वसामान्य तापमानाच्या मर्यादेपेक्षा ५.२ अंशापेक्षा जास्त आहे.
 
 
 
येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांना वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरात बुधवारी ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर गुरुवारी त्यामध्ये वाढ झाली. गुरुवारी शहरात नोंदवलेल्या तापमानाने गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यात नोंदवलेल्या तापमानालाही मागे टाकले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक तापमान १७ मार्च रोजी ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. मुंबईत मार्चच्या सलग चौथ्या दिवसाचा पारा हा ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिला. ज्यामुळे शहरात उन्हाळ्याला सुरुवात झाल्याचे संकेत मिळाले आहेत. 'आयएमडी'च्या पुढील २४ तासांच्या अंदाजानुसार कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३९ आणि २० अंश सेल्सियस राहील.
 
 
 
'आयएमडी'च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात शुक्रवारपासून तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. मुंबईत अजूनही उष्माघाताला सुरुवात झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कमीतकमी दोन केंद्रांनी सलग दोन दिवस कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवल्यास उष्माघात जाहीर करण्यात येतो. मात्र, सांताक्रूझ वेधशाळेने शहरात ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली असली, तरी कुलाबा वेधशाळेने कमाल तापमान ३३.८ अंशे सेल्सिअस नोंदवले. २८ मार्च १९५६ रोजी शहरातील सर्वात जास्त कमाल तापमान ४१.७ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले होते. त्यानंतर २०११, २०१३, २०१४, २०१५ आणि २०१९ मध्ये किमान पाच वेळा कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले.