समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता; 'आपली जबाबदारी'!

    04-Mar-2021
Total Views |

mumbai beaches_1 &nb



मुंबईतल्या समुद्रकिनार्‍यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे आवाहन

मुंबई: मुंबईतल्या समुद्रकिनार्‍यांपैकी वांद्रे (पश्चिम) भागातील चिंबई आणि वारिंगपाडा तसेच मार्वे किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी ११ कोटी, २१ लाख, ५८ हजार रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात येणार आहे. मुंबईत गिरगाव, वरळी, दादर, माहीम, वांद्रे, खारदांडा, जुहू, मार्वे असे ‘बीच’ असून, ते त्या त्या परिसराची शान आहेत, तर सगळ्या मुंबईकरांची अत्यंत आवडीची पर्यटनाची ठिकाण आहेत. मात्र, समुद्रातून येणार्‍या कचर्‍यामुळे आणि पर्यटकांकडून टाकल्या जाणार्‍या कचर्‍यामुळे या ठिकाणांची शोभा कमी होत आहे. त्यामुळे त्यांची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक झालेलं आहे.
 
 
 
 
 
मार्वेला १९ किमींचा भला मोठा समुद्रकिनारा लाभला असून, गिरगाव चौपाटीचा समुद्रकिनारा हा मुंबईचा दुसरा प्रख्यात समुद्रकिनारा आहे. दादर चौपाटीचा ‘जॉगिंग’ आणि व्यायामाकरिता वापर केला जातो. जुहू बीचचा पर्यटनासाठी, तर त्याच्या पुढच्या वर्सोवा बीचचा मच्छीमारीकरिता जास्त उपयोग होतो. मुंबईमधील सर्वात नयनरम्य समुद्रकिनारा म्हणून मार्वे बीच ओळखला जातो. अतिशय शांत वातावरण असलेला हा समुद्रकिनारा १९ किमीपर्यंत पसरलेला आहे. मात्र, अशा समुद्रकिनार्‍यांना अस्वच्छतेचा डाग लागल्याने त्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च येत आहे.
 
 
 
 
 
वांद्रे (पश्चिम) विभागातील चिंबई आणि वारिंगपाडा समुद्रकिनार्‍यावर गाळ, माती, डेब्रिज असा कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होत असून, त्याच्या स्वच्छतेसाठी दोन वर्षांकरिता ०१ कोटी, ०५ लाख, ५२ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मढ-मार्वे समुद्रकिनार्‍याच्या स्वच्छतेसाठी सहा वर्षांकरिता १० कोटी, १६ लाख, ०६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. मढ-मार्वे समुद्रकिनार्‍याच्या स्वच्छतेसाठी सध्या ‘बीच क्लीनिंग’ आणि मनुष्यबळाचा वापर होत असून, प्रस्तावित कंत्राटात अत्याधुनिक पद्धत वापरण्यात येणार आहे. येथे २४ तास स्वच्छता करण्यात येणार असून, नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी कंत्राटदार नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. शिवाय, कचरा न टाकण्याबाबत त्याने जनजागृतीही करावयाची आहे. त्याच्या कामाचे मूल्यमापन करणारे आवश्यक गुण न मिळाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.