‘२३’च्या फेऱ्यात अडकले ‘३’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2021   
Total Views |

G 23_1  H x W:
 
 
 
काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत सुंदोपसुंदी उफाळून आली आहे. पक्षनेतृत्वाविषयी ज्येष्ठ नेते आता जाहीरपणे बोलू लागले आहेत. गुलामनबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारी आदींसह अन्य नेत्यांच्या ‘जी २३’च्या फेऱ्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा - गांधी हे पक्षनेतृत्वाचे त्रिकूट आता अडकले आहे.
 
सालाबादाप्रमाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रतिमानिर्मितीसाठी ‘काँग्रेसी इकोसिस्टीम’ सज्ज झाली आहे. ‘राहुल गांधी कसे पाण्यात पोहतात’, ‘राहुल गांधी कसे हातात हात गुंफून नृत्य करतात’, ‘राहुल गांधी कसे फाडफाड इंग्रजी बोलतात’, ‘राहुल गांधी किती गोड हसतात’, ‘राहुल गांधींची शरीरयष्टी कशी ‘सिक्स पॅक अॅब्ज’युक्त पीळदार आहे’, ‘राहुल गांधी कसे फीट आहेत’ वगैरे. आता या गोष्टींची देशवासीयांनाही सवय झाल्याने ते काही त्याला फारसे महत्त्व देत नाहीत. मात्र, राहुल गांधींची पीळदार शरीरयष्टी म्हणजेच काँग्रेसच्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत, असे मानणाऱ्या मूठभर लोकांचा वर्ग सध्या भलत्याच उत्साहात आहे. मात्र, या संधीसाधू मूठभरांच्या उत्साहाचा फुगा फोडण्याचे कामही काँग्रेसनेच हाती घेतले आहे. त्यामुळे गांधी कुटुंबापेक्षा गांधी कुटुंबांच्या भाट मंडळींचाच जीव कासाविस व्हायला लागला आहे. त्यामुळे एरवीही मजेशीर असलेला काँग्रेस पक्ष आता आणखीनच मनोरंजक होऊ लागलाय आणि पक्ष मनोरंजनाचे साधन बनू नये, यासाठी पक्षातीलच ज्येष्ठ नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. देशात दीर्घकाळपर्यंत सत्ताधारी असलेल्या पक्षाची अशी केविलवाणी स्थिती होणे देशातील अन्य सर्व राजकीय पक्षांसाठीही एक महत्त्वाचा धडा ठरत आहे.
 
 
राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदी असणारे गुलामनबी आझाद हे राज्यसभेतून नुकतेच निवृत्त झाले. त्यांना पुन्हा राज्यसभेत न पाठविण्याचा निर्णयही काँग्रेस पक्षाने घेतला. आता तो त्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांच्या निवृत्तीप्रसंगी सभागृहाच्या प्रथेप्रमाणे त्यांना निरोपही देण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निरोपाचे भाषण केले. तेव्हा गुलामनबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी आले. त्यानंतर गुलामनबी आझाद यांनीही सभागृहाबाहेर एका कार्यक्रमात, “पंतप्रधान झाल्यानंतरही नरेंद्र मोदी हे जमिनीशी नाळ जोडलेले नेता आहेत आणि स्वत:ला आजही ते अभिमानाने ‘चहावाला’ असे म्हणतात,” असे विधान केले. खरे तर यात वावगे असे काहीही नाही, राजकारणात एवढी सभ्यता असायलाच हवी. त्यातही पंतप्रधान आणि देशाच्या राजकारणातील एका अनुभवी नेत्याने परस्परांविषयी राजकीय मतभेद असतानाही केलेले वक्तव्य हे राजकारणात अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, त्यावरून जम्मू - काश्मीरमध्ये चक्क आझाद यांचा पुतळा काँग्रेस कार्यकर्त्यांनीच जाळला. आता काँग्रेसला आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या आझादांना अखेर त्याचे असे फळ मिळाले आहे. आता गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या आझादांविरोधात कार्यकर्ते अशी भूमिका घेत असतील आणि पक्षनेतृत्व त्यावर शांत बसत असेल, तर त्यास त्यांचा पाठिंबा आहे, अशा संशयाला वाव आहे. असो.
 
 
अर्थात, निष्ठावंत नेत्यांनी गांधी कुटुंबाविरोधात भूमिका मांडली की त्यांना टार्गेट करायचे, हा काँग्रेसचा जुना इतिहास आहे. इंदिरा गांधींच्या काळात ‘सिंडिकेट विरुद्ध इंडिकेट’ हा वाद उफाळून आला होता. त्यावेळी इंदिरा गांधी समर्थकांनी पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री या पंतप्रधानांसोबत काम केलेले ज्येष्ठ नेते निजलिंगप्पा यांना पक्ष मुख्यालयासमोरच धक्काबुक्की केली होती. आता जम्मूमध्ये आझाद यांनी ‘गांधी ग्लोबल फॅमिली’ या एका ‘एनजीओ’च्या माध्यमातून ‘शांती संमेलन’ आयोजित केले होते. या संमेलनात कपिल सिब्बल, आनंद शर्मा, राज बब्बर, मनीष तिवारी, भूपेंदरसिंह हुड्डा, विवेक तन्खा आदी नेते डोक्यावर भगवे फेटे बांधून उपस्थित होते. या नेत्यांना सध्या ‘जी २३’ असे संबोधले जाते. म्हणजे पक्षातील ज्येष्ठ अशा २३ नेत्यांचा हा गट असून पक्षाविषयी कळकळ असल्याने ते काही गोष्टी अगदी स्पष्टपणे बोलायला लागले आहेत. त्यामध्ये पक्षाला पूर्णवेळ आणि गांभीर्याने राजकारण करणारा अध्यक्ष मिळावा, पक्षांतर्गत निवडणुका म्हणजे अगदी तालुकास्तर ते राष्ट्रीयस्तर अशा निवडणुका तातडीने व्हाव्यात, या दोन प्रमुख मागण्या आहेत. पक्षाच्या एका बैठकीत या मागण्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर त्यांनी मांडल्या असता, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या डाफरल्याचे आणि त्यांना थेट भाजपचा एजंट ठरविल्याचीही घटना घडली होती. मात्र, पक्षाचा सुवर्णकाळ पाहिलेल्या या नेत्यांनी पक्षाचे अस्तित्व संपू नये, यासाठी आपली भूमिका सोडली नाही. त्यानंतर मग ‘या’ २३ नेत्यांनी तसे पत्रही सोनिया गांधी यांना लिहिले होते. आता त्यांची ही कृती अनेक कथित विचारवंतांना ‘गांधी कुटुंबाला दिलेले आव्हान’ वाटले. मात्र, जम्मूमधल्या सभेमध्ये कपिल सिब्बल यांनी अखेर, “मुख्य म्हणजे, आता खरे बोलण्याची वेळ आली आहे आणि आम्ही तेच करणार आहोत. सत्य हे आहे की, काँग्रेस पक्ष कमकुवत होत असल्याचे आम्ही पाहत आहोत आणि त्यास पुन्हा मजबूत करण्यासाठीच आम्ही एकत्र जमलो आहोत,” असे वक्तव्य केले. त्यांच्यानंतर आनंद शर्मा यांनीही गेल्या दहा वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याचे मान्य केले. “त्याच वेळी कोणी आपले मत व्यक्त केले आणि त्याचा वेगळाच अर्थ कोणी घेत असेल तर ते घर मजबूत राहत नाही,” असा टोला ही शर्मा यांनी लगाविला. आता त्यांचा हा टोला पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी होता, यात कोणतीही शंका नाही.
 
 
त्यानंतर आनंद शर्मा यांनी पक्षाने प. बंगालमध्ये ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ (आयएसएफ) या पक्षासोबत आघाडी करणे हे काँग्रेसच्या गांधीवादी आणि नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेच्या विचारांच्या विरोधी असल्याचे सांगितले. त्यापुढे जाऊन आघाडीच्या मुद्द्यावर पक्षाच्या कार्यसमितीमध्ये चर्चा न झाल्याविषयीही नाराजी व्यक्त केली. आता ही नाराजीदेखील कार्यसमितीविषयी नसून पक्षनेतृत्वाविरोधातच आहे. कारण कोणाशी आघाडी करायची याचा निर्णय सोनिया गांधी, राहुल गांधी यांची परवानगी असल्याशिवाय होणे शक्यच नाही. त्यावर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी संतापले आणि आनंद शर्मा हे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
 
आता ‘जी २३’ गटाची भूमिका पाहता अनेकांना असे वाटू शकेल की, काँग्रेस पक्षात उभी फूट पडेल किंवा हे नेते काँग्रेस सोडून नवा पर्याय उभा करतील. मात्र, ते शक्य होईल अशी परिस्थिती नाही. कारण, या ‘जी २३’ मधील बहुसंख्य नेते हे ‘दरबारी राजकारणी’ आहेत. जमिनीवर वावरणे, पक्षसंघटना नव्याने बांधणे, पक्षसंघटना सतत कार्यरत ठेवण्यासाठी कार्यक्रम देणे हे सर्व या नेत्यांना जमेल, अशी स्थिती नाही. आझाद, सिब्बल, शर्मा, हुड्डा आदी नेत्यांचा स्वभाव शरद पवार, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी यांच्याप्रमाणे काँग्रेस फोडण्याचा नाही. त्यामुळे तसे होण्याची शक्यता सध्या तरी धुसर आहे.
 
 
त्यामुळे आता वाईटपणा घेतलाच आहे तर संधी मिळेल तेथे पक्षनेतृत्वाविरोधात, त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीविषयी बोलण्याची भूमिका त्यांना स्वीकारली आहे आणि याचा काँग्रेसला निश्चितच फटका बसेल. कारण आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका असतानाही काँग्रेस आता अंतर्गत वादात पुन्हा गुरफटली आहे. एकीकडे राहुल गांधी तामिळनाडू, केरळमध्ये प्रचार करीत आहेत, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते काँग्रेसच्या चुका जाहीरपणे मांडत आहेत. याचा परिणाम नाही म्हटले तरी राज्याराज्यांतील काँग्रेस कमिट्यांवर होणार, तेथील काही नाराज घटकही स्पष्टपणे बोलायला लागणार आणि काँग्रेसची उरलीसुरली संघटनात्मक चौकटही मोठ्या प्रमाणावर कमकुवत होणार. त्यामुळे काँग्रेस पक्षाला याचा खरा फटका बसेल तो उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत. कारण तेथे प्रियांका वाड्रा यांना सक्रिय केले आहे. आता प्रियांकांचेही या ज्येष्ठांबद्दल काही बरे मत नाही. त्यामुळे ‘जी २३’ने आपले उपद्रवमूल्य अगदी व्यवस्थित ओळखले आहे. त्यामुळे आता ‘जी २३’च्या फेऱ्यात अडकलेले ‘३’ त्यातून कसे बाहेर पडणार, यावर काँग्रेसची पुढची वाटचाल ठरू शकते.
@@AUTHORINFO_V1@@