
मुंबई : मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जातोय आणि त्यावर आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे “दारोदारी लसीकरण“ करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटरमध्ये करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
वांद्रे-कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटर हे देशातील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असल्याचे ते म्हणाले. सध्या मुंबईत दर दिवशी 40 हजार जणांना लस देण्यात येत असून ही संख्या लवकरच एक लाखावर नेण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात यावी अशी महापालिकेने केंद्र सरकारला विनंती केल्याचेही ते म्हणाले.
मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता असल्याचे चहल म्हणाले. मुंबईतील खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिल्यास मुंबईत अतिरिक्त 13 हजार नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण अधिक संख्येने केल्यास निश्चितच लसीकरणाचा वेग वाढवणार असल्याचे ते म्हणाले. काही लोकांचे लसीकरण दारोदारी जाऊनही केले जाऊ शकते. तशी परवानगी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे ते म्हणाले.
मुंबईत 69 हजारांहून अधिक लक्षणे नसलेले रुग्ण
मुंबईत 10 फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. गेल्या 48 दिवसांमध्ये 85 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यांपैकी 69 हजार 500 रुग्णांना करोनाची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. 10 फेब्रुवारीला 3 हजार 500 खाटा भरल्या होत्या. त्यानंतर काल रात्री 9 हजार 900 इतक्या खाटा भरल्या गेल्या. खासगी रुग्णालयात 2 हजार 400 इतके बेड ठेवण्यात आले आहेत. ते वाढवून आता 4 हजार 900 इतके करण्यात येणार आहेत, असे चहल यांनी सांगितले.