मार्कंडेय (काटजू) पुराण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2021   
Total Views |

Markandey Katju_1 &n
 
 
 
 
अठरा पुराणातील 'मार्कंडेय पुराण' महत्त्वाचे पुराण मानले जाते. पुराणाची सुरुवात मार्कंडेय ऋषींना, जैमिनी ऋषींनी विचारलेल्या तीन प्रश्नांपासून सुरू होते. ते तीन प्रश्न महाभारतासंबंधी आहेत. मार्कंडेय ऋषींकडून त्यांना मिळणार्‍या उत्तरातून कथा आणि तत्त्वज्ञान यांचा प्रवास सुरू होतो. आपल्याला या लेखात मार्कंडेय पुराणाची कथा कोणती आहे आणि तत्त्वज्ञान कोणते आहे, याचा विचार करायचा नसून मार्कंडेय (काटजू) यांच्या पुराणाचा विचार करायचा आहे.
 
 
मार्कंडेय काटजू २० वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. त्यांचे आजोबा कैलासनाथ काटजू हे स्वातंत्र्यसेनानी होते. स्वातंत्र्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांचे काका इलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. याचा अर्थ असा झाला की, घराण्याचे मोठे वलय मार्कंडेय काटजू यांना जन्मतः मिळाले. तुमच्या-आमच्यासारखे ते सामान्य कुटुंबात जन्मलेले नाहीत. असे घराण्याचे वलय प्राप्त झाले की, शिक्षणही चांगले होते आणि घराण्याच्या नावामुळे उच्च पदे मिळत जातात. ते सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायमूर्ती झाले. नीरव मोदीला वाचविण्यासाठी लंडनच्या कोर्टात साक्ष देण्यासाठी ते गेले होते. नीरव मोदी १४ हजार कोटींचा बँक घोटाळा करून लंडनला पळाला. भारत सरकारने, ब्रिटिश सरकारकडे त्याला भारताच्या हवाली करण्याची मागणी केली. ब्रिटिश कायद्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय शरणागताला त्याच्या देशात पाठविले जात नाही. नीरव मोदीची केस 'वेस्टमिनस्टिर मॅजेस्ट्रेट कोर्टा'त चालली. नीरव मोदीच्या बचावासाठी मार्कंडेय काटजू लंडनला गेले. त्यांनी कोर्टातील दिलेल्या साक्षीतील मुख्य मुद्दे असे-
 
 
> भारतातील ५० टक्के न्यायमूर्ती भ्रष्ट आहेत.
 
> सर्वोच्च न्यायालय भारत सरकारचे नोकर झाले असून, ती कणा नसलेली आणि लांगुलचालन करणारी संस्था झाली आहे.
 
> भारतातील माध्यमे नकारात्मक बातम्या देतात.
 
> भारत सरकारच्या धोरणांमुळे कुणालाही न्याय मिळत नाही. आपले दोष झाकण्यासाठी शासन अनेक जणांना कोर्टात अडकविते.
 
> भारत आर्थिक दुरवस्थेत गेलेला देश आहे. भारतीय जनता पक्षाला आर्थिक प्रश्न कसे सोडवायचे, हे समजत नाही. त्यांनी नीरव मोदीला बळीचा बकरा केलेले आहे.
 
 
'वेस्टमिनिस्टर मॅजेस्ट्रट कोर्टा'चे न्यायमूर्ती सॅम गुझी म्हणाले की, “मार्कंडेय काटजू यांची साक्ष विश्वासार्ह नाही. ते स्वतःची व्यक्तिगत सूची राबवीत आहेत.” न्यायमूर्ती पुढे म्हणतात, “न्यायमूर्ती काटजूंच्या (तज्ज्ञ?) मताला मी फारशी किंमत देत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिलेल्या काटजूची साक्ष माझ्या मते वस्तुनिष्ठही नाही आणि विश्वासार्हदेखील नाही. ज्येष्ठ सहकारी न्यायमूर्तींच्या असंतोेषाचे दर्शन त्यांच्या साक्षीत होते. साक्ष देण्यापूर्वी मीडियाशी केलेला संवाद अनेक प्रश्न निर्माण करतो.” 
 
मार्कंडेय काटजू यांनी भारत सरकारची तुलना हिटलरशी केली. नीरव मोदीला ज्यू ठरविले. त्यांचे वाक्य असे, “भारताच्या सर्व प्रश्नांचे खापर ज्यू नीरव मोदी यांच्या डोक्यावर फोडण्यात येते. नीरव मोदींना भारतात निःपक्षपाती वागणूक मिळणार नाही.” निवृत्त मुख्य न्यायमूर्ती राज्यसभेतील जागा मिळवितात, असे काटजू म्हणाले. हा भ्रष्टाचार आहे, असे त्यांना म्हणायचे आहे. पण, सोयीस्करपणे विसरतात की, ते स्वतः निवृत्त झाल्यानंतर, 'प्रेस कौन्सिल'च्या अध्यक्षपदाची खुर्ची त्यांनी उबविली होती. त्यांची नियुक्ती सरकारनेच केली होती.
 
मार्कंडेय काटजू पुराणाचा हा एक अध्याय झाला. या अध्यायाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. विदेशात जाऊन आपल्या सर्वोच्च न्यायालयाची बदनामी त्यांनी केली. विदेशात जाऊन त्यांनी आपल्या शासनाचीही बदनामी केली. अशी बदनामी कोणताही देशभक्त करणार नाही. कोणत्याही देशाचा उच्चपदस्थ नागरिक विदेशात आपल्या देशाविषयी चांगलेच बोलतो. त्याच्या देशातील प्रश्नांसंबंधी त्याला विचारले असता, तो म्हणतो की, हे आमचे अंतर्गत प्रश्न आहेत. दुसर्‍या देशात त्याची चर्चा करण्याचे काही कारण नाही. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी चर्चिल अमेरिकेला गेले असता, त्यांच्या देशासंबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. चर्चिल तेव्हा विरोधी पक्षनेते होते. चर्चिल म्हणाले की, “हीज मॅजेस्टीज सरकारचा विरोधी पक्षनेता आहे. हीज मॅजेस्टीज सरकारची बदनामी करण्यासाठी इथे आलेलो नाही.” मार्कंडेय काटजू चर्चिलपेक्षाही मोठे असावे बहुधा. कारण ते 'मार्कंडेय' आहेत.
 
सेवानिवृत्त झाल्यापासून आणि नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून मार्कंडेय काटजू सातत्याने काहीना काही लिहित असतात आणि आपले वेगळे मत मांडीत असतात. अयोध्येचा निकाल आला आणि त्यावर आपले वेगळे मत त्यांनी नोंदविले. ते म्हणतात, “सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्या निकाल भारताच्या विधी इतिहासात 1975च्या 'ए. डी. एम. जबलपूर विरुद्ध शिवकांत शुक्ला' या केसशी बरोबरी करणारा असेल. फरक एवढाच की, 'ए. डी. एम. जबलपूर खटल्या'त वेगळे मत मांडण्याचे धाडस एका न्यायमूर्तीने केले. थोडक्यात, कोर्टाने 'बळी तो कान पिळी' हे तत्त्व मान्य केले आहे.” घटनेचे ३७० कलम रद्द झाले आणि अब्दुल्ला पिता-पुत्रांना 'पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्ट'खाली कैद झाली. मार्कंडेय काटजू म्हणतात, “फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांची अटक म्हणजे, संविधानाच्या कलम २१ वर केलेले आक्रमणच आहे. स्वातंत्र्याच्या अधिकारावर हा घाला आहे. ओमर अब्दुल्लांवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.”
 
योगी आदित्यनाथ शासनाविषयी काटजू म्हणतात, “उत्तर प्रदेशमध्ये जे काही चालू आहे, त्याने माझे डोके सुन्न आहे. उत्तर प्रदेश उलटा प्रदेश झालेला आहे. २० वर्षे मी वकिली केली आणि २० वर्षे मी न्यायधीश राहिलो. कायद्याच्या मूलभूत गोष्टी मी उत्तम जाणतो, असे मला वाटले. परंतु, मी आता कायद्याची नवीन परिभाषा जी 'Lewis Carroll's Alice in Wonderland' या पुस्तकात सापडते.” मार्कंडेय काटजू यांनी ही परिभाषा कोणती, याचा पुस्तकातील एक संवाद दिला. तो असा- 'क्वीन ऑफ हार्ट्स' (अंतकिरणाची राणी) कैद्यांवर डाफरते. “यांची डोकी छाटून टाका,” असे म्हणते. एक जण धाडस करून विचारतो, “यांच्यावरील खटल्याचे काय करायचे?” राणी म्हणते, “खटले नंतर प्रथम त्यांची डोकी कापा!” मार्कंडेय काटजू म्हणतात की, “उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांची वाटचाल या दिशेने चालू आहे. 'सीएए' कायद्याविरुद्ध आंदोलन करणार्‍यांना ज्या प्रकारे शासित केले जात आहे, त्यावरून हीच गोष्ट लक्षात येते.”
 
आणखी एका लेखात मार्कंडेय काटजू काश्मीरमधील मुसलमानांसंबंधी भरपूर अश्रुपात करताना दिसतात. '३७० कलम' रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील मोबाईल आणि इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली होती. याचे आतोनात दुःख काटजू यांना झाले. त्यांनी त्याची तुलना काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाशी केली आणि या अन्यायाचा सूड म्हणून काश्मिरातील मुसलमानांना ही शिक्षा केली आहे, असे मत त्यांनी नोंदविले. या लेखात त्यांनी या बंदीचा निषेध म्हणून काय करायला पाहिजे, हे आपल्या लेखात सांगितले. डाव्या हाताला काळी पट्टी बांधावी, राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर बहिष्कार घालावा. कुठल्याही पर्यटकाचे स्वागत करू नका आणि '३७० कलम' रद्द करणे, ही आर्थिक प्रश्नावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याची चलाखी आहे, अशा प्रकारची पत्रके काढून वाटा.
 
 
मार्कंडेय काटजू पुराण हे असे खूप विस्तृत आहे. त्याचे आख्यान जेवढे सांगावे, तेवढे कमीच आहे. लंडनच्या न्यायालयाने मार्कंडेय काटजू यांच्या कानाखाली अशी खेचली आहे की, एखादा स्वाभिमानी न्यायमूर्ती असा अपमान सहन करण्यापेक्षा जगणे नको, असे म्हणेल. परंतु, मार्कंडेय काटजू यांच्याकडून मार्कंडेय काटजू पुराणाचे आणखी अध्याय नियतीला लिहून घ्यायचे असतील. आम्हालासुद्धा ते अध्याय वाचण्याची उत्सुकता राहणारच. निंदकाचे घर शेजारी असल्याशिवाय आपला मार्ग, आपली कृती, आपले विचार, योग्य की अयोग्य, समजत नाहीत. म्हणून मार्कंडेय काटजूजी, तुम्ही लिहित राहा, बोलत राहा, लेखणीला पूर्णविराम देऊ नका आणि वाणीदेखील बंद करू नका. तो जसा तुमचा मूलभूत अधिकार आहे, तसा मूलभूत अधिकार नरेंद्र मोदींनादेखील त्यांच्या वाटेने चालण्याचा आहे, एवढे तुम्ही लक्षात ठेवले तरी पुरे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@