माझा आनंद, माझी जबाबदारी!

    29-Mar-2021
Total Views | 199

happiness_1  H



आनंद आपल्याजवळच आहे, आपल्यातच आहे, याची जाणीव जादूई आहे. त्यामुळे आपली आनंद घेण्याची क्षमता वाढते आणि आपल्या वातावरणात असणार्‍या आनंदाची मग तो निसर्ग असेल, माणसं असतील, कलात्मकता असेल, आपण यातून सहज आनंद मिळवतो.


आनंदाची परिभाषा समजून घेताना आपण त्या व्यक्तीचे वैयक्तिक व्यक्तिमत्त्व, याशिवाय समाजात आनंदाला कसं आळखतात, या गोष्टी समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं ठरतं. आपण स्वतःला कधी कधी इतकं ताणतो की, आपलं आपल्यालाच कळत नाही की, आपण बळीचा बकरा केव्हा आणि कसा बनलो ते. आपल्या आयुष्यात आनंद मिळवायचा असेल, तर अशा पद्धतीने आपण बळीचा बकरा बनणे उपयोगी नाही. त्यासाठी आपण स्वतःला सीमित तर केले पाहिजेच, शिवाय दुसर्‍यावरसुद्धा मर्यादा घातल्या पाहिजेत. यामुळे दोन माणसांतील नात्याला एक नैसर्गिक स्वायत्तता येते; भले ते नाते वैयक्तिक असो वा व्यावसायिक असो. एखाद्याला वा जवळच्या व्यक्तीला ‘नाही’ म्हणताना आपल्याला आपण स्वयंकेंद्रित आहोत, असं कधी कधी वाटतं.
तथापि, निकोप मर्यादा जर आपण स्वतःवर आणि दुसर्‍यावर घातल्या की, त्या व्यक्तीला आपण काय अपेक्षा ठेवतो आहोत, हे कळायला लागतं. बरीच नाती एकमेकांना गृहीत धरल्याने गोत्यात येतात. पण, नात्यात आनंद नांदवायचा असेल, तर आपल्या मर्यादांचे अवडंबर न माजवता, त्या एकमेकांना समजतील हे पाहायला पाहिजे. आपल्याला स्वतःला निर्णय तर घ्यायला हवेत. पण, एखाद्या नात्याचा सन्मानसुद्धा आपल्याला सांभाळता आला पाहिजे.प्रत्येक माणूस सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा अनुभव घेत असतो. आनंद हा सर्वसामान्यपणे सकारात्मक भावनांतून निर्माण होतो. पण, या भावनांना त्याच्याशी निगडित प्रसंगांना आपल्याला ओळखता आले पाहिजे. प्रत्येकाची आनंदाची अनुभूती वेगवेगळी असते. तरीही त्यात काही महत्त्वाच्या खुणा वा संकेत असतात, त्या आपल्याला आपण खरंच आनंदी आहोत का नाहीत, हे दर्शवून देतात.
१) आपल्या जगण्याच्या अटी पोषक आहेत.
२) आपल्याला जे आयुष्य जगायचं आहे, ते आपण जगत आहोत.
३) आपल्या जीवनाबद्दल आपण समाधानी आहोत.
४) आपल्या जगण्याबद्दल आपल्याला नेहमी सकारात्मक वाटतं.
५) आपल्याला आयुष्यात जे काही तडीस न्यायचं आहे, ते आपण नेतो आहोत.
६) आपण आणि आपली आनंदाची अनुभूती यात जराही शंका उरत नाही म्हणजे आनंदी माणसाला आपण खरेच आनंदी आहोत का, हा प्रश्न पडत नाही. कारण, आनंद हा अंतरंगी वसलेला असतो. आपण जेव्हा आनंदाच्या शोधात असतो, तेव्हा काही मूलभूत गोष्टी आपल्याला पाळायला लागतात.पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या आनंदाचा प्रत्यय आपल्याला स्वत:ला समजला पाहिजे. गांभीर्याने विचार करायला पाहिजे की, तुम्ही तुमच्या आनंदासह खरंच जगताय का? आनंद जर तुम्ही बाह्यजगात शोधत असाल, तर तुमचा ‘रेसचा घोडा’ बनतो. तुम्ही स्पर्धेच्या मायाजालात हरवता. पण, जर तुम्हाला तुमचा आनंद तुमच्या अंतरंगात जाणवतो आणि सदैव जाणवतो, तेव्हा तो तुम्हाला सक्षम करतो. त्यासाठी बाह्य स्पर्धेत उतरायची विकृत इच्छा तुमच्या मनात येत नाही. तुमच्या प्रत्येक साध्या किंवा गुंतागुंतीच्या निर्णयात तुमच्या आनंदाची प्रेरणा तुम्हाला साथ देत असते.

आपल्या आनंदाला आपण अटीविना स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. आनंद आपल्याजवळच आहे, आपल्यातच आहे, याची जाणीव जादूई आहे. त्यामुळे आपली आनंद घेण्याची क्षमता वाढते आणि आपल्या वातावरणात असणार्‍या आनंदाची मग तो निसर्ग असेल, माणसं असतील, कलात्मकता असेल, आपण यातून सहज आनंद मिळवतो. काही लोक आपल्यापेक्षा अधिक आनंद उपभोगतात, याचं कारण त्यांना त्यांच्यातील आनंदाचा चांगलाच परिचय आहे. काही लोक सुखाच्या वा आनंदाच्या मागे वेड्यासारखे लागतात आणि त्यांची भ्रमंती संपत नाही. काही प्रगल्भ माणसं आपला आनंद निवडतात. आजचा दिवस खरंच छान जाईल, माझं आयुष्य किती सुखाचं जाईल, याचं सहज विश्व त्यांनी निर्माण केलेलं असतं. आपल्या निर्णयावर ही मंडळी खूश असतात. ही मंडळी खर्‍या अर्थाने वेगळी असतात. नेहमीच्या साचेबद्ध, रचनाबद्ध पथावर चालण्यापेक्षा आपल्याला आवडणारा मार्ग ही मंडळी निवडतात आणि मार्ग खडतर असला तरी ही मंडळी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. कारण, त्यांनी आनंदाचा गुलाम न बनता, तो स्वत:च्या आवडीने स्वीकारला आहे. आयुष्यात आपल्या आनंदाला आपण जन्म द्यायचा आणि त्याचं पालनपोषणही करायचं. आपण स्वत:ला एखाद्या राजकुमार किंवा राजकुमारीसारखं वागवायचं ठरवलं, तर स्वत:च संगोपनसुद्धा प्रेमानेच केलं पाहिजे नाही का?


-डॉ. शुभांगी पारकर 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121