पुरीचा गोरक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2021   
Total Views |

govind patnaik_1 &nb



‘गोसेवा ही साक्षात ईश्वरसेवा’ हे वचन ओडिशातील पुरीचे निवृत्त पोलीस अधिकारी गोविंदप्रसाद पटनाईक यांनी स्वतंत्र हॉस्पिटल व गोसेवा आश्रमाच्या उभारणीतून वास्तवात आणले. त्यांच्याविषयी...



यया सर्वमिदं व्याप्तं जगत् स्थावरजङ्गमम्।
तां धेनुं शिरसा वन्दे
भूतभव्यस्य मातरम्॥
अर्थात, जिने या समस्त चराचर जगाला व्यापले आहे, ती भूत आणि भविष्याची जननी असलेल्या गोमातेला मी माझे मस्तक झुकवून नमस्कार करतो. असे हे भारतीय संस्कृतीत गोमातेचे महात्म्य. अगदी वैदिककाळापासून ते आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगातही गाईंवरील विविध संशोधनातून गोसेवेची उपयोगिता अधोरेखित होते. परंतु, दुर्दैवाने गोपूजक भारतीय संस्कृतीतच गाईंकडे बघण्याचा दृष्टिकोन मातेसमान असला, तरी आपल्या आईसारखी मात्र त्यांची काळजी घेतली जात नाही, हेही तितकेच खरे. परिणामी, आज कित्येक गाई उकिरड्यावरील कचर्‍यात अन्नाचे दोन कण शोधता शोधता प्लास्टिकरूपी जीवघेणा कचरा गिळंकृत करतात आणि तो शरीराबाहेर पडला नाही, तर तो या गाईंच्या जीवावरच उठतो. तसेच रहदारीच्या रस्त्यांवरून वावरताना अपघातांमुळे या गाई जखमी-जायबंदी होतात, नाही तर जबरदस्तीने कत्तलखान्यात त्यांचा बळी तरी दिला जातो. कित्येक राज्यांत गोहत्याबंदीचा कायदा करूनही अद्याप गोमांस तस्करीच्या घटना अधूनमधून उघडकीस येत असतात. त्यामुळे आज गोमातेचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही केवळ शेतकर्‍यांची, धार्मिक मठांची नसून ती आपणा सर्वांची आहे. त्यासाठी प्रत्येकाने गोशाळाच उभारावी असे अजिबात नाही, तर आपापल्या परीने गोसंवर्धन करणार्‍या अनेक संस्था, व्यक्तींनाही आपण याकामी साहाय्य निश्चितच करू शकतो. गाईंच्या दुर्दशेने अशाच एका ओडिशातील सद्गृहस्थाचे मन पिळवटून टाकले आणि त्यांनी आपले निवृत्तीपश्चातचे संपूर्ण जीवन गोसेवेसाठी समर्पित केले.


ओडिशामधील पुरीचे निवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या गोविंदप्रसाद पटनाईक यांना गोमातेची व्यथा सहन झाली नाही. पुरीसारख्या पवित्र धर्मक्षेत्रातील गाईंची बिकट अवस्था पाहून त्यांचे मन अधिक हेलावले आणि यासाठी आपणच पुढाकार घेऊन काही तरी ठोस पावले उचलावीत, ही भावना त्यांच्या मनात दृढ झाली. मग काय, निवृत्त असले तरी पैशाची कशीबशी जुळवाजुळव करून त्यांनी प्रारंभी गाईंवरील वैद्यकीय उपचारांसाठी एक रुग्णालय आणि नंतर एक प्रशस्त आश्रमही सुरू केला. २०१३ साली पोलीससेवेतून पटनाईकांनी निवृत्ती पत्करली. पण, इतर निवृत्त मंडळींसारखा आपला वेळ कुटुंबीयांसमेवत, मित्रांबरोबर किंवा आपल्या आवडीनिवडींना समर्पित न करता, पटनाईक यांनी वेगळीच वाट निवडली. त्यांनी अपघातग्रस्त, बेवारस गाईंवर वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालय उभारणीचे ध्येय निश्चित केले. त्यासाठी आपल्या बचतीबरोबरच त्यांना त्यांच्या मित्रांचीही या पवित्र कार्यासाठी साथ लाभली. त्याचबरोबर गोवर्धन पीठाचे स्वामी निश्चलानंद सरस्वती आणि ‘प्रजनन मिशन’चे परमहंस प्रजानंद यांचेही मोलाचे साहाय्य पटनाईक यांना लाभले. अखेरीस अथक मेहनतीनंतर पाच वर्षांनी पटनाईक यांचे ‘श्री जगन्नाथ गो सेवा संस्थान’ हे पशुवैद्यकीय रुग्णालय उभे राहिले. या रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे, या रुग्णालयात शस्त्रक्रिया केंद्र, ‘आयसीयु’देखील असून, एकावेळी १८ जनावरांवर उपचार करणे सहज शक्य आहे. आता जनावरांचे रुग्णालय म्हटले की, पशुवैद्यकही आले आणि त्यांचे पगारही. परंतु, पटनाईक यांच्या या रुग्णालयात सरकारी तसेच खासगी रुग्णालयातील पशुवैद्यक गुराढोरांचे अगदी मोफत उपचार करतात.


पुरीमध्ये अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या या पशुवैद्यकीय रुग्णालयातून उपचारानंतर गाईंना पुन्हा सोडावे लागत होते. कारण, रुग्णालयाची जागा तशी मर्यादित होती. म्हणूनच पटनाईक यांनी कायमस्वरूपी गोशाळा सुरू करण्याचे आपले पुढील लक्ष्य निर्धारित केले आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. पटनाईक यांनी यासाठी त्यांच्या मित्राच्या बंद असलेल्या ‘अ‍ॅग्रो-इंडस्ट्री’च्या पाच एकर जागेची त्यासाठी विचारणा केली. त्यांच्या मित्रानेही पटनाईक यांनी गोशाळा उभारण्याची परवानगीही दिली आणि पटनाईक कामाला लागले. परंतु, २०१९च्या ‘फनी’ चक्रीवादळामुळे या गोशाळेचे मोठे नुकसान झाले. परंतु, पटनाईक यांनी अजिबात माघार न घेता, आपल्या खिशातून नऊ लाख रुपये उभे करून ही गोशाळा पुन्हा नव्या दमाने सुरू केली. आज या गोशाळेत ७४ गाई असून, यामध्ये २६ बैलांचाही समावेश आहे. त्यामुळे उपचारांनंतर आता गाईंना पुन्हा मोकाट न सोडता, त्यांना या गोआश्रमात आणले जाते. त्याचबरोबर त्यांच्या पोषण आहाराकडेही पटनाईक अगदी बारकाईने लक्ष देतात. आगामी काळात आश्रमातच या जनावरांना ताजा चारा उपलब्ध व्हावा म्हणून गवताची लागवड करण्याचा पटनाईक यांचा मानस आहे.
एकूणच या गोआश्रमाचे व्यवस्थापन करणे हे नक्कीच सोपे काम नाही.


जनावरांची पुरेपूर काळजीही घ्यावी लागते. अगदी त्यांच्या चार्‍यापासून ते औषधांपर्यंत. परंतु, पटनाईक याबाबतीत कुठलीही कसूर न करता, गोसेवा अगदी नित्यनेमाने करतात. आपल्या पेन्शनमधूनच आश्रमासाठी चार पैसे खर्च करतात. पण, याकामी त्यांच्या मुलीचाही पटनाईक यांना पूर्ण पाठिंबा असून, जागेचे भाडे आणि इतर काही खर्चांची जबाबदारी मुलीनेही स्वखुशीने स्वीकारली आहे, हे विशेष. ६६ वर्षीय गोविंदप्रसाद पटनाईक आपल्या या गोआश्रमाला दैनंदिन भेटही देतात. आश्रमातील या गाईंशी त्यांची अगदी घनिष्ठ मैत्रीही झाली असून, प्रत्येक गाईला त्यांनी गोंडस नावही दिले आहे. तेव्हा, पुरीच्या या गोरक्षकाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असाच. केवळ ‘गोरक्षणाची गरज आहे’चा नुसता गजर न करता, आपल्याला जसे शक्य असेल, तशी आपल्या परीने थोडीथोडकी का होईना गोसेवा जरूर करावी, हीच अपेक्षा.
@@AUTHORINFO_V1@@