प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड व जन्मठेपेची शिक्षा ; निकिताची आई मात्र नाराज
नवी दिल्ली: हरियाणाच्या फरीदाबादमधील निकिता तोमर खून प्रकरणात फरीदाबादच्या फास्टट्रॅक कोर्टाने तौसिफ आणि रेहान या दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तौसिफ, रेहान यांना कोर्टाने दोषी ठरवले होते. दोन्ही दोषींच्या शिक्षेबद्दल आज शुक्रवार दि. २६ मार्च रोजी न्यायालयात चर्चा झाली, त्यानंतर आता ही शिक्षा जाहीर झाली. तौसिफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या निर्णयानंतर निकिताच्या आईने असे सांगितले आहे की, "कोर्टाच्या निर्णयामुळे आम्ही समाधानी नाही."
शुक्रवारी सकाळी तौसिफ, रेहानला फरीदाबादच्या कोर्टात हजर करण्यात आले. ज्यानंतर शिक्षेवरील वाद पूर्ण झाला. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता फरीदाबाद कोर्टाने ही शिक्षा जाहीर केली. चर्चेदरम्यान, फिर्यादींनी फाशीच्या शिक्षेची मागणी केली आणि या प्रकरणाला गंभीर प्रकारात घेण्याचे आवाहन केले. तथापि, बचाव म्हणाला की, दोषी हा वैद्यकीय विद्यार्थी आहे आणि त्याच्याकडे पूर्वीचे गुन्हेगारी नोंद नाही. अशा परिस्थितीत हे लक्षात ठेवून शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणात तौसिफ, रेहानशिवाय अजरुद्दीन नावाच्या व्यक्तीवरही आरोपी होता. परंतु, त्याच्यावर हा आरोप सिद्ध झाला नाही. या कारणास्तव न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
काय आहे प्रकरण?
२६ ऑक्टोबरला निकीता परीक्षेनंतर आपल्या घरी जात होती. यावेळी तौसिफ आणि त्याचा मित्र एका गाडीमधून तिथे आले. यावेळी त्यांनी तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध दर्शवत झटापट केल्यानंतर तौसिफने तिला गोळी मारली, आणि तिथून पळून गेला. यातच तिचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार 'सीसीटीव्ही'मध्ये कैद झाला होता, ज्यावरुन आरोपींची ओळख पटली आणि पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी या दोघांना अटक केली होती. हे प्रकरण देशभरात गाजले होते. यानंतर हरियाणाच्या विधानसभेत 'लव्ह जिहाद कायदा' लागू करण्यावरुन बराच गदारोळही झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी ७०० पानांची 'चार्जशीट' दाखल केली होती.