मृगजळछाप ‘राष्ट्रीय नेतृत्व’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2021   
Total Views |

Sharad Pawar _1 &nbs
 
 
 
 
 
पवारांचे नेतृत्व खरे तर मृगजळ आहे आणि ते मृगजळही केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहे. कारण, पवारांप्रमाणेच काँग्रेस सोडलेल्या ममता बॅनर्जी असो किंवा आताचे जगनमोहन रेड्डी असो, यांनी काँग्रेसला पराभूत केले, तर पवार अजूनही काँग्रेसच्या जीवावर आपल्या पक्षाला सत्तेत ठेवण्यात धन्यता मानत आलेले आहेत. त्यामुळे पवारांच्या स्तुतीपाठकांकडून होणार्‍या त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा गजर हा कायमच फोल ठरत आलेला आहे.
 
 
 
‘व्हीसी’ म्हणजे ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ आणि ‘पीसी’ म्हणजे ‘प्रेस कॉन्फरन्स’ -पत्रकार परिषद. आता ‘व्हीसी’ ही फक्त ऑनलाईन पद्धतीने घेता येते, तर ‘पीसी’ ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने घेता येते. त्यामध्ये फरक आहे आणि तो लक्षात येण्याजोगा फरक आहे. मात्र, तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देश आणि राज्याच्या राजकारणात तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ सक्रिय असलेले शरद पवार हे चार दिवसांपूर्वी ‘व्हीसी’ आणि ‘पीसी’ असा शाब्दिक खेळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर करीत होते. निमित्त होते ते राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीखोरीचे लागलेले आरोप.
 
 
 
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या या आरोपांमुळे शरद पवारांना दिल्लीत 24 तासांमध्ये दोन वेळा पत्रकार परिषदा घ्यावा लागल्या. त्यातही त्या पत्रकार परिषदा न वाटता, ‘मी सांगतोय ते ऐकून घ्या,’ अशी अजिजीची विनंती असल्याचेच भासत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एरवी पत्रकारांना बातम्या देणार्‍या शरद पवारांचा ‘कॉन्फिडन्स’ प्रथमच कमी झाल्याचे लक्षात आले. पत्रकार परिषदेत त्यांच्या चेहर्‍यावर चिडचीड आणि हतबलता ही अगदीच स्पष्टपणे दिसत होती.
 
 
विशेष म्हणजे, शरद पवारांनी काहीतरी दावा करावा, त्यातला फोलपणा दिल्लीतल्या हिंदी-इंग्रजी माध्यमांनी तिथेच तो खोडून काढणे, त्यावर पवारांनी प्रथम गांगरणे, मग चिडणे आणि रागात ‘इनफ इज इनफ’ असे म्हणणे, हा प्रकार एकूणच ‘अनुभवी राष्ट्रीय नेता’ असं बिरूद मिरविणार्‍या पवारांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला. आणि हे प्रश्नचिन्ह केवळ पवारांच्या कथित राष्ट्रीय नेतृत्वाविषयीच नव्हे, तर त्यांची तशी प्रतिमा निर्माण करणार्‍या महाराष्ट्रातील त्यांच्या भाटांच्या कार्यपद्धतीवरही निर्माण झाले आहे.
 
 
सध्या महाराष्ट्रात खंडणीखोरीचे प्रकरण गाजते आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्रीच पोलिसांना दरमहा १०० कोटींची खंडणी मागायला सांगतात, असा गंभीर आरोप केला आहे. ते फक्त आरोप करूनच थांबले नाहीत, तर त्या आरोपांची ‘सीबीआय’ चौकशी व्हावी, अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण गंभीर असल्याचे सांगून त्यांना उच्च न्यायालयात जायला सांगितले आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनाही त्यात प्रतिवादी करून घ्या, असे सांगितले. या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली ती उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सचिन वाझे या शिवसेनेचा माजी प्रवक्ता आणि साहाय्यक पोलीस निरीक्षकाने ठेवलेल्या स्फोटकांच्या प्रकरणावरून.
 
 
 
पुढे मग मनसुख हिरन या व्यावसायिकाची हत्या झाली, त्याचा मृतदेह सापडला आणि तेव्हापासून या प्रकरणाची कार्यकक्षा वाढण्यास सुरुवात झाली. केंद्राने मग राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे प्रकरणाची सूत्रे सोपविली. त्यानंतर मग प्रथम सत्ताधारी पक्ष शिवसेना लक्ष्य होण्यास प्रारंभ झाला, तोपर्यंत शरद पवार अगदी शांत होते. कारण, प्रकरणामध्ये शिवसेनेची होणारी गोची पवारांना पुरेपूर अनुभवायची होती. त्यामुळे मग त्यांनी महाराष्ट्रात माध्यमांशी बोलताना ‘हे स्थानिक प्रकरण असून मी यावर काहीही बोलणार नाही,’ असे वक्तव्य केले. त्यानंतर पवारांच्या महाराष्ट्रातील माध्यम ‘इकोसिस्टीम’ने त्या वक्तव्याची भलामण करण्यास सुरुवात केली.
 
 
पुढे मग परमवीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा अडचणीत आली आणि मग स्थानिक प्रकरणावर पवारांनी थेट दिल्लीत दरबार भरविला. त्यानंतर जसजसे प्रकरण वाढू लागले, तसे पवारांनी दिल्लीत दरबार भरवून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बोलविण्याचा सपाटा लावला. मग दिल्लीत हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसमोर पत्रकार परिषदा झाल्या आणि त्यामध्ये पवार पूर्णपणे गडबडले असल्याचे सिद्ध झाले. महाराष्ट्रात पत्रकारांना ज्याप्रकारे पवार सहज गुंडाळतात, तसे दिल्लीत शक्य नाही हे स्पष्ट झाले. दुसरीकडे महाराष्ट्रात पवारनिष्ठ असलेल्या माध्यमांमधील एका वर्गाने ‘ब्लॉग’ आणि ‘ट्विट्स’ करायचा सपाटा लावला.
 
 
त्यामध्ये पवारांना अडचणीतून काढणे, त्यांच्या नेतृत्वाच्या पुढे आलेल्या उणिवा भरून काढण्यास सुरुवात केली. कारण, महाराष्ट्रात  २०१९  साली भाजपला धोबीपछाड देऊन महाविकास आघाडीचे पालकत्व स्वीकारलेल्या पवारांना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी पछाडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला वाचविण्याठी स्वत: पवारांनाच सूत्रे हाती घ्यावी लागली आहेत आणि म्हणूनच पवारांचे कथित राष्ट्रीय नेतृत्वाचे मृगजळ कायम राहावे, यासाठी त्यांची ‘इकोसिस्टीम’ कामाला लागली आहे.
 
 
आता पवार हे राष्ट्रीय नेते आहेत की नाहीत, याबद्दल मराठी माध्यमांमधील एका वर्गाने डझनभर ‘पीएच.डी’ होतील एवढा मजकूर खर्ची घातला आहेच. मात्र, खरोखरच शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत की उपप्रादेशिक नेते आहेत, हे बघणे महत्त्वाचे ठरते. पवारांनी ज्यावेळी सोनिया गांधींच्या परदेशी वंशाचा मुद्दा काढून काँग्रेस फोडली आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला, तेव्हा काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्ते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी पवारांच्या एकूणच वकुबाविषयी चपखल भाष्य केले होते. ते म्हणाले की, “पवारांची खरी ताकद म्हणजे त्यांचे उपद्रवमूल्य (न्यूसन्स व्हॅल्यू) आहे. त्यामुळे पवार काँग्रेसचे उमेदवार नक्कीच पाडू शकतात.
 
 
 
पण, स्वत: ते उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून आणायची त्यांची क्षमता नाही. त्यामुळे त्यांचे खासदार हे नेहमीच एक आकडीच राहतील.” आता बॅ. गाडगीळ यांचे हे वक्तव्य होते ते साधारणपणे १९९९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीपासून २०१९ सालच्या निवडणुकीची शरद पवारांची आकडेवारी पाहिल्यास ती कधीही दोन आकडी झालेली नाही, पाच, सात, आठ यातच पवार नेहमी फिरत राहिले आहेत. महाराष्ट्रातही पवारांची खरी ताकद ही पश्चिम महाराष्ट्र, त्यातही पुणे महसूल विभागापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे केवळ साडेतीन जिल्ह्यांवर प्रभुत्व असलेल्या नेत्याला नेमक्या कोणत्या कारणाने ‘राष्ट्रीय नेता’ मानावे, हा प्रश्न आहे.
 
 
 
काँग्रेसमध्ये असताना पवारांना राजीव गांधी, प्रणव मुखर्जी, सीताराम केसरी आणि सोनिया गांधी या नेत्यांनी नेहमीच शह दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील पहिल्या दर्जाचे, पहिल्या पातळीचे आणि पहिल्या फळीतले नेते म्हणून पवार कधीही ओळखले गेले नाहीत आणि आजही ओळखले जात नाहीत. पवारांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या ‘आरे’ला ‘कारे’ करणार्‍या नेत्यांसमोर आणि मुत्सद्दी नेत्यांसमोर ते लगेच नांगी टाकतात. त्यामुळेच केंद्रात प्रणव मुखर्जी, नरसिंह राव, सीताराम केसरी यांनी त्यांना अगदी सहजपणे दिल्लीच्या राजकारणातून हुसकावून लावले आणि महाराष्ट्रात सुधाकरराव नाईक, बॅ. गाडगीळ, शंकरराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आताचे देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना अगदी व्यवस्थितपणे वेळोवेळी कोंडीत पकडले आहेत. ज्या सोनिया गांधींच्या परदेशी वंशाचा मुद्दा काढून पवारांनी काँग्रेस सोडली, त्या पवारांना पुढे ‘युपीए’च्या कार्यकाळात ‘रायसिना हिल’पासून त्यांनी अगदी सहजपणे दूर ठेवले.
 
 
 
आता ‘रायसिना हिल’ म्हणजे देशाचे खरे सत्ताकेंद्र. तेथे असलेल्या साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकमध्ये पंतप्रधान कार्यालय आहे. त्यानंतर गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय, अर्थमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय तेथे आहे. मात्र, संपुआमध्ये पवारांना यातले एकही खाते मिळाले नाही. प्रणव मुखर्जी यांनी तर २००४ साली स्पष्टपणे सांगितले होते की, “ही चार खाती काँग्रेसकडेच राहतील आणि उर्वरित खात्यांवर चर्चा होईल.” तेव्हा मग पवारांना नाइलाजाने कृषी मंत्रालय घ्यावे लागले. त्याचाही असा प्रचार महाराष्ट्रातल्या त्यांच्या भाटांनी केला की, जसे काही कृषिमंत्री हा पंतप्रधानच आहे. त्यामुळे पवारांचे नेतृत्व खरे तर मृगजळ आहे आणि ते मृगजळही केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहे. कारण, पवारांप्रमाणेच काँग्रेस सोडलेल्या ममता बॅनर्जी असो किंवा आताचे जगनमोहन रेड्डी असो, यांनी काँग्रेसला पराभूत केले, तर पवार अजूनही काँग्रेसच्या जीवावर आपल्या पक्षाला सत्तेत ठेवण्यात धन्यता मानत आलेले आहेत. त्यामुळे पवारांच्या स्तुतीपाठकांकडून होणार्‍या त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा गजर हा कायमच फोल ठरत आलेला आहे आणि आताच्या ‘सोशल मीडिया’च्या जमान्यात तर राष्ट्रीय नेतृत्वाचा दावा तर अगदीच केविलवाणा ठरताना दिसत आहे.
 
 
पवारांच्या एकूणच राजकारणाचे वर्णन करायचे झाल्यास ते असे असेल - पवार साहेबांना अळणी राजकारणाची अजिबात सवय नाही, त्यांना लागतो तो मसालेदारपणा, म्हणूनच साहेबांचं राजकीय ताट हे अभ्यासूवृत्ती, कोणताही विषय झपाट्याने समजून घ्यायची हातोटी, प्रशासनावर बर्‍यापैकी पकड यासोबतच चवीपुरते पुरोगामित्व, निधर्मवाद, जातीयवाद, पेशवे, पळी-पंचपात्र असे ‘भरलेले‘ असते. मग साहेब हव्या त्या पदार्थांचा मुक्तपणे आस्वाद घ्यायला मोकळे. शिवाय काही कमी-जास्त पडायला नको म्हणून तमाम पुरोगामी लेखक, विचारवंत, पत्रकार आणि आणखी काही काही असणारे लोक तर सदैव दिमतीला असतातच. एकूण काय की, ज्याप्रमाणे सुखवस्तू घरातील कर्ता पुरुष ज्याप्रमाणे पोटभर जेवण वगैरे करून, ओसरीवरच्या बंगळीत बसून सुपारी (अथवा अन्य काहीही..) कातरता कातरता जे काही करतो आणि गाव चालविण्याचा आव आणतो; तशा प्रकारचे त्यांचे कथित राष्ट्रीय नेतृत्व आहे.

@@AUTHORINFO_V1@@