अनमोल क्षणांना अविस्मरणीय करणारी ‘ऋषी एंटरप्रायझेस’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2021   
Total Views |

page 8  _1  H x


 
सावंत दाम्पत्याने याकडे सकारात्मकतेने पाहत व्यवसायाची वाटचाल चालूच ठेवली आहे. अशा लघुउद्योजकांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे. आपल्या पंतप्रधानांनी ‘व्होकल टू लोकल’ ही घोषणा दिली आहे. पण, ती घोषणा आपण प्रत्येक भारतीयाने अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘ऋषी एंटरप्रायझेस’सारख्या कंपनीचा आवाज आपण बनलं पाहिजे. क्षणांना संस्मरणीय करणार्‍या या जोडप्यास व्यवसाय देऊन त्यांच्या व्यवसायास हातभार लावणे महत्त्वाचं आहे.
 
 
 
कोणालाही प्रश्न विचारला की, त्याच्या आयुष्यातील एखादा अविस्मरणीय प्रसंग कोणता? तर बहुतांश वेळा उत्तर येते की, आयुष्यात मिळविलेलं पहिलं बक्षिस. मग ते बक्षिस नाटकासाठी असो, अभ्यासासाठी असो वा अन्य कोणत्याही कारणासाठी. त्यावेळेस मिळालेलं ते छोटंसं पदक, ढाल अथवा कप हे सारं अविस्मरणीय असतं. हे असे क्षण अविस्मरणीय करण्याचं काम गेल्या दशकापासून सावंत दाम्पत्य करत आहे. फक्त बक्षिस, स्मृतिचिन्ह, सन्मानचिन्हंच नव्हे, तर ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’मध्येसुद्धा ते कार्यरत आहेत. हे सावंत दाम्पत्य म्हणजे ‘ऋषी एंटरप्रायझेस’चे संचालक रुणाली आणि ऋषिकेश सावंत. तसं पाहिल्यास या दाम्पत्यांचं जीवन खडतर संघर्षातून सुरू झालं.
 
 
 
 
दत्ताराम सावंत आणि देवयानी सावंत यांना दोन अपत्ये. ऋषिकेश आणि दीप्ती. दत्ताराम हे ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’मध्ये कारकून म्हणून कार्यरत होते. गृहिणी असणार्‍या देवयानी यांनी आपल्या दोन्ही मुलांना योग्य संस्कार देऊन वाढविले. ऋषिकेशचं शालेय शिक्षण भांडुपच्या ‘नवजीवन विद्यालया’त झाले. अगदी शिशुवर्गापासून ते बारावीपर्यंत तो तिथेच शिकला. अकरावीमध्ये असल्यापासून तो खासगी कंपनीत कामाला जाऊ लागला. सकाळी कॉलेज, संध्याकाळी काम असं चालू होतं. पगार होता हजार रुपये. आर्थिक परिस्थिती काहीशी नाजूक असल्याने ऋषिकेशने आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबई विद्यापीठातून दूरस्थ शिक्षणप्रणालीद्वारे केलं.
 
 
 
हे शिक्षण चालू असताना एक रासायनिक कंपनी, ‘व्हिनस कॅसेट’ कंपनी, एका बँकेत ’क्रेडिट कार्ड’चे ‘मार्केटिंग’ अशी कामे तो करतच राहिला. २००२ मध्ये त्याला परदेशात जाण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्याकाळी दुबईत जाऊन नोकरी करणे हा आर्थिक स्तर उंचावण्याचा एक मार्ग समजला जात असे. ऋषिकेश आठ वर्षे तिथे कामाला होता. तिथल्या कंपनीमध्ये ‘स्टोअरकिपर’ म्हणून तो काम करत असे. ती कंपनी विविध स्मृतिचिन्हे तयार करण्यात वाक्बगार होती. विशेषत: ‘अ‍ॅक्रॅलिक’मध्ये काम करण्यात त्यांचा हातखंडा होता.
 
 
 
दरम्यान, वृद्ध आई-बाबांच्या सेवेसाठी ऋषिकेशला भारतात येणं गरजेचं होतं. २००९ मध्ये तो भारतात परतला. दोन वर्षे वेगवेगळ्या अशा कंपन्यांमध्ये कामे केली. मात्र, पैसा मनासारखा मिळत नव्हता. नोकरीमध्ये एवढे पैसे मिळणे अवघड आहे, हे एव्हाना ऋषिकेशच्या ध्यानी आलं. दुबईमध्ये ज्या कंपनीमध्ये तो कामाला होता, त्या कामाच्या अनुभवाचा आता व्यवसायासाठी वापर करायचे ऋषिकेशने निश्चित केले. याच निश्चयातून २०११ उभी राहिली ‘ऋषी एंटरप्रायझेस’ ही कंपनी.
 
 
 
सुरुवातीला विविध स्पर्धेसाठी लागणारी बक्षिसे, पदके, स्मृतिचिन्हे, सन्मानचिन्हे तो तयार करू लागला. विविध मंडळे, स्थानिक स्पर्धा, कंपन्यांचे कार्यक्रम यासाठी जे समारंभ व्हायचे, त्यासाठी स्मृतिचिन्हांची गरज लागत असे. ऋषिकेश मेहनती होता. त्याचा मित्रपरिवार मोठा होता. एखादा माणूस त्याच्या संपर्कात आला की, तो त्याचा चांगला मित्र होत असे. या सगळ्या गुणांचा ऋषिकेशला त्याच्या व्यवसायात फायदा होऊ लागला. हळूहळू बाजारपेठेत ‘ऋषी एंटरप्रायझेस’चे नाव होऊ लागले. दरम्यान, २०१३ मध्ये ऋषिकेशचा विवाह वैशाली कदम या तरुणीसोबत झाला. वैशालीचे बाबा श्रीधर कदम महानगपालिकेच्या शिक्षण विभागात नोकरीस होते. त्यांना तिन्ही मुलीच होत्या. मात्र, श्रीधर आणि सुरेखा या जोडप्याने आपल्या मुलींना मुलांसारखंच वाढवलं. मुलींनीसुद्धा आपल्या आई-बाबांना मुलांची कमतरता कधीच जाणवू दिली नाही. वैशाली ही दुसर्‍या क्रमांकाची कन्या. मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं.
 
 
 
त्यात श्रीधरराव सेवानिवृत्त झाले. पेन्शनमध्ये चार जणांचं कुटुंब चालवणं तसं अवघडंच. लहान बहिणीचं शिक्षण अजून बाकी होतं. वैशाली कांदिवलीच्या डॉ. नरवणे विद्यालयातून बारावीपर्यंत शिकली. पुढे बी.कॉम तिने मुंबई विद्यापीठातून दूरस्थ शिक्षण प्रणालीतून तिने केले. दहावीपासून ती ‘शिका आणि कमवा’ या तत्त्वावर शिकत होती. एका रासायनिक कंपनीत तिने खरेदी-विक्री विभागात काम केले. आणखी अशा चार ते पाच कंपन्यांमध्ये तिने काम केले. आठ ते दहा वर्षांचा अनुभव गाठीशी होताच. लग्न झाल्यानंतर वैशाली श्रीधर कदम ही रुणाली ऋषिकेश सावंत झाली. नोकरी करण्यापेक्षा आपला व्यवसाय वाढवावा, असे या जोडप्याने निश्चित केले. रुणाली तशी बोलक्या स्वभावाची.
 
 
 
त्यामुळे तिने कंपनीच्या ‘मार्केटिंग’वर भर देण्याचे निश्चित केले. दोन वर्षांत ‘ऋषी एंटरप्रायझेस’ने बर्‍यापैकी जम बसवला होता. ऋषिकेशच्या नावामुळे कंपनीची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. ही ओळख विस्तारण्याची जबाबदारी रुणालीने स्वत:च्या शिरावर घेतली. विविध उद्योजकीय संस्थेच्या माध्यमातून ती अनेक उद्योजकांना भेटू लागली. त्यांना आपल्या कंपनीचं सादरीकरण सादर करू लागली. त्यामुळे अल्पावधीत कंपनी विस्तारू लागली. कार्यक्रम छोटा असो की मोठा, ‘ऋषी एंटरप्रायझेस’च्या स्मृतिचिन्हांना मागणी वाढू लागली. दरम्यान, लघु-मध्यम उद्योजकांसोबतच कॉर्पोरेट क्षेत्रातसुद्धा ‘ऋषी एंटरप्रायझेस’ वाढू लागली. याचा लाभ घेत कंपनीने ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’मध्येसुद्धा काम करण्यास सुरुवात केली. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा असो वा नववर्ष, या प्रत्येक क्षणाला कॉर्पोरेटजगतात भेटवस्तू देण्याची एक प्रथा आहे.
 
 
 
ही भेटवस्तू ‘कस्टमाईज्ड’ असते. म्हणजे आपल्या कंपनीचे नाव व बोधचिन्ह त्या भेटवस्तूवर कोरून ते समोरच्या ग्राहक असलेल्या कंपनीला देण्यात येते. ‘ब्रॅण्डिंग’चा हा एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो. यामध्येसुद्धा रुणालीच्या कंपनीने आपलं स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं. ‘ऋषी एंटरप्रायझेस’मध्ये ‘अ‍ॅक्रॅलिक’ आणि लाकडाच्या ‘ट्रॉफी’, ‘क्रिस्टल ट्रॉफी’, ‘मेटल ट्रॉफी’, ‘फायबर ट्रॉफी’, ‘वुडन प्लाक’, ‘क्रिकेट ट्रॉफी’, ‘प्रोमोशनल मेडल’, ‘कॉर्पोरेट ऑफिस ग्लास बोर्ड’, ‘अ‍ॅक्रॅलिक’चे शाळेचे बोर्ड आदी तयार केल्या जातात. ‘पितांबरी’, ‘एलआयसी’, ’आयडीएफसी’, ‘एल अ‍ॅण्ड टी’, ‘बँक ऑफ बडोदा’, ‘रेमण्ड’ अशा विविध कंपन्यांना त्यांनी सेवा दिलेल्या आहेत.
 
 
 
भारतीय नौदल, केईएम स्कूल, एस. एम. शेट्टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हेसुद्धा मान्यवर ग्राहक आहेत. ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’मध्येसुद्धा त्यांच्याकडे विविध प्रकार आहेत. ‘किचेन’सोबत ‘एलईडी पेन’चा संच, ‘पॉवर बँक’, ’ब्ल्युटूथ स्पीकर’, ‘पेनड्राईव्ह’, ‘वूडन डेस्कटॉप’, पर्यावरणस्नेही उत्पादने आदी कित्येक प्रकार ‘ऋषी एंटरप्रायझेस’ देते. ‘नॅशनल इन्शुरन्स’, ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’, ‘सीएट टायर’, ‘हिरानंदानी’ अशा विविध उद्योगसमूहांना त्यांनी ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’मध्ये सेवा दिलेली आहे. ग्राहकाच्या मागणीनुसार, त्याच्या आवडीनुसार त्यांना उत्पादन तयार करून देण्यात ‘ऋषी एंटरप्रायझेस’चा हातखंडा आहे. आतापर्यंत १०० हून अधिक ग्राहक कंपन्यांच अनमोल क्षण त्यांनी आपल्या उत्पादनाने अविस्मरणीय केले आहेत.
कोरोनाचं सावट एकूणच जगावर सध्या आहे.
 
 
त्यामुळे कार्यक्रम होत नाहीत. त्याचा फटका या क्षेत्रातील कंपन्यांनादेखील बसला. मात्र, सावंत दाम्पत्याने याकडे सकारात्मकतेने पाहत व्यवसायाची वाटचाल चालूच ठेवली आहे. अशा लघुउद्योजकांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे. आपल्या पंतप्रधानांनी ‘व्होकल टू लोकल’ ही घोषणा दिली आहे. पण, ती घोषणा आपण प्रत्येक भारतीयाने अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘ऋषी एंटरप्रायझेस’सारख्या कंपनीचा आवाज आपण बनलं पाहिजे. क्षणांना संस्मरणीय करणार्‍या या जोडप्यास व्यवसाय देऊन त्यांच्या व्यवसायास हातभार लावणे महत्त्वाचं आहे. किंबहुना, त्यांच्यासारख्या उद्योजकांसाठी ते अविस्मरणीय असेल.


@@AUTHORINFO_V1@@