ग्रामसेवेचा वसा

    24-Mar-2021   
Total Views | 94

gram  _1  H x W

 

महात्मा गांधी यांचा ‘खेड्याकडे चला’ हा मूलमंत्र अंगीकारून ग्रामसेवेचे कर्तव्य बजावणार्‍या ग्रामसेवक माधवी कदम यांच्याविषयी...
 
 
 
शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होताना दिसत आहे. शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी अहोरात्र सज्ज असणार्‍या आरोग्य यंत्रणा असतात. पण, ग्रामीण भागात सगळीच गैरसोय असते. येथे जीवाची बाजी लावून सतत आघाडीवर असतात ते ग्रामसेवक. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहत गेली १५ वर्षे ग्रामविकासासाठी कटिबद्ध असणार्‍या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दळखण या गावात ग्रामसेवकपदावर कार्यरत असणार्‍या माधवी बाळासाहेब कदम यापैकीच एक. त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावा.
 
 
 
वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्या ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्या. सांगली जिल्ह्यातील पुणदीवाडी गावात त्यांची पहिली पोस्टिंग झाली. पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त गाठीशी कोणताही अनुभव नव्हता की, घरात कोणीही शासकीय सेवेतही नव्हते.त्यांनी निर्भीडपणे कामाला जुंपून घेतले. सात वर्षे सांगलीतील गावात काम करताना त्यांनी गावाची ‘निर्मल ग्रामपंचायत’ अशी ओळख निर्माण केली. गाव ‘हागणदारीमुक्त’ आणि ‘तंटामुक्त’ केले. त्यांच्या कामांची पद्धत पाहून नवख्या असणार्‍या माधवी यांना बाजूच्या ग्रामपंचायतीचाही चार्ज दिला गेला. ही जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली.
 
 
 
त्यांची कौटुंबिक स्थिती तशी बेताचीच होती. वडील अल्पभूधारक शेतकरी, त्यामुळे पिकेल तेच विकेल, अशा परिस्थितीत जेवढं विकलं जाई, त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते तर भाऊ शिक्षण घेत होता, त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी माधवी यांच्यावरच होती. ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलत असतानाच २०१० साली त्या विवाहबंधनात अडकल्या. लग्नानंतर २०१२ साली त्या ठाण्यात आल्या अन् ठाणेकर बनल्या. नियमानुसार जिल्हा बदली करून त्यांना कल्याणच्या नडगाव ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. काही वर्षं या ग्रामपंचायतीमध्ये काम केल्यानंतर २०१९ साली बदली होऊन त्या शहापूर तालुक्यातील दळखण गावात ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्या. सुरुवातीला प्लास्टिकबंदी करून गावात पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कौशल्याभिमुख प्रशिक्षण देऊन महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या कामासोबतच त्यांनी गावातील लोकांना सतत भेडसावणार्‍या मूलभूत प्रश्नांची तड लावण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.
 
 
 
ग्रामविकासाच्या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून देत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली. दळखण गावातील वैतागवाडी येथे ४० वर्षांपासून पाण्याचे दुर्भिक्ष होते. मात्र, ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून या भागात जलवाहिनी टाकून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे गेली ४० वर्षे महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण मिटल्याचे त्या सांगतात. कोरोना काळातही या गावात अनेक आव्हाने उभी ठाकली. सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या आणि मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्याही वाढत होती. अशा आव्हानात्मक काळातही कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात कर्मचार्‍यांसह त्या अग्रस्थानी होत्या. ही परिस्थिती हाताळत गावातील वनवासी बांधव उपाशी राहू नये, यासाठी दात्यांच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवठा करण्यात त्यांनी हात आखडता घेतला नाही. सध्या दळखण गाव जिल्ह्यातील ‘आदर्श गाव’ म्हणून नावारूपाला येत आहे.
 
 
 
गावात स्वच्छतेपासून शिक्षणापर्यंत, मुबलक पाणी ते घनकचर्‍यापर्यंत भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे. त्यामुळे आज ग्रामपंचायतची स्वतःची घंटागाडी आहे. त्यामुळे गावात कचर्‍याचे सुयोग्य व्यवस्थापन केले जाते. शिवाय, ग्रामपंचायतीने स्वतःची रुग्णवाहिका खरेदी केल्याने गावात पहिला फिरता दवाखाना सुरू झाला आहे. कोरोना काळात सरकारी अनुदान वा निधीची वाट न पाहता, हा आरोग्यदायी उपक्रम राबवणारे दळखण गाव बहुधा राज्यातील पहिलेच असावे. या फिरत्या दवाखान्याचा गावकर्‍यांना चांगला उपयोग होत आहे. याशिवाय, लोकसहभागातून अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारतदेखील उभारल्याचे त्यांनी सांगितले. या सार्‍या जनहितकारी योजनांमुळे नुकतेच गावाला तालुकास्तरीय ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
 
शासकीय कर्तव्यांबरोबरच कौटुंबिक जबाबदारीही माधवी सक्षमपणे पेलत आहेत. पतीचेही सहकार्य लाभते. त्यांना लहान मुलगी असून, तिच्या संगोपनासाठी अधिक वेळ देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महिला म्हणून काम करताना येणार्‍या आव्हानांचा सामना करत कर्तव्याप्रति प्रामाणिक असणे आणि आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, ही उदात्त भावना जपत असल्याचे त्या सांगतात. गरिबी भोगली असल्याने गरजूंना सदैव सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या कामाला आई-वडिलांचे नेहमीच प्रोत्साहन मिळत आले. आई-वडिलांनी केलेल्या कष्टातून त्यांच्या यशाचा पाया भक्कमपणे उभा असल्याचे त्या सांगतात. आताही आपल्या भावाला प्रशासकीय सेवेसाठी परीक्षा देण्याकामी यथोचित साहाय्य करीत आहेत. त्यामुळे, आपल्या कामाशी प्रामाणिक राहून तळागाळातील लोकांसाठी काम करण्यासाठी कटिबद्ध असणार्‍या माधवी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 




 

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.

अग्रलेख
जरुर वाचा
बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळीच्या बीडीडी चाळीतील ५५६ कुटुंबांना त्यांच्या नव्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. ही घटना मुंबईच्या अनेक प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांच्या आणि तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवित करणारी ठरली असून गोरेगावातील मोतीलाल नगरसारख्या वसाहतींत जनमताचा रेटा आता मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या, पर्यायाने पुनर्विकासाच्या बाजूने झुकताना दिसत आहे...

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी वर्षानुवर्षे आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करतात. सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्या घरातील गणेशाची विशेष चर्चा होते. २२ वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने आपल्या घरी प्रथमच बाप्पा आणला होता. तेव्हापासून ती सातत्याने बाप्पाला घरी आणते. शिल्पाच्या घरी बाप्पा बसल्यावर ते फक्त सेलिब्रेशन नसतं, तर एक ग्लॅमरस फेस्टिव्हल असतो. तिच्या घरचा गणेशोत्सव म्हणजे लाईमलाईट, सेलिब्रिटी पाहूणे, डान्स, गाणी आणि एक वेगळाच जल्लोष. चाहते तिच्या घरासमोर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र यावर्षी या प्रथेत खंड ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121