‘बेस्ट’ची ‘एसी’ बस सक्ती!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2021   
Total Views |

BEST _1  H x W:
बेस्ट’ने आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक ‘एसी’ बसेसची बर्‍यापैकी भर घातली. त्यामुळे आता मुंबईच्या कानाकोपर्‍यात अगदी गल्लीबोळातही ‘बेस्ट’च्या मिडी बसेस ऐटीत धावताना दिसतात. सामान्य बसच्या किमान पाच रुपये भाड्याऐवजी फक्त एक रुपया अधिक मोजून हा गारेगार प्रवास करायला मुंबईकरांचीही हरकत नाही. त्यामुळे या ‘एसी’ बसेसलाही मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. पण, उन्हाळ्यात ‘बेस्ट’च्या ‘एसी’ बसचा प्रवास ‘थंडा थंडा कुल कुल’ असला, तरी त्याच मार्गावर धावणार्‍या सामान्य बसची संख्या मात्र ‘बेस्ट’ने कमी केली. म्हणजेच काय, तर एक रुपया अधिक द्या आणि ‘एसी’ बसनेच प्रवास करा, अशी ही अप्रत्यक्ष सक्ती! कारण, आता ज्या मार्गांवर ‘एसी’ बसेस सुरू करण्यात आल्या, त्या मार्गांवरील सामान्य बसेससाठी प्रवासी तरी किती वेळ प्रतीक्षा करणार? तो साहजिकच एक रुपया जादा भाडे भरून मार्गस्थ होईल. हीच गोष्ट अचूक हेरून ‘बेस्ट’ने जास्त प्रवासीसंख्या असलेल्या मार्गांवर अशा ‘एसी’ बसेसचा ताफा रस्त्यावर उतरविला खरा; पण त्यातही ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचा मात्र नाहक खोळंबाच अधिक होताना दिसतो.बहुतांश वेळेला या ‘एसी’ बसेस जोपर्यंत पूर्ण भरत नाहीत, तोपर्यंत त्या त्यांच्या पहिल्या बसथांब्यापासून रवानाही होत नाहीत. त्यातच यापैकी बहुतांश बसेस ‘विनावाहक’ असल्यामुळे तिकीट बसमध्ये चढण्यापूर्वीच काढावे लागते आणि मग एकदा तिकीट घेतले की, दुसरी ‘नॉन-एसी’ बस आलीच तरी त्यात चढण्याची सोय नाही. त्यामुळे कडक उन्हात बसच्या प्रतीक्षेत रांगा लावून उभे राहणेच नशिबी. त्यातच सहा रुपयांच्या तिकिटासाठी ‘सुट्टे पैसे द्या’चा हट्ट तो वेगळाच! ‘एसी’ बसचा लाभ पहिल्या आणि शेवटच्या बसथांब्यांव्यतिरिक्त प्रवाशांनाही व्हावा म्हणून ‘बेस्ट’ने ‘ग्राऊंड तिकीट’ देणार्‍या वाहकांना काही ठरावीक बसथांब्यांवर तैनात केले असले, तरी या बस मधल्या बसथांब्यांवर कोणी उतरणारा प्रवासी नसेल, तर थांबतीलच याची शाश्वती नाही. म्हणून काही मार्गांवर या ‘एसी’ बसही वाहकांसह चालवल्या जातात. तेव्हा, ‘बेस्ट’ने प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून पासबरोबरच डिजिटल तिकिटांचा पर्याय पूर्ण कार्यक्षमतेने वापरल्यास बसचे आणि प्रवाशांचे वेळापत्रकही कोलमडणार नाही, हीच अपेक्षा...
 
 

 
चौपाट्या, उद्याने बंद करावी
 

 
एकीकडे मुंबईमध्ये दिवसाला तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत असतानाही चौपाट्या आणि उद्यानांमधील गर्दी चिंताजनक म्हणावी लागेल. कारण, आता मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ‘अ‍ॅन्टिजेन टेस्ट’ बंधनकारक असल्याने तेथील गर्दी काही प्रमाणात ओसरेलही; पण चौपाट्या, उद्याने आणि तत्सम गप्पांच्या कट्ट्यांवरील गर्दी रोखण्याचे मोठे आव्हान मुंबई महानगरपालिकेसमोर आहे. खरंतर बहुतांश मुंबईकर हे दंडाच्या भीतीपोटी का होईना, मास्क लावून फिरताना दिसतातही. पण, यामध्ये विनाकामाचे मास्क लावून भटकणार्‍या, रेल्वेने प्रवास करणार्‍या तरुण-तरुणीही अव्वल. शाळा-महाविद्यालये, शिकवण्या सगळे बंद असतानाही विनाकारण मौजमजा म्हणून ‘आपल्याला कोरोना होऊच शकत नाही’ या धुंदीत या युवावर्गाचे जत्थेच्या जत्थे उगाच हिंडताना दिसतात. त्यावरील एक उपाय म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्याच्या चौपाट्या किंवा उद्यानांसारख्या ठिकाणांमध्ये सरसकट प्रवेशबंदी करावी. जोपर्यंत अशी प्रवेशबंदी होणार नाही, तोपर्यंत या चौपाट्यांवर कुठलाही वार का असेना, गर्दी होणार नाही. उद्यानांमध्येही ‘मॉर्निंग वॉक’ आणि संध्याकाळच्या फेरफटकाच्या वेळा वगळता उद्याने पूर्णपणे बंद ठेवावी. तसेच उद्यानात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन होईल, लोकं वॉकनंतर, व्यायामानंतर गप्पा मारता तिथेच ताटकळत बसणार नाहीत, याची खबरदारीही उद्यानांचे व्यवस्थापन-देखभाल करणार्‍या मंडळींनी कटाक्षाने घ्यायला हवी. ‘पहिल्या लाटेत आम्हाला कोरोना झाला नाही, तर आता काय हा विषाणू आमच्याजवळ येईल’, ‘आम्ही लस घेतली, आता कोरोनाची काय हिंमत मला छळायची’ आणि अशा अनेक गैरसमजुती जोपासणार्‍यांनी त्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडावे. कारण, हाच निष्काळजीपणा आज अनेकांच्या जीवावर बेतताना दिसतो. ‘लॉकडाऊन’चा अंतिम जालीम उपाय नको असेल, तर नियमांचे पालन करण्याशिवाय तुम्हा-आम्हाला गत्यंतर नाही. ‘लॉकडाऊन’च्या दुष्परिणामांशी आपण सर्व परिचित आहोतच. त्यामुळे पुन्हा गेल्यावर्षी सारखीच परिस्थिती निर्माण व्हावी, अशी इच्छा नसेल, तर आता तरी सुधरा! कोरोनाची वर्षपूर्ती झाली तरी त्याचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. तेव्हा, मार्च २०२२ मध्येही कोरोनाच्या द्विवर्षपूर्तीचे दर्शन करायचे नसेल तर अजूनही वेळ गेलेले नाही!


@@AUTHORINFO_V1@@