वाझेंचे 'कार'नामे सुरूच ; एटीएसच्या हाती आणखी एक कार

    23-Mar-2021
Total Views | 261

vaze car_1  H x




मुंबई :
मनसुख हिरन प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र 'एटीएस'मार्फत करण्यात येत आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या पथकाने आता दमणमध्ये कारवाई करून व्होल्वो कार जप्त केली आहे. तत्पूर्वी, वाझे प्रकरणात पाच कार जप्त करण्यात आल्या होत्या. ही जप्त केलेली सहावी कार आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर झाल्याचा संशय आहे. त्याच दिशेने तपास सुरू आहे.



मनसुख हिरन प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे सोपवण्यात आला असला, तरी महाराष्ट्र 'एटीएस'कडूनही तपास सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून 'एटीएस'ने दमणमध्ये कारवाई करून या प्रकरणाशी संबंधित व्होल्वो कार जप्त केली आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर करण्यात आल्याचा संशय पथकाला आहे. जप्त करण्यात आलेली व्होल्वो कार 'एटीएस'च्या ठाणे येथील कार्यालयात ठेवण्यात आली आहे. वाझे प्रकरणात जप्त केलेली ही सहावी कार आहे. याआधी या प्रकरणाशी संबंधित स्कॉर्पिओ, इनोव्हा, दोन मर्सिडीज, प्रॅडो या कार जप्त केल्या आहेत. 'एटीएस'ने दमण येथील एका फॅक्ट्रीत सोमवारी छापा मारला होता. तिथे त्यांना ही कार सापडली. दमणमध्ये सापडलेल्या या कारचा खरा मालक आणि वाझेच्या दरम्यानच्या कनेक्शनचाही 'एटीएस' शोध घेत आहे. तर दुसरीकडे मनसुख हिरन प्रकरणात अटक करण्यात आलेला विनायक शिंदे हा अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणातील एक आरोपी असल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

हप्तेवसुलीची डायरी हाती?


वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना 'एनआयए'च्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब्ज आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे. मनसुख हिरन हत्याप्रकरणात महत्त्वाचे पुरावे मिळत आहेत. १६ मार्च ते २० मार्च यादरम्यान आरोपी सचिन वाझे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होता, अशी माहिती समोर येत आहे. यासाठी त्याने बनावट आधार कार्डसह बनावट नाव व इतर गोष्टींचा वापर केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात समोर आले आहे, तसेच वाझेची डायरीदेखील तपासात हाती लागल्याने महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. या डायरीमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांच्या पाच आलिशान गाड्या, पाच लाखांची रोख रक्कम, पैसे मोजण्याचे मशीन आणि डायरी 'ईडी'च्या रडारवर आहे. त्यामुळे आता या प्रकरणात 'ईडी' उतरण्याची शक्यता आहे. वाझेंच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासातून पोलीस दलातील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121