मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना एकामागून एक हादरे बसत आहेत. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत गृहमंत्र्यांवर आरोप करणा-या माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी आता अजून एक धक्का दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे व 'सीबीआय'मार्फत चौकशीची मागणी त्यात त्यांनी केली आहे.
आज गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारताच परमवीर सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 'सीबीआय'कडून भ्रष्टाचाराची चौकशी केली जावी अशी मागणी सिंग यांनी याचिकेतून केली आहे. दरम्यान, यापूर्वी सोमवारी सकाळीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांची पाठराखण केली होती. पत्रातील आरोपानुसार उल्लेख केलेल्या तारखेला देशमुख हे नागपुरात होते. त्यामुळे आरोपांत तथ्य नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याचा काहीच प्रश्न नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. आता परमबीर सिंगांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने या प्रकरणी पुढे काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
गृहमंत्र्यांनी चौकशी झाल्याचे कारण देत आपल्याला मुंबई आयुक्त पदावरुन पायउतार केल्याचे सांगितले होते. पण मला कोणीही चौकशीसाठी बोलावले नाही. माझी कुठल्याही प्रकारची चौकशी 'एटीएस' किंवा 'एनआयए'कडून झालेली नाही. त्यामुळे आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची आणि आपल्या बदली मागच्या कारणाची चौकशी करावी, अशी याचिका परमवीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याचे समोर येत आहे.
परमवीर सिंह यांनी पत्रात केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार सांगत असताना आता त्यांनी याबाबतीत एक नवा खुलासा केला आहे. मला कोविड झाल्यामुळे नागपूरच्या रुग्णालयात मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दाखल होतो. त्यानंतर मी थेट १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी मी 'होम क्वारंटाईन' होतो व त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी मी पहिल्यांदाच सह्याद्री अतिथी कक्ष येथे बैठकीला गेलो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.