नवी दिल्ली : ६७व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा नुकतीच झाली आहे. यामध्येही मराठीचा बोलबाला पाहायला मिळाला. यामध्ये 'आनंदी गोपाळ' या मराठी चित्रपटाला सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला असून, सर्वोत्तम प्रोडक्शन डिझाईन हा पुरस्कारदेखील मिळाला. 'बार्डो' या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम मराठी भाषिक चित्रपट, तर सर्वोत्तम गायिका म्हणून या चित्रपटातील 'रान पेटले' या गाण्यासाठी सावनी रवींद्र यांना देण्यात आला. तसेच, चित्रपटावरील सर्वोत्तम पुस्तक म्हणून लेखक/समीक्षक अशोक राणे यांच्या 'सिनेमा पाहणारा माणूस' या पुस्तकाला विशेष उल्लेखनीय म्हणून गौरविण्यात आले. याशिवाय 'पिकासो' या चित्रपटाला विशेष उल्लेखनीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
'झी स्टुडीओ' निर्मित समीर विध्वंस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. यावेळी सामाजिक विषयावर भाष्य करणारा सर्वोत्तम चित्रपट म्हणून या चित्रपटाचा गौरव करण्यात आला. तसेच, सर्वोत्तम अन्वेषक चित्रपट म्हणून 'जक्कल' या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आला, तर मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी यांना 'दि ताश्कंद फाईल्स' या चित्रपटासाठी सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले.