पेन्शनधारकांच्या हक्कासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2021   
Total Views |

Smita Harhare_1 &nbs
 
 
 
‘न हिन्दूः पतितो भवेत्’ हा विचार आयुष्यात जगणाऱ्या आणि कामगारांच्या हक्कासाठी कार्य करणाऱ्या पेन्शनर धारकांसाठी काम करणाऱ्या स्मिता हेमंत हरहरे यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
 
 
 
 
'भारतीय दूरसंचार पेन्शनर संघा’च्या पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षा, भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्या, राष्ट्र सेविका समिती शाखेच्या सहकार्यवाह स्मिता हेमंत हरहरे. पुणे-पिंपरी परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविणे, भारतीय दूरसंचार विभागातील कामगारांचे प्रश्न सोडवणे, त्यातही निवृत्ती पत्करुन पेन्शनर असलेल्या कामगारांचे आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना समर्थ साथ देणाऱ्या अशा सुस्वभावी स्मिता. अत्यंत हसतमुख आणि आपलेपणा असलेला चेहरा आणि तसेच वागणे ही स्मिता यांची ओळख. कामगारांसाठी काम करण्यासोबतच रक्तदान शिबीर आयोजित करणे हासुद्धा स्मिता यांचा उपक्रम. कामगार क्षेत्र मग ते दूरसंचार विभागाचे का असू दे, तिथे सहसा महिला कामगार नेता दिसत नाही. कामगारांचे विविध प्रश्न, त्यातील कायदेशीर खाचाखोचा यांचा अभ्यास, त्या कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठीची निर्भयता आणि मेहनत करणे, यामुळे महिला नेतृत्व तयार होताना दिसत नाही. मात्र, पुणे टेलिफोनमध्ये भारतीय मजदूर संघाच्या ‘ऑर्गनायझेशन सेक्रेटरी’ असलेल्या स्मिता यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले.
 
सत्तरच्या दशकात आणीबाणीचे दिवस होते. त्यावेळी सरकारी आस्थापन किंवा खासगी आस्थापनांमध्येही काँग्रेस आणि कम्युनिस्ट कामगार युनियनची चलती होती. कामगारांवर त्यांचा एक धाकच होता. या अशा काळात श्रीकांत लाटे हे स्मिता हरहरेंच्या घरी आले. म्हणाले की, “तुमच्या घरी संघाचे वातावरण. तुमचे पती हेमंत, सासरे परशुराम हे रा. स्व. संघाच्या विचारांसाठी झोकून काम करतात. पुणे टेलिफोनमध्ये भारतीय मजदूर संघाचे तुम्ही काम करा.” यावर स्मिता यांना वाटले की, आपण करू शकू का हे काम? पण, सासरे आणि माहेर दोन्हीही पदराला खार लावून समाजकार्य करणारे. या दोन्ही घरातले संस्कार आणि पती हेमंत, सासरे बुवा आणि सासूबाई यांनीही स्मिता यांना समर्थन दिले, साथ दिली. त्यामुळे स्मिता पुणे टेलिफोनमधील भारतीय मजदूर संघाच्या ‘ऑर्गनायझेशन सेक्रेटरी’ झाल्या.
 
 
भारतीय मजदूर संघाचे काम करतात म्हणून त्यावेळी त्यांना खूप त्रासही झाला. वारंवार बदली करणे, मुद्दाम दीर्घकाळ रात्रपाळी देणे, हे सुरू झाले. हे सगळे का? तर त्यांनी भारतीय मजदूर संघ सोडावा म्हणून. पण, अशा वेळी त्यांचे पती हेमंत हरहरे त्यांना म्हणाले, “अजिबात घाबरू नकोस आणि झुकू नकोस. आपल्या हक्कासाठी आपणच लढायचे. मी, तुझ्या सोबत आहे.” स्मिता यांची रात्रपाळी दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत असायची. हेमंत त्यांना दररोज रात्री आणायला जात. पुढे स्मिता या तिथल्या कामगारांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवू लागल्या. ‘पुणे टेलिफोन निगम’मध्ये मग त्यांना त्रास द्यायची कुणाची पुढे हिंमत झाली नाही. पुढे त्या याच पुणे टेलिफोनमध्ये ‘सुपरवायझर’ या पदावरून निवृत्त झाल्या. या सगळ्या घडामोडीत कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्याच. पण, सासरलाच माहेर बनवून त्यांनी हरहरे घरात गोकूळ फुलवले. या घरात बाळासाहेब देवरस, मुकुंदराव पणशिकर उमा भारती, शरदराव ढोले, अतुल लिमये यांसारखे संघविचारांचे लोक येऊन गेले आणि आजही येतात. त्यांच्या विचारांचे संस्कार या घराला नवे तेज देतात. त्या तेजाचे कार्यक्षम रूप म्हणजे स्मिता. त्या आज ‘भारतीय दूरसंचार पेन्शनर’ या शाखेच्या पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षा आहेत. अखिल भारतीय मजदूर संघाचे पुणे अध्यक्ष हरी सोवनी हे या पेन्शनरांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच स्मिता यांना मार्गदर्शन करतात.
 
 
स्मिता हरहरे मूळच्या स्मिता गोहाड. पुणे ग्रामीणचे उंबर हे त्यांचे मूळगाव. त्यांचे वडील रामचंद्र आणि आई उषा हे दाम्पत्य अत्यंत सुंस्कृत आणि सेवाभावी. रामचंद्र हे कामानिमित्त पुण्यात सदाशिव पेठेत राहायला आले. तिथेच त्यांची पाचही मुले शिकली- सवरली. त्यापैकी एक स्मिता होय. तेथेच स्मिता यांना समाजकार्याचे बाळकडू मिळाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण, त्यांचे वडील पुण्यातल्या नामांकित शाळेत शिक्षक. दर शनिवारी शाळेला अर्धा दिवस सुट्टी असायची, तेव्हा ते त्यांच्या मूळगावी उंबरला जायचे. का तर, तिथे एकच तोडकी मोडकी शाळा. इंग्रजी कुणालाही येत नव्हते. त्या शाळेत ते गावातल्या मुलांना विनामूल्य इंग्रजी शिकवायचे, गणित शिकवायचे. गावात ना रस्ता होता, ना पाण्याची व्यवस्था. रामचंद्र यांनी ‘एनएसएस’च्या माध्यमातून आठवी, नववीच्या मुलांना सामाजिक उपक्रम दिला. तो असा की, उंबर गावी रस्ता बनवायचा आणि विहीर खणायची. लहान मुले काम करतायेत हा बघून, सगळा उंबर गाव सरसावला आणि त्या गावात गावकऱ्यांनी श्रमदान करून विहीर आणि रस्ता बांधला. दुसरीकडे शिक्षकाला त्यावेळी पगार तो किती? त्या पगारात घरचे काही भागत नसे. कधी भात नसे, तर कधी भाजी नसे. पण, अशा काळातही जातपात न मानता गोहाड गुरुजी काही मुलांना आपल्या घरी शिकायला ठेवायचे. हे सगळे स्मिता यांनी अनुभवले. तेव्हाच त्यांनी ठरवले की, ‘मीसुद्धा असेच समाजकार्य करेन.’ त्या म्हणतात, “गोळवलकर गुरुजी म्हणाले होते की, ‘न हिन्दूः पतितो भवेत्’, अर्थात हिंदू समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये, हाच विचार माझ्या आयुष्याचे सूत्र आहे. श्वासात श्वास असेपर्यंत समाजकार्यातला खारीचा वाटा मी सुरू ठेवणार आहे.”
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@