फॉरेनची सुनबाई नको गं बाई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2021   
Total Views |

Soudi_1  H x W:



सौदी अरब... जगभरातील समस्त मुस्लीम देशांचे श्रद्धास्थान. या देशात कामानिमित्त तसेच लग्नानंतर स्थायिक होण्याचीही स्वप्नही मुस्लीम तरुण-तरुणींनीकडून रंगवली जातात. यामध्ये काही जण यशस्वी होतातही. पण, यासंदर्भात सौदी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि चाड या चार देशांमधील महिलांशी खासकरून सौदी पुरुषांना यापुढे विवाहबंधनात अडकता येणार नाही, असा मोठा निर्णय घेतला गेला.



आता नेमक्या या चार देशांमधील महिलाच सुनबाई म्हणून सौदीला अचानक का नकोशा झाल्या असाव्यात, असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक. तर सौदी अरबमधील एका शासकीय आकडेवारीनुसार वरील चार देशांच्या एकत्रितरीत्या जवळपास पाच लाख महिला या सौदीत लगीनगाठ बांधून स्थायिक झाल्या आहेत. तेव्हा, आगामी काळात ही संख्या वाढू नये आणि मूळ सौदी वंशच धोक्यात येऊ नये, यासाठी सौदीने हे पाऊल उचलले असावे. त्याचबरोबर या चारही देशांमध्ये सध्या अराजकसदृश परिस्थिती असून त्यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने भरडल्या जातात. अशा महिला सौदी पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून, विवाह करूनया देशांमधून बाहेर पडण्यासाठीही प्रयत्न करू शकतात. सौदीमध्ये आपण खूश राहू, असे वरकरणी या महिलांना वाटणे अगदी स्वाभाविक. पण, सौदीमधील प्रत्येक पुरुष धनाची पेटी बगलेत घेऊन फिरत नसतो, हेही तितकेच खरे. त्यात हल्ली सौदीमधील महिलांना युवराज मोहम्म्द बिन सलमान यांनी राज्यकारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर खूप स्वातंत्र्य वगैरे प्राप्त झाले आहे, हे काहीअंशी खरे असले तरी सौदीमधील महिला या अद्याप आपल्या मूलभूत हक्कांची लढाई लढत आहेत. त्यासाठी कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी सौदी सरकारशी चक्क रस्त्यावर येऊन संघर्षही केला. पण, त्यापैकी काही जणींचा आवाज हा कायमचा बंद करण्यात आला. पण, सौदीविषयीच्या या एकूणच नकारात्मक चित्रणाविषयी दुर्दैवाने मुस्लीमजगतातील महिलांमध्ये फारशी माहिती नसावी, अशीच दाट शक्यता आहे. या विषयाच्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने अधोरेखित करावी लागेल की, खरं तर पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या आशिया खंडातील मुस्लीम देशांमध्ये महिलांना सौदीपेक्षा सर्वच बाबतीत अधिक स्वातंत्र्य आहे. कारण, साहजिकच आशिया खंडातील इस्लाम, तेथील वातावरण आणि एकूणच कायदे हे सौदीइतके कडक, कट्टर वहाबी नक्कीच नाहीत. म्हणजे विचार करा, पाकिस्तानात बेनझिर भुट्टो या त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होऊन गेल्या, बांगलादेशात शेख हसिनांच्या हाती सध्या सत्तेची सूत्र आहेत, तर म्यानमारमध्येही सध्या आंग सान स्यू की यांच्या सरकारविरुद्ध तेथील लष्कराने बंड पुकारले आहे. हे असे महिला नेतृत्वाचे राजकीय चित्र सौदीत ना कधी दिसले आणि ना भविष्यात दिसेल.



इतकेच काय, सौदीचे युवराज सलमान यांची पत्नी नेमकी दिसते तरी कशी, हेच सौदीतील जनतेला ठाऊक नाही. यावरून सौदीमधील महिलांचे जीवन नक्कीच सुसह्य नाही, याचा अंदाज यावा. तेव्हा, एकूणच वाढत्या विदेशी बेगमबाईंची संख्या बघता, या सगळ्या प्रकाराला कुठे तरी कायमस्वरूपी आळा बसावा म्हणून सौदी अरबने हे कठोर उपाय योजल्याचे समजते. पण, या चार देशांव्यतिरिक्तही सौदी पुरुषांना ‘फॉरेनची बेगम’ करायची असेल तर त्यासाठी सरकारची रीतसर परवानगी बंधनकारक असेल. त्यासाठी पुरुषाचे वय हे २५ वर्ष असावे, ही अटदेखील सरकारतर्फे निर्धारित करण्यात आली आहे. सौदीमधील विवाहेच्छुक पुरुषांनी असा सर्व कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर सरकारी धोरणांनुसारच पुढील कार्यवाही केली जाईल. आता कुणी म्हणेल, सौदीच्या या मुस्लीम पुरुषांना एकपेक्षा जास्त निकाहाची मुभा आहेच की. मग त्याचे काय? होय, नेमकी हीच बाब ध्यानात घेता, अशा विवाहित सौदी पुरुषांना जर परदेशी महिलेशी लगीनगाठ बांधायची असेल तर त्यांना त्यांची पहिली पत्नी ही गंभीर स्वरूपात आजारी अथवा अपंग आहे, हे आधी सरकारी दरबारी कागदपत्रांनिशी सिद्ध करावे लागेल. त्यानंतरच सरकारला वाटले तरच दुसऱ्या (परदेशी) बायकोबरोबरचा निकाह कबूल होईल. आता सौदीमध्ये शिक्षेच्या भीतीपोटी नियमांचे तेथील जनसामान्यांना किती कडक पालन करावे लागते, हे वेगळे सांगायला नकोच. त्यामुळे या निर्णयामुळे सौदीमधील खासकरून या चार देशांत प्रेमसंबंध आजच्या ऑनलाईन जगात जोडल्या गेलेल्या कित्येक तरुण-तरुणींचा हिरमोड झाला असेल नाही?
 

@@AUTHORINFO_V1@@