निसर्गप्रेमी मंगेश कोयंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवली पक्षी अभयारण्यात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानिमित्ताने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी धडपडणाऱ्या या तरुणाची कहाणी...
डोंबिवलीकर मंगेश कोयंडे यांनी त्यांचे शालेय शिक्षण ‘सिस्टर निवेदिता इंग्लिश स्कूल’ आणि महाविद्यालयीन शिक्षण ‘के. व्ही. पेंढारकर महाविद्यालया’तून पूर्ण केले. तसेच माटुंग्यातील ‘व्हीजेटीआय महाविद्यालया’तून त्यांनी ‘एनसीसी’चे धडेही गिरवले. भारतीय सैन्यात दाखल होऊन देशसेवा करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. परंतु, दुर्देवाने त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास आले नाही. अखेरीस आपल्या स्वप्नांना मुरड घालत उदरनिर्वाहासाठी नोकरीचा मार्ग त्यांनी पत्करला. पण, नोकरीत मंगेश यांचे मन फारसे रमले नाही. नोकरी सोडून मग त्यांनी आपला मोर्चा व्यवसायाकडे वळवला. मंगेश यांच्या घरातून डोंबिवली पक्षी अभयारण्यातील डोंगर दिसत असे. लहानपणापासूनच त्यांचे या अभयारण्यात येणे-जाणेही होतेच. पण, जसजसे डोंबिवलीतील कांक्रीटचे जंगल वाढत गेले तसातसा अभयारण्यातील तो हिरवागार डोंगर दिसेनासा झाला. त्यातूनच अभयारण्य वाचविण्याची मंगेश यांची धडपड सुरू झाली आणि साहसी क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम ते करीत आहेत.
मानवाने प्रगतीच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अधिवास संकुचित केला. मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांमधून कधीही न संपणारी एक स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा मर्यादित राहिली असती तर ठीक होते. पण, मानवाच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला. याचा गांभीर्याने विचार करता, डोंबिवली पक्षी अभयारण्यातील नैसर्गिक सौंदर्य आणि वनसंपदा टिकून राहावी, यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे काम मंगेश कोंयडे आणि त्यांची टीम करीत आहे. नुकतेच श्रमदानातून त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर एक कृत्रिम पाणवठा तयार केला. या पाणवठ्यात जलसंचय कसा होता, याचा अंदाज घेतला. त्याच धर्तीवर आगामी काळात आठ ठिकाणी असेच पाणवठे तयार करण्याचा मंगेश यांचा मानस आहे. याविषयी मंगेश सांगतात की, “अभयारण्यातील जमीन ओलिताखाली राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गवत ओले राहून अभयारण्याला आग लागण्याचे प्रमाण कमी होईल. अभयारण्याला आग लागल्यानंतर अनेक पक्षी आणि प्राणी त्यात होरपळून मृत्यमुखी पडतात. या अभयारण्यात सहा ठिकाणी तलाव आहेत. पण, हे तलाव एका कोपऱ्यात आहेत. उंबार्ली मंदिराच्या बाजूला, बदलापूर हायवेच्या दिशेने असून हे तलाव खालच्या बाजूला आहेत, तर झाडे मात्र डोंगरावर आहेत. त्यामुळे डोंगरावर पाणी नेणे सोपे होईल, तसेच ज्या ठिकाणी झाडे आहेत, त्याच ठिकाणी पक्षी आणि प्राण्यांना पाणी मिळेल, अशी व्यवस्था करण्याचे आमचे सध्या काम सुरू आहे.” तसेच पक्षी आणि प्राण्यांना पाणी उपलब्ध न झाल्यास त्यांच्या स्थालंतराची भीतीही मंगेश व्यक्त करतात. तेव्हा मंगेश आणि त्यांची टीम तयार करत असलेल्या या कृत्रिम पाणवठ्यांमुळे वन्यजीवांची तहान नक्कीच भागणार आहे. परिणामी, अभयारण्यातील वनसंपदाही टिकून राहील. डोंबिवली पक्षी अभयारण्यात सामाजिक संस्थांनी एकत्र येत साडेचार हजारांची वृक्षलागवड केली आहे. परंतु, नुसती वृक्षलागवड करण्यापेक्षा त्याच्या संवर्धनावर मंगेश यांचा अधिक भर आहे. तसेच कोणत्या प्रकारची झाडे लावली पाहिजे, त्याचेही नियोजन तयार असून त्यानुसार कामही सुरू आहे.
डोंबिवली शहर सध्या चौफेर विस्तारत आहे. ते लक्षात घेता, डोंबिवलीतील ‘ग्रीन झोन’चे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी झाडे जगविणे गरजेचे असल्याचे मंगेश आवर्जून अधोरेखित करतात. डोंबिवली पक्षी अभयारण्यात सतत आग लागण्याच्या घटना घडत असतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे माती चोरी. आग लावली की संपूर्ण भाग मोकळा होतो. त्यामुळे माती काढणे सोपे होऊन जाते. डोंबिवलीच्या आजूबाजूला अनेक कंपन्यांची बांधकामे सुरू आहेत. त्यांना स्वच्छ माती लागते. अभयारण्यात आग लागली की त्यात गवत वगैरे काही नसते. त्यांना दगडांचीदेखील आवश्यकता असते. तेदेखील याठिकाणाहून मिळतात. यासाठी सरकारी यंत्रणा आणि स्थानिक जबाबदार असल्याचे सांगत मंगेश म्हणतात की, “आपण प्रयत्न केले तर हा सगळा प्रकार नक्कीच थांबेल. आम्ही सगळे सामान्य नागरिक आहोत. पण आम्ही जे प्रयत्न केले, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात अभयारण्याचे संरक्षण करू शकलो आहोत. प्रत्येक सामान्य माणसाने त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.”
‘लॉकडाऊन’ काळात लोकांची पावलं या पक्षी अभयारण्याकडे वळू लागली. पूर्वी लोकांना येथे अभयारण्य आहे हेदेखील माहीत नव्हतं. ‘लॉकडाऊन’मध्ये कुठे बाहेर जाता येत नव्हतं. त्यामुळे अंदाजे २५० लोक इकडे येतात. सोशल मीडियांच्या माध्यमातून प्रसिद्धी केल्याने अभयारण्याच्या संरक्षण, संवर्धनासाठी स्वयंसेवकांची संख्याही गेल्या काही काळात वाढली आहे. झाडांच्या बाजूला रिंगण करणे, फांदी तुटली तर त्याला आधार देणे, झाडांना किड लागली तर ती काढण्यासाठी प्रयत्न करणे, अशी कामे स्वयंसेवक करतात. तसेच स्वयंसेवकांनी कृत्रिम पाणवठाही तयार केला आहे. त्या एक पाणवठ्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च आला . हा सगळा खर्च स्वयंसेवकांनी आपल्याच खिशातून केला. या अभयारण्यात १३४ विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या स्थानिक प्रजाती आढळतात. त्यात स्थालंतरित पक्ष्यांची गणना केलेली नाही. सापांच्याही, फुलपाखरांच्याही विविध जाती आहेत. या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे महत्त्वाचे असल्याते मंगेश सांगतात. पक्षी आणि प्राणी हे सायंकाळच्या वेळी व पहाटे जंगलात फिरत असतात. त्यावेळी नागरिकांनी जंगलात जाऊ नये, कुठेही झाडांची पाने तोडू नये, असा संदेशही मंगेश निसर्गप्रेमींना द्यायला विसरत नाहीत. तेव्हा, मंगेश कोयंडे यांच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा आणि त्यांचे ‘हरित डोंबिवली’चे स्वप्न साकार होवो, हीच मनस्वी प्रार्थना...
- जान्हवी मोर्ये