ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानींच्या अॅन्टेलियासमोर स्फोटकांची स्कॉर्पिओ प्रकरणातील मुख्य दुवा असलेल्या मनसुख हिरण यांच्या हत्या प्रकरणी दोन आरोपीना एटीएसच्या पथकाने बेड्या ठोकल्या. रविवारी ठाणे न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अटक केलेला आरोपी नरेश रमणिकलाल गोर (वय ३१) हा बुकी असुन त्यानेच सचिन वाझे यांना पाच ते सहा बेनामी सिमकार्ड पुरवले होते. तर, दुसरा आरोपी विनायक बाळासाहेब शिंदे (वय ५१) हा लखनभय्या चकमकीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबल असुन पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानेच हिरनला "तावडे" नावाने फोन केला होता. वाझे यांना अनेक प्रकरणात शिंदे याने मदत केल्याचेही समोर आले आहे.
तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचा फोन आल्यानंतर मनसुख हिरन हे गुरुवारी ४ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले. तो फोन आरोपी विनायक शिंदे यानेच तावडे या नावाने केल्याचा खुलासा झाला आहे. आता एटीएस पथक मनसुख याला कुठे, कधी आणि कसे मारले याची चौकशी शिंदे याच्याकडे करीत आहेत. दरम्यान, हिरण हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याने एनआयएची पथके ठाण्यात आली आहेत. तर, अधिकृतपणे सूचना मिळताच आरोपींसह सर्व दस्तऐवज एनआयएकडे सोपविण्यात येतील, अशी माहिती एटीएस सूत्रांनी दिली.
एटीएसला अनेक गोष्टींचा खुलासा करायचा आहे. आरोपीच्या झडतीमध्ये तीन मोबाईल सापडले असुन वोडाफ़ोनचे ८ सिमकार्ड सापडले आहेत. एटीएसला आरोपी सचिन वाझे यांची कस्टडी हवी आहे. आरोपीनी गुन्ह्यात वापरलेली वाहने, हिरन यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज, मनगटी घड्याळ, पाकीट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड जप्त करणे बाकी आहे. गुन्ह्याचा कट कुठे रचला? त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता? हत्या कुठे केली? मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत.