शिवसेनेला मदत करणार्या नगरसेवकांवर एमआयएमची कारवाई
जळगाव : पक्षाने या प्रकाराची गंभीर दखल घेत तीन नगरसेवकांसह जिल्हाध्यक्षांनाही निलंबित केले आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मदत केल्याप्रकरणी एमआयएम पक्षाने आपल्या तीन नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या बरोबरच पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष यांनाही पक्षाने निलंबित केले आहे.
जळगाव महापालिकेत शिवसेनेला साथ देणं एमआयएमच्या नगरसेवकांना महागात पडलं आहे. महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना प्रणित आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणार्या एआयएमआयएमच्या तीन नगरसेवकांसह जळगावच्या जिल्हाध्यक्षांना पक्षाने निलंबित केले आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून या तीन नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित नगरसेवक आणि जिल्हाध्यक्षांनी २१ मार्च दुपारी २ वाजेपर्यंत प्रदेश कार्याध्यक्षांच्या आपली भुमिका स्पष्ट करावी असे आदेशही एआयएमआयएम पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी दिले आहेत.
सदरील आदेशामध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिया अहेमद अब्दुल करिम बागवान यांच्यासह महानगर पालिकेतील एमआयएम नगरसेवक रियाज अहमद अब्दुल करिम बागवान, सईदा युसूफ शेख, सुना राजू देशमुख या तीन नगरसेवकांनाही निलंबित करण्यात आले आहे. ’जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केल्याचे स्पष्ट झालेले आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाची महाविकास आघाडी आहे. पक्षाने भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीसोबत अंतर बाळगलं आहे. ही बाब देखील निलंबनाच्या कारवाईत स्पष्ट करण्यात आली आहे.
पक्षासोबत असलेल्या आणि पक्षाला मतदान करणार्या मतदारांच्या विरोधात या नगरसेवकांनी मतदान केले आहे. म्हणून पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे या तिन्ही नगरसेवकांसह जिल्हाध्यक्ष यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. गफ्फार कादरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली. असाच काहीसा प्रकार अमरावती पालिका निवडणुकीतही घडला होता त्यामुळे जळगावला दिलेला न्याय अमरावतीतही लागू होईल का ? याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.