मुंबई : एकीकडे अहमद शाहीने श्वानांवर केलेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच मुंबईमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मादी श्वानावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्षीय तौफिक अहमदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुंबईतील कलिना परिसरात १३ मार्चला घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या 'अॅनिमल रेस्क्यू अँड केअर ट्रस्ट'च्या अध्यक्षा सविता महाजन यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हा पुरावा म्हणून वाकोला पोलीस ठाण्यात सादर केले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. मुक्या प्राण्यांवर होणारे हे अत्याचार आता दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी स्वतःच्या विकृत लैंगिक इच्छापूर्तीसाठी ६८ वर्षीय अहमद शाहीनामक इसमाने तब्बल ३० ते ४० मादी कुत्र्यांशी कुकृत्य केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. आरोपी अहमद शाही मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातील रहिवासी असून, त्याला पोलिसांनी अटकही केली.