हात नका लावू युवराजाला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2021   
Total Views |

yuvraj_1  H x W
 
 
 
फक्त भारतातच नव्हे, तर अगदी जगभरात, कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तारूढ झाले तरी ठरावीक देशांबरोबरच्या आंतरराष्ट्रीय संबंधांत कटुता ही कायमच जाणूनबुजून दूर ठेवली जाते. अमेरिकेच्याच बाबतीत सांगायचे झाले तर सौदी अरब हा असाच एक अमेरिकेच्या ‘गुड बुक्स’मधील देश. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना २०१८ साली जमाल खाशोगी, या सौदी घराण्याविरोधी लिहिणाऱ्या पत्रकाराची इस्तंबूलमध्ये सौदीच्याच दूतावासात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर एकच खळबळ माजली. त्यावेळी ट्रम्प सौदीला पाठीशी घालत असल्याचेही आरोप झाले. त्यामुळे बायडन सत्तेवर येताच, या प्रश्नी ते या हत्येचे मुख्य सूत्रधार सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांना पाठीशी घालतात की कडक भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण, अपेक्षेप्रमाणे बायडन यांनीही ट्रम्प यांचाच कित्ता गिरवलेला दिसतो.
 
 
अमेरिकेचे नामांकित दैनिक असलेल्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये खाशोगी यांनी आपल्या सणसणीत लेखणीने सौदी आणि युवराज सलमान यांना लक्ष्य केले होते. त्याचाच राग मनात ठेवून एका मोक्याच्या क्षणी तुर्कीच्या इस्तंबूल येथील सौदी दूतावासात कागदपत्रांनिमित्त दाखल झालेल्या खाशोगी यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ही हत्या इतकी अमानवी होती की, खाशोगी यांच्या शरीराचे साधे नखही मागे उरले नाही. खाशोगी दूतावासात शिरले खरे; पण कधीही परत न येण्याकरिताच! आंतरराष्ट्रीय पातळीवर सौदी अरबवर मानवाधिकारांचे हनन, माध्यमांची गळचेपी म्हणून आरोपांच्या तोफाही डागण्यात आल्या. दबक्या आवाजात सलमान यांच्यावरही काहींनी तोंडसुखही घेतले. पण, अंतत: सौदीशी आपल्या देशाचे संबंध खराब होऊ नयेत, याची काळजी जवळपास प्रत्येक देशाने घेतली. त्याला कारण म्हणजे सौदीच्या तेलावरील अवलंबित्व आणि मुस्लीम जगतात सौदीचा असलेला दरारा. त्यात ट्रम्प यांच्या जावयाचे आणि सलमान यांचे घनिष्ठ संबंधही लपून राहिले नाहीत. उलट सौदीलाच हाताशी घेऊन ट्रम्प यांनी अरबजगतात इस्रायलशी मुस्लीम देशांशी संबंध सुधारण्यावर भर दिला. त्यामुळे बायडन सत्तेवर आले की भूमिकाबदल होईल, अशी अपेक्षा मात्र सर्वार्थाने फोल ठरली.
 
 
आता याला राजकीय दुटप्पीपणा म्हणा किंवा राजकीय मुत्सद्दीपणा. पण, बायडन यांनाही सौदीशी उभे वैर घेणे परवडणारे नाही, हेही तितकेच खरे. त्यामुळे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी खाशोगी हत्याप्रकरणी ३५ वर्षीय युवराज सलमान यांच्यावर थेट आरोप केल्यानंतरही बायडन यांचे हात मात्र बांधलेले आहेत. अशा धर्मसंकटात करायचे तरी काय, म्हणून अमेरिका आणि सौदीने ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ असा मार्ग पत्करला. खाशोगींच्या मृत्यूशी निगडित सौदीच्या अधिकाऱ्यांना अमेरिकेत बंदी घालणे, त्यांची सौदीतील सेवेतून हकालपट्टी करणे यांसारखा जखमांवर वरवरचा मुलामा लावण्याचा प्रकार दोन्ही देशांनी केला. परंतु, हा एक सर्वस्वी चुकीचा पायंडा असून युवराजांच्या मनमानीला तो बळकटी देणाराही ठरू शकतो.
 
 
युवराज सलमान यांनी त्यांच्या राजघराण्यापासून ते अगदी सर्वसामान्य नागरिकांना सौदीत काबूत ठेवले आहे. त्यांचा शब्द हा अखेरचा शब्द. त्यामुळे खाशोगी प्रकरणी अमेरिकाच नाही, तर जगाने घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेमुळे युवराजांच्या मनगटातील बळ तर वाढेलच. पण, आपण आपल्या देशातच काय, जगभरातही कोणाला उत्तरदायी नाही, ही युवराजांची हुकूमशाही भावना अधिक बळावेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जगताने केवळ युवराज सलमानचीच नव्हे, तर त्यांच्या आगामी वारसांचाही वेळीच विचार करून कडक भूमिका घ्यायलाच हवी; अन्यथा आज सलमान, उद्या त्यांचा आणखी कोणी वारस याच मार्गाने गेल्यास आश्चर्य वाटायला नको. एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पत्रकाराची अशाप्रकारे नृशंसपणे हत्या केल्यानंतरही जर एखाद्या देशाचा प्रमुख नामानिराळा राहणार असेल, तर इतर देशांमध्येही असेच हुकूमशाही प्रवृत्तीचे शासनकर्ते युवराजांचे अनुकरण करणार नाहीत, याची काय शाश्वती? म्हणूनच आर्थिक, वैयक्तिक किंवा इतर कोणतेही मुद्दे काहीसे बाजूला ठेवून अमेरिकेसह संपूर्ण जगाने या विषयाचे गांभीर्य ओळखायला हवे. हा विषय केवळ एका पत्रकाराच्या हत्येपुरता मर्यादित नाही, तर अशा राक्षसी गुन्ह्यांना, गुन्हेगारांना पाठीशी घालून आपण सापालाच दूध पाजतोय, जो नंतर आपल्यालाही डसू शकतो, याचे भान ठेवावे, एवढेच!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@