चाचणी नाही, प्रवेश नाही! : रेल्वे, एसटी, मॉल्समध्ये नियमावली

    19-Mar-2021
Total Views |

malls _1  H x W

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधासाठी `मास्क नाही-प्रवेश नाही`च्या धर्तीवर आता `चाचणी नाही-प्रवेश नाही`धोरण अवलंबण्यात येणार आहे. सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. लांब पल्ल्याची रेल्वेस्थानके, एसटी स्थानके आणि माल्समध्ये अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मॉल्स, पब आदी ठिकाणी कडक निर्बंध लागू करूनही नियम धाब्यावर बसवण्यात येत असल्याने पालिकेने आता चाचण्यांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मॉल्स, पब, शॉपिंग सेंटर तसेच लांब पल्ल्याची रेल्वे स्थानके, एसटीची बसस्थानके आदी गर्दीच्या ठिकाणी अँटीजेन टेस्टशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तसे निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सोमवार २२ मार्चपासून होणार आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वावढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी अँटिजेन चाचणी बंधनकारक करण्यात आले आहे. या ठिकाणी रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रॅपिड टेस्टच्या माध्यमातून प्रत्येकाची चाचणी करूनच प्रवेश दिला जावा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.


सशुल्क चाचणी
लांबपल्ल्याच्या रेल्वे स्थानकांवर, एसटी बसस्थानकांवर बाहेर गावाहून येणाऱ्या - जाणाऱ्या प्रवाशांची अँटिजेन चाचणी मुंबई महापालिकेमार्फत मोफत केली जाणार आहे. मात्र मॉल्स, पब, नाईटक्लब, आदी मनोरंजनाच्या ठिकाणी चाचणीसाठी नियमानुसार पैसे द्यावे लागणार आहेत.