मुंबई : बऱ्याच महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अभिषेक बच्चनची महत्त्वाची भूमिका असलेला 'दि बिग बुल' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचा एक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये 'हर्षद मेहता प्रकरणा'शी साधर्म्य असणारी गोष्ट आहे. मात्र, आता सोशल मिडियावर याची तुलना 'स्कॅम १९९२' या वेबसिरीजशी तर अभिषेक बच्चनची मध्यवर्ती भूमिका प्रतिक गांधीच्या 'हर्षद मेहता'शी करण्यात येत आहे. यावरून 'स्कॅम १९९२'चा प्रभाव अद्यापही प्रेक्षकांच्या मनावर किती आहे, याचा अंदाज येतो. परंतु, खरच ही तुलना करण्याची गरज आहे का?
'स्कॅम १९९२' आणि 'दि बिग बुल' यांच्यातला नेमका फरक काय?
९ ऑक्टोबर २०२० रोजी हंसल मेहता यांनी 'स्कॅम १९९२' ही वेब सिरीज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केली. प्रतिक गांधी या अभिनेत्याने 'हर्षद मेहता' हे पात्र सचोटीने प्रेक्षकांसमोर उभे केले. मुळातच ही वेबसिरीज देबाशिष बसु आणि सुचेता दलाला यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित होती. त्यामुळे यातील महत्त्वाच्या पात्रांमध्ये बदल न करता काही भाग हा फिक्शन होता. तसेच, उत्तम लेखन, पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा अभिनय यामुळे या वेब सिरीजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. विशेष म्हणजे हर्षद मेहताचे पात्र साकारणाऱ्या प्रतिक गांधी या नवख्या अभिनेत्याला चांगलीच ओळख मिळाली.
'दि बिग बुल' या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे. तर, अजय देवगणने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याची कथा ही हर्षद मेहता याच्या आयुष्यावर आधारित असली तरीही यातील पात्रांची नावे बदलण्यात आली आहे. तसेच, यामध्ये मध्यवर्ती असलेले हेमंत शाह हे पात्र अभिषेक बच्चनने साकारलेले आहे. त्यामुळे आता ट्रेलर प्रदर्शित होताच अभिषेक बच्चन आणि प्रतिक गांधी यांच्यातही तुलना होऊ लागली आहे.
प्रतिक गांधी की अभिषेक बच्चन ?
एकीकडे प्रतिक गांधीने हर्षद मेहता हे पात्र वेगळ्या उंचीवर घेऊन गेल्यामुळे अभिषेक बच्चन यामध्ये काय वेगळेपण दाखवतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु, यांच्यात कोणतीही तुलना न करता दोन्ही अभिनेत्यांचा एक वेगळा आवाका आहे. कारण, अभिषेक बच्चन याआधीसुद्धा अशाप्रकारचे पात्र साकारालेलेल आहे. धीरूभाई अंबानी यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'गुरु' या चित्रपटात त्याने वठवलेल्या भूमिकेची चांगलीच तारीफ झाली होती. तसेच, त्याचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'लुडो' या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेने वाहवाही मिळवली. त्यामुळे आता या चित्रपटात अभिषेक बच्चन काय कमाल करतो ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.